भारतीय संघ विश्वचषक विजेतेपदाचा प्रबळ दावेदार : रिचर्डसन
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :31-Jan-2019
नवी दिल्ली  :
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) मुख्य कार्यकारी अधिकारी डेविड रिचर्डसन यांनी भारतीय संघ हा २०१९ च्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असल्याचे म्हटले आहे.
 
 
आज गुरूवारी आयसीसी आणि कोकाकोला यांच्यात पाच वर्षासाठी करार करण्यात आला यावेळी रिचर्डसन यांनी विश्वचषक स्पर्धेच्या विजयाचे प्रबळ दावेदार कोण असेल याचा अंदाज व्यक्त केला. रिचर्डसन यांना विचारण्यात आले की, तुम्ही भारतीय संघास विश्वचषक स्पर्धेच्या विजयाचा प्रबळ दावेदार म्हणून सांगत आहात, पण काही वेळापूर्वी भारतीय संघ हॅम्लिटनमध्ये चौथ्या एकदिवसीय सामन्यात अवघ्या ९२ धावांवर आटोपला. तर यावर रिचर्डसन यांनी हसत उत्तर दिले की, ‘प्रत्येकाचा आपला एक दिवस असतो’.
विश्वचषकासाठी काही महिन्यांचा कालावधी बाकी आहे. त्यामुळे या स्पर्धेबद्दलच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. हा विश्वचषक इंग्लंड आणि वेल्समध्ये आयोजित करण्यात आला आहे. तसेच या विश्वचषकाचा अंतिम सामना लॉर्ड्सच्या मैदानावर पार पडणार आहे. ३० मे २०१९ पासून या स्पर्धेस सुरूवात होणार आहे.