मध्यान्ह भोजनाच्या खिचडीत शिजला साप !
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :31-Jan-2019
 
 
 

 
 
 
 
नांदेडच्या हदगाव तालुक्यातील गारगव्हाण येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत बुधवारी विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मध्यान्ह भोजनाच्या खिचडीत साप आढळल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. शाळेच्या निष्काळजीपणामुळे पालकांकडून तीव्र नाराजी व संताप व्यक्त केला जात आहे.
या घटनेची माहिती मिळताच नांदेडच्या शिक्षण विभागाचे पथक चौकशीसाठी शाळेत दाखल झाले. प्राथमिक माहितीनुसार, हदगाव तालुक्यातील गारगव्हाण येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत बुधवारी दुपारी मध्यान्ह भोजन म्हणून खिचडी देण्यात आली होती. सुदैवाने खिचडी खाण्याआधी शिक्षकांच्या तपासणीत एका विद्यार्थ्याच्या ताटात मृतावस्थेतील साप आढळला. त्यानंतर विद्यार्थ्यांना खिचडी खाऊ न देता त्या खिचडीची विल्हेवाट लावण्यात आली. कुणीही खिचडी न खाल्याने कुणाच्याही आरोग्याला धोका नसल्याचं शाळा प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान, या प्रकरणी दोषींविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.