ट्रॅक्टरचा शंकरपट!
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :31-Jan-2019
काही घटना घडतात अन्‌ त्याची साधी नोंदही आमच्या संवेदनेच्या पातळीवर टिपली गेलेली नसते. त्या घटना म्हणजे पुढच्या भीषण उलथापालथीची नांदी असतात. म्हणजे साधा खोकला म्हणून सोडून दुर्लक्ष करायचे अन्‌ त्यातून विकोपाला गेलेले दुखणे पुढे यायचे, असेच काहीसे या घटनांच्या बाबत होत असते. आपण आपल्या जगण्याच्या बाबत फारसे जागरूक, हळवे नसतो, हेच वारंवार दिसून आले आहे. तंत्र प्रगत होत असताना अन्‌ आम्ही तंत्रशरण होत असताना जीवनशैलीचे पर्यावरण मात्र प्रदूषित होते आहे, याचे भान गेल्या काही पिढ्यांना राहिलेले नाही. लाखांदूर तालुक्यातील मासळ या गावी आता शंकरपटात बैलांच्या ऐवजी ट्रॅक्टर धावणार आहेत, ही सहज गमतीची बाब नाही. हा बदलदेखील मस्करीचा नक्कीच नाही. हे अश्रूंचेच संदर्भ आहेत. ते आताच कळले नाही तर नंतर मानवी आयुष्याचे हसे होणार, हेही नक्कीच!
 
नवे तंत्र आणि रासायनिक शेतीच्या नावाखाली आम्ही काय गमावले, याचा हिशेब लागतच नाही अन्‌ काय गमावले याचा हिशेब आम्ही करतच नाही. आमची विज्ञानवादी अन्‌ तंत्रशरण अंधश्रद्धा आम्हाला तसे करू देत नाही. रासायनिक शेतीने आम्ही जमीन मारली. माती मेली. एक चमचा मातीत एक लाख जीवाणू असतात, तेव्हाच ती जिवंत असते, असे समजायचे असते. त्याचमुळे पाऊस पडला की मृद्गंध दरवळत असतो. आता मातीतल्या जीवाणूंची संख्या दहा हजारांच्याही खाली आलेली आहे. कापड जीर्ण व्हावे तसे मातीही जीर्णशीर्ण झालेली आहे. त्याला कृत्रिम खतांचा रफू करून किती दिवस काम चालविणार? फार पूर्वी काही कीटक मातीत सापडायचे. पावसाळ्याच्या दिवसांत सोनपाखरं असायची. लाल रेशमी किडे असायचे, कुंकवाचा कीडा म्हणायचे त्याला. माती जिवंत, सुपीक असल्याचे ते लक्षण होते. हा किडा कधीतरी अस्तंगत झाला. आम्ही बेदखल राहिलो. जीवनाच्या साखळीतला एक अत्यंत महत्त्वाचा बदल आम्ही बेदखल केला. आता माणसं मरायला लागली आहेत. शेतकरी आत्महत्या करून मरत आहेत अन्‌ शहरी माणसं रसायनांनी तुडुंब अन्न खाऊन विविध आजार पोसत आहेत. कुठलाही समाज त्याची जीवनपद्धती भोवतालाच्या असण्यावर ठरवत असतो.
 
माती, पाणी, हवा आणि असेच घटक पाहून वस्त्रप्रावणांपासून खाण्या-पिण्याच्या सवयींपर्यंत ठरत असते. काळाच्या कसोटीवर ते त्याची तपासणी करून रुजविले गेलेले असते. त्यामुळे आमची शेतीपद्धती आणि पिकांचे प्रकारही त्यावरूनच ठरत असतात. आमची मुळातच कृषी संस्कृती आहे आणि गोवंश हा त्याचा एकुणातच कणा आहे. पुराणांपासून बैलाचे महत्त्व त्याचमुळे रुजविले गेलेले आहे. आता गावात जनावरंच राहिलेली नाही. बैल नाही अन्‌ गायीदेखील नाहीत. गोठे ओस पडले. त्यामुळे शेतीचे चक्रच बदलले आहे. त्याचे परिणाम आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहतो आहे. आमची शेती ही संस्कृती होती. आता ती कार्पोरेट झालेली आहे. कृषिवलांचे खंतावत, खंगत जाणे यामागे केवळ आर्थिकच कारण नाही, ते सामाजिक आणि मुळात सांस्कृतिक कारण आहे. शेतीची संस्कृती बदलते आहे. ही शेतीपद्धती आमची नाही. नव्याचा स्वीकार करताना जुने सारेच पुसून टाकायचे नसते. उलट, जुन्याच्या कलाने नवे स्वीकारायचे असते. शहरांसाठी शेती हा नव्या जगाचा मंत्र आहे. शेतीतल्या कच्च्या मालावर उद्योग चालतात, हे खरे आहे. मात्र, उद्योगांना कच्चा माल पुरविण्यासाठीच शेती केली जावी, असे अजीबात नाही. अभारतीय शेतीपद्धतीचा स्वीकार करायला लावल्याने आमचा शेतकरी परावलंबी झाला. शेती हा नैसर्गिकप्रक्रियेत मानवाने करायच्या सृजनाचा भाग आहे. त्यातला निसर्गच काढून टाकण्यात आला. त्यामुळे शेती यंत्रशरण झाली. शेतकरी परावलंबी झाला. बियाणांवर त्याचे स्वामित्व राहिले नाही. अगदी पाण्यासाठीही तो परावलंबी झाला. एकीकडे जागतिकीकरणाने जगाच्या स्पर्धेत आमचा शेतकरी उतरविला गेला अन्‌ दुसरीकडे त्याच्या क्षमतांवर कामच करण्यात आले नाही.
 
