६०० भारतीय विद्यार्थी अमेरिकन पोलिसांच्या ताब्यात
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :31-Jan-2019
 
 
 
 
 
 
 
शिक्षण किंवा नोकरीसाठी अमेरिकेत जाणाऱ्या भारतीयांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अमेरिकेत उपलब्ध असलेल्या संधींमुळे विद्यार्थ्यांचे कल वाढत चालले आहे. मात्र नुकतीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  इमिग्रेशनचे नियम मोडल्याच्या कारणावरुन  ६०० भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकेतील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यूएस इमिग्रेशन आणि कस्टम एन्फोर्समेंट एजन्सी ने केलेल्या चौकशीनंतर ही कारवाई करण्यात आल्याचे अमेरिकन तेलगु असोसिएशनकडून सांगण्यात आले आहे.
 
 परवानगीशिवाय देशात राहणाऱ्या विविध देशातील विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.  या मध्ये भारतातील  ६०० जणांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे.  अमेरिकेत ज्या संस्थेने ही कारवाई केली त्यांनी आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंटद्वारे याबाबतची माहिती दिली. मातृभूमी सुरक्षा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, फ्रेमिंगचन हिल्स भागात बनावट विद्यापीठाची निर्मिती करुन परदेशी विद्यार्थ्यांना लक्ष्य करण्यात आले. यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. 
 
अमेरिकन तेलगु असोसिएशनशी निगडित असलेले विद्यार्थी आणि त्यांचे मित्रमंडळी यांच्याकडून ही गोष्ट समजली. यापुढे नेमके काय करायचे यासाठी अमेरिकेतील काही भारतीय संघटना आणि तेलगु असोसिएशन भारतीय विद्यार्थ्यांना मदत करत आहेत. या सर्व आरोपातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधण्याचे काम सुरु असून यामध्ये अनेक तांत्रिक मुद्दे असल्याने ही गुंतागुंत सोडवण्यासाठी काही वेळ लागेल असे सांगण्यात येत आहे. परदेशात असणाऱ्या भारतीय दूतावासामार्फत या विद्यार्थ्यांची लवकरात लवकर सुटका व्हावी यासाठी वेगाने हालचाली सुरु आहे. 
६०० पैकी १०० विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे. राजदूत आणि वाणिज्यदूताला याची माहिती देण्यात आली असून, पुढील कार्यवाही सुरू आहे.