आता हेल्मेट घातल्याशिवाय सुरूच होणार नाही दुचाकी
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :31-Jan-2019
औरंगाबाद :  हेल्मेट सक्तीविरोधात पोलीसांनी कठोर पाऊले उचलली आहेत. मात्र, अनेक ठिकाणी नागरिकांकडून हेल्मेट सक्तीला विरोध होत आहे. तर, जीव जाण्यापेक्षा हेल्मेट घातलेले बरे असेही अनेकांचे म्हणणे आहे. औरंगाबादमध्ये इयत्ता नववी शिकणाऱ्या विस्मय विनोद तोतलाने एक भन्नाट शोध लावला आहे. जर, तुम्ही हेल्मेट घातले नाही, तर तुमची गाडीच सुरू होणार नाही, असे यंत्र विस्मयने बनवले आहे. विशेष म्हणजे तुम्ही दारू पिऊन गाडी चालवत असल्याचे तुमच्या कुटुबीयांना लगेच मेसेजही मिळणार आहे.
 
 
हेल्मेट वापराबाबतच्या जनजागृतीसाठी सरकारकडून जाहिरातींवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात येत आहे. मात्र, औरंगाबादेतील एका शाळकरी मुलाने भन्नाट शोध लावून हेल्मेटचा वापर अनिवार्य केला आहे. औरंगाबदमधील नाथ व्हॅली स्कूल या शाळेत नववीत शिकणाऱ्या या विद्यार्थ्याने एक कल्पना लढवली आहे. या स्मार्ट हेल्मेटची कमाल म्हणजे, डोक्यावर हेल्मेट घालून बसल्याशिवाय दुचाकी सुरुच होणार नाही. इयत्ता नववीमध्ये शिकणाऱ्या विस्मय विनोद तोतलाने (१२ वर्षे) केलेल्या संशोधनानुसार, तुम्ही हेल्मेट घातले तर तुमची गाडी सुरू होणार, जर तुम्ही दारू पिऊन गाडी चालवत असाल तर थेट तुमच्या घरी तसा संदेश जाईल. त्यानंतर तुमचे लोकेशनही तुमच्या घरी जाईल आणि तुमची गाडीच सुरू होणार नाही. विस्मयने केलेल्या या संशोधनाची निवड देशपातळीवरील विज्ञान प्रदर्शनासाठी झाली आहे. या भन्नाट स्मार्ट हेल्मेटच्या निर्मितीसाठी विस्मयला एक महिन्याचा कालावधी लागला. या हेल्मेटमध्ये आर. एफ. ट्रान्समीटर, रिसीव्हर, अल्कोहल सेंसर, लिमिट स्वीचेस, जीपीएस ॲन्टिना या उपकरणांचा वापर करण्यात आला आहे.
राज्य शासनाने २००१ साली परिपत्रक काढून महामार्गावर हेल्मेट घालणे बंधनकारक केले होते. तर शहरी भागात हेल्मेट सक्ती नसल्याचे म्हटले होते. मात्र, त्यावर न्यायालयाने हे परिपत्रक चुकीचे असल्याचे म्हटले होते. त्यामुळे २००३ साली परिपत्रक काढून शासनाने आधिचे परिपत्रक रद्द केले होते.