वाढीव मोबदला देण्याची शेतकऱ्याची मागणी - समृद्धी महामार्गात गेली शेतजमीन
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :31-Jan-2019
सेलू,
 
 
नागपूर मुंबई शीघ्र संचार द्रुतगती महामार्ग(महाराष्ट्र्र समृद्धी महामार्ग) यात अधिग्रहित केलेली शेत जमीन ही हंगामी ओलिताची असताना तिला कोरडवाहू दाखवून कमी मोबदला अदा केला व शेतातील चना बळजबरीने नष्ट करून ताबा घेतला. त्यामुळे ओलित क्षेत्राचा मोबदला देण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्याने उपविभागीय अधिकाऱ्याकडे केली आहे.
 
 

 
 
धर्मेद्र ज्ञानेश्वर हटवार, कोमल ज्ञानेश्वर हटवार व योगिता शरद हांडे यांचे मौजा किन्हाळा शिवारात भूमापन क्र.9/2 ही सामायिक शेती आहे. या परिसरातून नागपूर मुंबई शीघ्र संचार द्रुतगती महामार्ग गेल्याने ही शेत जमीन शासनाने अधिग्रहित केली आहे. अधिग्रहित जमिनीचा मोबदला देन्यासाठी मुंल्यांकन करताना सदर शेतजमीन ही ओलित क्षेत्रातील असल्याचे मूल्यांकन केले व त्यानुसार मोबदला ठरविण्यात आला.
 
 
 
हा मोबदला सदर शेतकऱ्यास मान्य असल्यामुळे कोणताही आक्षेप नोंदविण्यात आला नाही, परंतु आक्षेप नोंदविण्याचा कालावधी संपल्यानंतर मूल्यांकणात बदल करून ओलित क्षेत्रात दाखविलेली शेतजमीन आश्चर्यकारक कोरडवाहू दाखवून मोबदला अर्ध्यावर आणला. त्यामुळे शेतकऱ्याने उशिरा आक्षेप नोंदवून शेतात चना ची पेरणी केली,परंतु आक्षेपावर कुठलीही कारवाई न करता अधिग्रहनाच्या अधिकाराचा दुरुपयोग करून शेतातील पीक नष्ट करून जमिनीचा ताबा घेतला. यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले आहे. आमचे शेत हंगामी ओलिताचे असून शेताचे फेरमूल्यांकन करण्यात यावे व वाढीव मोबदला देण्यात यावा, अशी मागणी करणारे निवेदन उपविभागीय अधिकारी वर्धा यांना देण्यात आले.