शेअर बाजाराची 665 अंकांची भरारी
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :31-Jan-2019
मुंबई,
 
 
उद्या शुक्रवारी सादर होत असलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात सरकार उद्योग जगतासाठी महत्त्वपूर्ण घोषणा करेल, असा विश्वास असलेल्या गुंतवणूकदारांनी आज गुरुवारी मुंबई शेअर बाजारात बहुतेक सर्वच बड्या कंपन्यांच्या शेअर्सच्या खरेदीवर उड्या टाकल्या. यामुळे शेअर बाजाराच्या निर्देशांकाने 665 अंकांची मोठी भरारी घेतली. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनेही आपला 10,800 चा स्तर पार केला आहे.
 
 
 
 
 
 
आज प्रामुख्याने लघु, मध्यम आणि बड्या उद्योगांसह सर्वच कंपन्यांच्या शेअर्सला चांगली मागणी मिळाली. प्रामुख्याने आयटी आणि बँिंकग क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरला जोरदार मागणी मिळाली होती. इन्फोसिस, टीसीएस, कोटक बँक, अॅक्सिस बँक, इंडसइंड बँक आणि एचडीएफसी इत्यादी कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात वधारले. तर, यस बँक, बजाज फिनसर्व्ह, झी एंटरटेनमेंट, इंडियाबुल्स हाऊिंसग आणि एचसीएल टेक या कंपन्यांचे शेअर्सचे भाव घसरले होते.
 
 
 
 
आज सकाळी मुंबई शेअर बाजाराची सुरुवात सुमारे 200 अंकांच्या कमाईने झाली. त्यानंतर दिवसभरच कमाईत भर पडत गेली. दिवसभराच्या जोरदार उलाढालीनंतर शेअर बाजाराचा निर्देशांक 665.44 अंकांच्या कमाईसह 36,256.69 या स्तरावर बंद झाला.
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनेही सकाळची सुरुवात मोठ्या कमाईनेच केली होती. त्यानंतर दिवसभराच्या उलाढालीत 179.15 अंकांच्या कमाईसह निफ्टी 10,830.95 या स्तरार बंद झाला.