 
 
महात्मा गांधी म्हणाले होते, तुम्ही यंत्रशरण व्हाल तर मग माणसे अगतिक होतील. त्यांच्या क्षमता विसरतील. यंत्रे माणसांसाठी असावीत, माणसे यंत्रांसाठी नकोत. त्यामुळे शक्तीचे, सत्तेचे केंद्रीकरण होईल... दीनदयाल उपाध्याय यांचेही असेच म्हणणे होते. आम्ही त्याकडे दुर्लक्ष केले. नद्या ओस पडल्या अन्‌ आम्ही मोठी धरणे बांधली. कुणाला किती पाणी द्यायचे, याचा निर्णय दिल्ली-मुंबईत होऊ लागला. गावाचे आपले पाण्याचे नियोजन असले पाहिजे. पाण्यावर त्यांचा अधिकार असला पाहिजे... हे सगळे बाद ठरविले गेले. शेतीचेही यांत्रिकीकरण झाले. एकीकडे आम्ही सीिंलग लावून शेतीचे तुकडे पाडले. त्यातच वारसापद्धतीने शेतीची मालकी विभागत तिचे अगदी गुंठ्यांइतके तुकडे पडत गेले. त्यात मग आधुनिक शेतीच्या नावाखाली हे असे यांत्रिकीकरण आले. माणसे शेतीपासून दुरावली तसेच जीवांचाही शेतीशी संबंध संपत आला. आता बैलांच्या ऐवजी ट्रॅक्टरने नांगरणे आले.
 
शंकरपटासारख्या परंपरा प्राणिदयेच्या नावाखाली बंद पाडण्यात आल्या. त्यामुळे गावखेड्यातल्या संस्कृतीला धक्का बसला. उत्तम जनावारांची पैदास करण्यासाठी या असल्या परंपरा साहाय्यभूत ठरायच्या. आधीच शेतीचे तुकडे पडल्याने जनावरांची संख्या कमीच झाली होती. आता ट्रॅक्टरसारखी यंत्रं आली, त्यामुळे बैल बाद होत गेले. त्यामुळे गोवंश कमी होत गेला. आम्ही आधुनिकतेच्या नावाखाली अविचाराने काही गोष्टी लादूनच घेत असतो. त्याचा अतिरेकही करत असतो. प्राण्यांचा छळ करू नये, हे ठीक आहे; पण म्हणून काय बैलांचा शेतकामासाठीही उपयोग करायचा नाही का? गोवंशाची कत्तल होते तिकडे ‘पेटा’च्या कार्यकर्त्यांचे लक्ष जात नाही. जे लक्ष घालतात त्यांना असहिष्णू ठरविले जाते. शंकरपट बंद झाले. मासळ येथे ही परंपरा अडीचशे वर्षांची आहे. त्यांनी मग ट्रॅक्टरचा शंकरपट भरविण्याचे ठरविले आहे. त्यातही ट्रॅक्टर्सची ही स्पर्धा ‘रीव्हर्स’ची असणार आहे. हेही पुरेसे बोलकेच आहे. उद्या बैलपोळा भरविण्याच्या ऐवजी ट्रॅक्टरचा पोळा भरविण्याची वेळ येऊ शकते. बैलांना रंगविणे, त्यांची सजावट करणे हे अनैसर्गिक आणि त्यांचा छळ करणारे ठरवीत कुणी अद्याप न्यायालयात गेलेले नाही, पण जाणारच नाही असेही नाही. आता हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे म्हणून त्यावर भाष्य करणेही गैर आहे. त्यामुळे मासळवासीयांनी मागितलेल्या परवानगीला नकार देण्यात आला. त्यांनी ही ट्रॅक्टरची शक्कल लढविली. ही कल्पना उचलली जाईल, कारण ती कार्पोरेट जगताच्या फायद्याची आहे. गावोगावी ट्रॅक्टरपट भरविले जातील अन्‌ त्यांना ट्रॅक्टरनिर्मिती करणार्‍या कंपन्या प्रायोजकत्वही देतील. ट्रॅक्टर हा सार्‍यांनाच परवडणारा नाही. जमिनींचा आकार तितका नाही आणि कुशल चालकही असायला हवेत. यंत्रांची देखभालही कुशलतेने करावी लागते. त्याचा खर्च असतो. इंधनाचा प्रश्नही आहेच.
 
बैल हा नैसर्गिक पर्याय होता. जिवंत प्राण्याची जागा एखाद्या यंत्राने घ्यावी, ही भीषणता जगण्यावरच घाला घालणारी आहे. ट्रॅक्टरचा शंकरपट म्हणजे उपहास आहे. त्यावर हसताना आतून कोसळायला होतं. घटना अगदीच साधी अन्‌ वाटल्यास ज्यांना शेती, माती, गावगाडा अन्‌ ती संस्कृती माहितीच नाही त्यांच्यासाठी ‘इनोव्हेटिव्ह’देखील असू शकते. काही लोक हलकीफुलकी घटना म्हणून स्मितही करतील; पण त्यातली ‘दिल ही मे िंखचती है’ अशी कसक फारशा लोकांना कळणार नाही, जाणवणार नाही अन्‌ ते गंभीरही होणार नाहीत अन्‌ हेच आमच्या शेतीसमस्येचे मूळ कारण आहे...