विवाहितेवर बलात्कार करून उकळले ८ लाख रुपये - तेलंगणाच्या अण्णावर गुन्हा
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :31-Jan-2019
नागपूर, ३१ जानेवारी
फेसबुकवरून ओळख झालेल्या एका विवाहितेवर बलात्कार करून तिची अश्लिल चित्रफित तयार करून तिला ८ लाखाने लुबाडणाऱ्या तेलंगनातील एका अण्णावर गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कुमार आर. गवडी उर्फ अण्णा (रा. मंचेरियल, तेलंगाना) असे आरोपीचे नाव आहे.
 
 

 
 
याप्रकरणी माहिती अशी, पीडित ३२ वर्षीय महिलेचे माहेर आंध्र प्रदेशात आहे. लग्नानंतर ती नागपुरात आली. तिला एक मुलगी आहे. नागपुरात ती कुरियर सव्र्हिस सेंटर चालविते. २०१७ मध्ये तिच्या पतीला हृदयविकाराचा झटका आल्याने उपचारासाठी त्याला हैदराबाद येथे नेले होते. तेथे फेसबुकवरून तिच्याच गावी राहणाऱ्या कुमार गवडीसोबत ओळख झाली. त्यांनी ऐकमेकांचे मोबाईल क्रमांक दिले. त्यानंतर त्यांचा व्हॉट्सअ‍ॅपवर संवाद सुरू झाला. दरम्यान, त्यांच्यात अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. पतीच्या उपचारासाठी ती हैदराबाद येथील हॉटेलमध्ये थांबली असता कुमारने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आरोपी कुमारने आपल्या मोबाईलमधून या संबंधाची चित्रफित तयार केली. त्याचप्रमाणे अश्लिल छायाचित्रे काढली.
 
 
ती नागपूरला परत येताच त्याने तिची अश्लिल छायाचित्रे फेसबुकवर अपलोड करण्याची धमकी देत त्याने तिला त्याच्या बँक खात्यात १४ हजार रुपये भरण्यास सांगितले. त्याचप्रमाणे पत्नी आणि साळ्याच्या खात्यातही पैसे टाकण्यास सांगितले. बदनामीच्या भितीपोटी तिने कुमारच्या खात्यात पैसे टाकले.
 
 
काही दिवसानंतर तो नागपूरला आला असता महिलेच्याच घरी थांबला. महिलेच्या घरीही त्याने संबंध प्रस्थापित केले. महिला आपल्या ताब्यात असल्याचे समजताच तो तिला ब्लॅकमेल करू लागला. अनेकदा त्याने तिच्याकडून पैसे उकळले. महिलेच्या घरून जाताना तो तिचे एक लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन गेला. त्यानंतर तिला फोन करून पैशाची मागणी केली. पैसे न दिल्यास तिच्या मुलीला जिवे मारण्याची धमकी दिली. आठ लाख रुपये उकळून देखील कुमारचे समाधान न झाले नव्हते. परत तो आपल्याला लुटणार असे समजून आल्याने बुधवारी तिने गिट्टीखदान पोलिस ठाण्यात तक्रार केली. या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी ४१७, ३८४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांचे एक पथक मंचेरियलला रवाना झाले आहे.