ॲपल कंपनीच्या नफ्यात घट
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :31-Jan-2019
नवनवीन वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आयफोन हा अॅपल कंपनीचा हुकमी एक्काच आहे. स्मार्टफोन विश्वात कितीही नवीन फोन आले तरी, अॅपलच्या आयफोनची भुरळ ‘रिच टू मास’ क्लास कायम आहे. अॅपलने पहिल्यांदाच आयफोनच्या ग्राहकांची संख्या जाहीर केली आहे. त्यानुसार, जगभरात 90 कोटी ग्राहकांकडे चालू स्थितीतील आयफोन आहेत. यातले तब्बल 7.5 कोटी आयफोन तर फक्त 1 जानेवारीपासून कार्यरत झाले आहेत.
 
 

 
 
 
आयफोनच्या विक्रीतून होणार नफा हा अॅपलचा सर्वात मोठा उत्पन्नाचा स्त्रोत आहे. कंपनीचे तब्बल 60 टक्के उत्पन्न आयफोनमधून मिळते. मात्र चीनमध्ये आलेल्या मंदीचा फटका यावेळी आयफोनला बसला आहे. त्याचाच परिणाम म्हणून आयफोनच्या विक्रीत 15 टक्क्यांची घट झाली आहे. साहजिकच त्याचा परिणाम कंपनीच्या कामगिरीवर झाला आहे.
 
 
 
 
कंपनीने आज गुरुवारी आपले ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले असून, मागील 17 वर्षात पहिल्यांदाच तिसर्‍या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात घट झाली आहे. या तिमाहीत कंपनीला 1.41 लाख कोटी रुपयांचा म्हणजे 1,997 कोटी डॉलर्सचा निव्वळ नफा झाला आहे. जो मागील वर्षाच्या तुलनेत 1 टक्क्यांनी कमी आहे. तर एकूण उत्पन्नात देखील 4.5 टक्क्यांची घसरण झाली आहे. कंपनीचे एकूण उत्पन्न 5.98 लाख कोटी रुपये म्हणजे 8,431 कोटी डॉलर्स एवढे आहे.