वाशीम पोलिसांच्या कारवाईत १८ लाखांचा गुटखा जप्त
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :31-Jan-2019
वाशीम :                                                          
वाशीम ग्रामीण पोलिस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आज केलेल्या कारवाईत १८ लाख रुपयाचा गुटखा जप्त केला आहे. ग्रामीण पोलिस स्टेशन अंतर्गत ही आतापर्यंत सर्वात मोठी कारवाई आहे. या कारवाईमुळे शहरातील गुटखा माफीयात एकच खळबळ उडाली आहे.
 
 
 
प्रभारी पोलिस अधिक्षक एस. पी. पवन बन्सोड यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोस्टेचे प्रभारी पो. नि. पाटील यांच्यासह पोलिस कर्मचार्‍यांनी सापळा रचून ही कारवाई केली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, एच.आर. 38 टी 7083 या ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा असून, सदर ट्रक हा वाशीम येथे येणार आहे.
 

 
 
या मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी वाशीम शहरातील सिंधी कॅम्प परिसरात सापळा रचला. उपरोक्त क्रमांकाचा ट्रक दिसून येताच चौकशी केली असता त्यामध्ये स्टील भांडे व इतर साहीत्य होते. पोलिसांनी ट्रकची झाडाझडती घेतली असता त्यामध्ये स्टील भांडे व इतर साहित्याच्या मधात गुटख्याचे पोते दिसून आले. यामध्ये मोठ्या शिताफीने लपून गुटखा आणला होता. सदर गुटखा त्या भांड्याखाली असल्याचे समजतात लगेच ट्रक ग्रामीण पो.स्टे.ला घेऊन त्याची पाहणी केली असता त्यात विमल, नजर, सुगंधीत तंबाखु असल्याचे निष्पन्न झाले. सदर गुटखा व ट्रकसह पोलिसांनी १८ लाखाचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत अन्न व औषधी प्रशासन विभागाला माहिती देण्यात आली असून, त्यानंतरच पुढील कार्यवाही केली जाणार आहे.