हरहुन्नरी सुरैया!
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :31-Jan-2019
भारतीय चित्रपटसृष्टीत गायन आणि अभिनय या दोन्ही गोष्टीत निपुण असणार्‍या अभिनेत्रींमध्ये सुरैया नाव सर्वात आघाडीवर होते. या हरहुन्नरी अभिनेत्रीचा जन्म 15 जून 1929 रोजी पंजाबमधील गुजरावाला येथे झाला. तिचे पूर्ण नाव होते सुरैया जमाल शेख. अभिनयान ती पारंगत होतीच, परंतु संगीताचे कुठलेही शिक्षण न घेताही ती उत्तम गायिका म्हणून प्रसिद्धीस आली.
तिने आपल्या उत्कृष्ट अभिनय आणि सुरेल गायकीने 40 व 50च्या दशकात रसिकांच्या मनावर राज्य केले. जुन्या काळातील प्रसिद्ध खलनायक जहूर हे सुरैयाचे काका होते. त्यांच्यामुळेच तिला चित्रपटसृष्टीत पाय रोवता आले. 1937 मध्ये आलेल्या ‘उसने क्या सोचा’ या चित्रपटाद्वारे तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. यात तिने बालकलाकाराची भूमिका वठविली होती. शाळेला सुट्या असल्याने ती 1941 मध्ये मोहन स्टुडिओमध्ये सुरू असलेल्या ‘ताजमहल’चे चित्रीकरण बघण्यास गेली. निर्देशक नानूभाई वकील यांना ती दिसली. दिसताक्षणी त्यांनी सुरैयाची ‘मुमताज महल’मधील बाल कलाकाराच्या भूमिकेसाठी निवड केली. सुरैयाचा आवाजही छान होता. संगीतकार नौशाद यांनी ‘ऑल इंडिया रेडियो’वर पहिल्यांदा तिचा आवाज ऐकला आणि त्यांनी ‘शारदा’ या चित्रपटात तिच्याकडून गाणे गाऊन घेतले.

 
त्यावेळचा रोमँटिक अभिनेता देव आनंद देखील तिचे सौंदर्य बघून प्रेमात पडला होता. परंतु प्रत्यक्षात ही जोडी एकत्र येण्यात यशस्वी होऊ शकली नाही. देवआनंद सोबत तिने अनेक चित्रपटात काम केले. ‘जित’ चित्रपटात काम करीत असताना देवआनंदने सुरैयासमोर आपले प्रेम व्यक्त केले. या गोष्टीचा उल्लेख देवआनंदने ‘रोमांिंसग विथ लाइफ’ या त्यांच्या आत्मचरित्रात सुरैयाबरोबर असलेल्या त्यांच्या नात्याचा उल्लेख केला आहे. सुरैयानेही शेवटपर्यंत लग्न केले नाही. या प्रतिभावान अभिनेत्रीला ‘मलिका-ए-तरन्नुम’ ने सन्मानित करण्यात आले. ‘मिर्जा गालिब’, ‘खिलाडी’, ‘जीत’, ‘विद्या’, ‘दो सितारे’ हे तिचे प्रसिद्ध चित्रपट आहेत. मिर्झा गालिबमधील ‘ये कैसी अजब दास्ता हो गई है’, शमा चित्रपटातील ‘धडकते दिल की तमन्नाओं...’, ‘आपसे प्यार हुआ जाता है’ अशी एकापेक्षा एक गाणी तिने तिच्या सुरेल आवाजात गायली आहेत.
तिचे जन्मस्थान पाकिस्तानात होते. परंतु विभाजनानंतरही तिने भारतातच राहणे पसंत केले. संपूर्ण आयुष्य तिने एकाकी घालवले. अशा या सुंदर अभिनेत्रीने 31 जानेवारी 2004 रोजी जगाचा निरोप घेतला.
 
- मीरा टोळे