मेंदूतील संकेतांचे बोलीभाषेत रूपांतर
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :31-Jan-2019
 
 
 
 
 

 
 
वॉशिंग्टन
कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रणाली शास्त्रज्ञांनी विकसित केली असून या द्वारे मेंदूतील संकेत किंवा विचारांचे भाषेत रुपांतर करता येते . विविध कारणांमुळे बोलण्याची क्षमता गमावलेल्यांसाठी शास्त्रज्ञांनी अत्यंत दिलासादायी शोध लावला आहे. यामुळे बोलू न शकणाऱ्या व्यक्तींना त्यांची संभाषण क्षमता पुन्हा प्राप्त होणार असल्याचा दावा केला जात आहे.
अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी ही प्रणाली विकसित केली आहे. तिच्याद्वारे मेंदूच्या हालचालींचे निरीक्षण करून त्यातील विचार समजतील अशा स्पष्ट शब्दांत रुपांतरित करता येणार आहेत. यामुळे संगणकाद्वारे थेट मेंदूशी संभाषण साधण्याच्या प्रक्रियेला नवी दिशा मिळणार आह. परंतु बोलू न शकणाऱ्यांना यामुळे त्यांच्या भावना जगापर्यंत पोहोचवणे शक्य होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 
 
 
 
 
 

 
 
 
 
 ' आपला आवाज मित्र आणि कुटुंबाशी संवाद साधण्यासाठी मदत करतो . विविध कारणांमुळे बोलण्याची क्षमता गमावलेल्यांसाठी हा शोध अतिशय आशादायी व महत्त्वपूर्ण आहे', असे या शोधाशी संबंधित मुख्य संशोधक निमा मेस्गरणी यांनी नमूद केले. 'या नव्या शोधामुळे बोलण्याची क्षमता पुन्हा कार्यान्वित करणे शक्य होणार असून योग्य तंत्रज्ञानाने अशा व्यक्तीचे विचार उलगडून  ते व्यवस्थित ऐकता येतील , अश्या सोप्या शब्दांत रुपांतरित करता येणार आहेत', असेही ते म्हणाले.
या शोधावर संशोधक अधिक काम करत असून, जास्त कठीण शब्द आणि वाक्यांची चाचणी घेण्यात येत आहे. हा जगण्याला कलाटणी देणारा शोध असून यामुळे इजा किंवा एखाद्या आजारामुळे बोलण्याची क्षमता गमावलेल्यांना जगाशी संभाषण करण्याची नवी संधी मिळणार असे मेस्गरणी म्हणाले.