चार वर्षीय बालिकेवर अत्याचार; आरोपीस अटक
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :31-Jan-2019
वरोरा : 
शेजारी राहणार्‍या चार वर्षीय बालिकेला दारू पाजून अत्याचार केल्याची समाजमन सुन्न करणारी घटना वरोरा तालुक्यातील नागरी येथे उघडकीस आली. याप्रकरणी वरोरा पोलिसांनी आरोपीविरूद्ध भादंवी ३७६ अ, ब, पोस्को (लैंगिक अपराधांपासून मुलांना संरक्षण) कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक केली. अनिल उर्फ टेणप्या निळकंठ आडे (३५, रा. नागरी) असे आरोपीचे नाव आहे.
 
 
 
वरोरा पोलिस ठाण्यांतर्गत येणार्‍या नागरी येथील एका कुटुंबातील पती-पत्नी ३० जानेवारीला सकाळी १० वाजता शेतात काम करायला गेले होते. त्यावेळी त्यांची चार वर्षीय मुलगी प्रकृती ठिक नसल्याने घरी झोपून होती. यावेळी घराशेजारी राहणार्‍या आरोपीने त्या चार वर्षीय बालिकेला स्वतःच्या घरी नेले. तिला दारू पाजली. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. आई-वडील सायंकाळी घरी आल्यावर त्यांनी मुलीला उठवले. मुलीच्या तोंडातून दारूचा वास येत होता. शंका आल्याने अत्याचारग्रस्त मुलीच्या आईने त्या युवकास विचारणा केली असता, तो तेथून निघून गेला. त्यानंतर आज गुरूवारी याबाबत वरोरा पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात तपास अधिकारी तथा पोलिस उपनिरीक्षक माया चारसे करीत आहे.