नागपुरात महिन्याच्या अखेरपर्यंत १९ किमी धावणार मेट्रो : डॉ. ब्रिजेश दीक्षित
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :31-Jan-2019
- ८ स्थानकांचा समावेश
- ई-सायकल उपक्रमाचे उद्घाटन
 
नागपूर : 
‘माझी मेट्रोत बसून नागपूरचे सौंदर्य डोळ्यात साठविण्याची व स्मार्ट सिटीचे दर्शन घेण्याची इच्छा बाळगणाऱ्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत मेट्रोतून प्रवास करण्याची नागपूरकरांची इच्छा पूर्ण होणार आहे. फेब्रुवारी महिन्याचा शेवटपर्यंत माझी मेट्रो १९ किलोमीटर धावणार असल्याची माहिती व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी दिली.
 
महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन अर्थात ‘माझी मेट्रो च्या वतीने देशातील पहिल्या अर्बन मोबिलिटी उपक्रमांतर्गत शहरातील मेट्रो स्थानकावर सायकल, ई-सायकल उपक्रमाचे उद्घाटन गुरुवारी व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते.
 

 
 
डॉ. दीक्षित म्हणाले यांनी सांगितले की, प्रवाशांना फेब्रुवारी महिन्याच्या शेवटपर्यंत माझी मेट्रोत सफर करणे शक्य होणार आहे. मेट्रोचा प्रथम टप्पा हा खापरी स्थानक ते मुंजे चौक (बर्डी) स्थानक (१३ किलोमीटर) व लोकमान्य नगर स्थानक ते सुभाषनगर स्थानक (६ किलोमीटर) राहणार आहे. यादरम्यान खापरी, साऊथ एअरपोर्ट, न्यू एअरपोर्ट, जयप्रकाश नगर, मुंजे चौक, सुभाषनगर व लोकमान्य नगर अशा ८ स्थानकांवर मेट्रोचे थांबे राहतील. तसेच मेट्रो सुरू झाल्यावर हळूहळू सुभाषनगर ते बर्डी वरील इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर, झाशी राणी चौक, अजनी, रहाटे कॉलनी हा मार्ग नंतर सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
मेट्रोची आरडीएसओ, सीआरएस आणि सीआरएमएसच्या चमूकडून सातत्याने तपासणी करण्यात येत आहे. माझी मेट्रोच्या स्थानकावर सर्वच ठिकाणी फिडर सेवा ऑटोमॅटिक सेवा, फस्ट माईल ते लास्ट माईल कनेक्टिविटी असणार आहे. स्थानकाबाहेर ई-रिक्षाची सुविधाही उपलब्ध केली जाणार आहे. ही सर्व अ‍ॅप बेस सर्विस राहणार असून इंटिग्रेटेड सिस्टीममुळे सर्व सुविधा जोडण्यात येणार आहेत. याकरिता महापालिका व माझी मेट्रो यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे, असेही डॉ. दीक्षित यांनी सांगितले.