फ्लिपकार्ट, अमेझॉनवरील डिस्काऊंट, ऑफर्स बंद
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :31-Jan-2019
नवी दिल्ली,
 
फ्लिपकार्ट आणि अमेझॉन सारख्या ई कॉमर्स कंपन्यांकडून मिळणारे एक्सक्लुसिव्ह सेल ऑफर्स उद्यापासून बंद होणार आहेत. सरकारने ई कॉमर्स व्यवसायातील मुक्त व्यापारी धोरणांना निर्बंध लावत नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्यांची अंमलबजावणी 1 फेब्रुवारी म्हणजे उद्यापासून होणार आहे. त्यानुसार, ई कॉमर्स कंपन्यांना त्यांच्याच उपकंपनी किंवा भागीदारी असलेल्या कंपनीचे उत्पादन विक्री करण्यात मनाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर यापुढे ई कॉमर्स कंपनीला एखाद्या कंपनीबरोबर एक्सक्लुसिव्ह ऑफर्सचा करार करून ते उत्पादन विकता येणार नाही.
 

 
 
 
 
सद्यस्थितीत ई कॉमर्स कंपन्यांनाकडून अंदाजे 4 लाख वस्तूंवर कॅशबॅक, एक्सक्लुसिव्ह ऑफर्सच्या माध्यमातून डिस्काउंट दिला जातो. तो उद्यापासून बंद होणार आहे.
 
 
 
ई कॉमर्स कंपन्यांच्या कॅशबॅक आणि एक्सक्लुसिव्ह ऑफर्सच्या झंझावातासमोर देशातील छोटे व्यापारी आणि दुकानदार यांच्यावर संक्रात आली होती. त्यामुळे देशातील 60 लाख छोट्या व्यापाऱ्यांची संघटना 'द कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (सीएआयटी)' ने सरकारवर दबाव आणत हा निर्णय घेण्यास भाग पाडले आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने यासंदर्भातील नवीन धोरण जाहीर केले आहे. नवीन धोरणामध्ये कॅशबॅक, एक्सक्लुसिव्ह ऑफर्स यांसारख्या विविध बाबींवर निर्बंध आणण्यात आले आहेत.