नक्षलवाद्यांनी जाळला भाजीपाल्याचा ट्रक
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :31-Jan-2019
नक्षलवाद्यांनी शासन विरोधात पुकारलेल्या विरोध सप्ताहाच्या आज शेवटच्या दिवशी मध्यरात्रीच्या सुमारास कुरखेडा कोरची मार्गावर बेळगाव घाटावर नक्षलवाद्यांनी झाडे तोडून रस्ता अडविल्यानंतर ट्रक पेटवला. यामुळे यामार्गावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून या घटनेने परिसरात दहशत निर्माण झाली आहे. कोरची तालुक्यातील घाटावर सशस्त्र नक्षल्यांनी भाजीपाला वाहून नेणारा ट्रक पेटवून दिल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री १ ते १.३० च्या सुमारास घडली. तसेच या मार्गावर ठिकठिकाणी झाडे तोडून व दगड रस्त्यावर मांडून ठेवण्यात आल्याने मार्ग बंद पडल्याने आज सकाळपासून रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
 
 

 
 
 
चंद्रपूर येथून रायपूर येथे टमाटर घेऊन जाणाऱ्या ट्रकला बेडगाव घाटावर आज मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास वीस ते पंचेविसच्या संख्येत असलेल्या सशस्त्रधारी नक्षल्यानी अडविला व ट्रक चालकास खाली उतरवून त्याच्याकडील मोबाईल हिसकावून त्याला 50 मीटर दूर अंतरावर नेले व ट्रक रस्त्यावर आडवा करून ट्रकला पेटवून दिल्यानंतर चालकास मोबाईल परत केला व भारत बंद चे पत्रक सोपवून परत जाण्यास सांगितले या घटनेनंतर या मार्गावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून परिसरात दहशत निर्माण झाली आहे याठिकाणी रस्त्याच्या मधोमध बॅनर बांधून 31जानेवारीला भारत बंध ठेवण्याचे आवाहन नक्षलवाद्यांच्या उत्तर गडचिरोली डिव्हिजन कमेटी कडून करण्यात आले आहे
 
 
 
या परिसरात २५ ते ३१ जानेवारीदरम्यान शासनाच्या धोरणांविरोधात प्रतिकार सप्ताह साजरा करीत बंद पाडण्याचे आवाहन प्रतिबंधित नक्षल संघटनेने बॅनर लावत केले होते. मात्र या आवाहनाचा कोणताच प्रभाव जनजीवनात जाणवत नव्हता. मात्र रात्री २० ते २५ चा संख्येत असलेल्या नक्षल्यांनी कोरची घाटावरील पहिल्या वळणावर चंद्र्रपूर वरून रायपूरकडे जात असलेल्या ट्रकला थांबवत त्यातीलच डिझेल वाहनावर शिंपडत पेटवून दिले. तसेच ठिकठिकाणी झाडे तोडून व दगड रस्त्यावर मांडून वाहतूक बंद पाडली. आज सकाळी वर्तमानपत्रे घेऊन कोरचीकडे जाणारे वाहन पोहचू शकले नाही. तसेच सकाळच्या कोरची नागपूर व इतर बसेससूद्धा अडकून पडलेल्या आहेत.