वादग्रस्त विधेयके राज्यसभेत पारित करू नका - गुलाम नबी आझाद यांचा इशारा
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :31-Jan-2019
नवी दिल्ली,
अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारने राज्यसभेत वादग्रस्त विधेयके पारित करण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी आज गुरुवारी दिला.
 
 

 
 
अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यसभेचे कामकाज सुरळीत चालण्याच्या दृष्टीने मतैक्य साधण्यासाठी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. व्यंकय्या नायडू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला संसदीय कामकाज मंत्री नरेंद्रिंसह तोमर, राज्यमंत्री विजय गोयल, विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, तृणमूल कॉंग्रेसचे डेरेक ओ. ब्रायन, बसपाचे सतीशचंद्र मित्रा यांच्यासह विविध पक्षांचे नेते उपस्थित होते. सदस्यांनी सभागृहात गोंधळ घालू नये, सभागृहाचे कामकाज सुरळीत चालू द्यावे, असे आवाहन नायडू यांनी यावेळी केले. सभागृहात कोणत्याही मुद्यावर चर्चा घडवण्याची आणि सर्व सदस्यांना चर्चेत सहभागी करून घेण्याची आपली भूमिका नायडू यांनी मांडली. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात राज्यसभेत गोंधळामुळे फारसे कामकाज होऊ शकले नव्हते.
 
 
 
 
या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना आझाद म्हणाले की, जी विधेयक वादग्रस्त नाहीत, ती पारित करण्यासाठी आम्ही सरकारला सहकार्य करू; मात्र वादग्रस्त विधेयके पारित करण्याचा आग्रह सरकारने सोडला नाही, तर राज्यसभेचे कामकाज प्रभावित होऊ शकते आणि त्याची जबाबदारी सरकारची असेल.
 
 
तृणमूल कॉंग्रेसचे गटनेते डेरेक ब्रायन यांनीही अशीच भावना व्यक्त केली. राज्यसभेत सरकारने काही वादग्रस्त विधेयके पारित करून घेण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा ब्रायन यांनी दिला. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकार विरोधकांना धमकावण्यासाठी सीबीआयचा वापर करत असल्याचा आरोप ब्रायन यांनी केला.