एसबीआय चे सर्व्हर पासवर्डविना; बँक खात्यासह महत्वाची माहिती लीक
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :31-Jan-2019
 
नवी दिल्ली:
 
 स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ने ग्राहकांची महत्त्वाची माहिती असणाऱ्या सर्व्हरला कोणत्याही सुरक्षेविना ठेवल्याची धक्कादायक माहिती एका अहवालानुसार  समोर आले असून ग्राहकांसाठी ही माहिती चिंतेचा विषय आहे . या सर्व्हरमध्ये हजारो ग्राहकांचे बँक बॅलेन्स आणि खाते क्रमांकाची महत्त्वाची माहिती लीक झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
टेकक्रंचने दिलेल्या अहवालानुसार, बँक सर्व्हरला पासवर्ड ठेवण्यात आले नसून अशा परिस्थितीत कोणीही बँकेचा महत्त्वाचा डेटा अ‍ॅक्सेस करु शकते. तसेच ज्यांना सर्व्हरमधून ग्राहकांची माहिती कशी मिळवली जाते याची कल्पना आहे त्यांनी याचा गैरवापर केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्व्हर किती वेळासाठी सुरक्षेविना होता याची माहिती मिळू शकली नाही. मात्र टेकक्रंचने याबाबत एसबीआयशी संपर्क साधून विचारणा केली असून याप्रकरणी त्यांना कोणतीही माहिती देण्यात आली नाही. 
 
 
 

 
 
 
 
अहवालानुसार, सुरक्षा नसलेले हे सर्व्हर बँकेच्या एसबीआय क्विक सेवेचा एक भाग होता. यावरुन ग्राहक सामान्य माहिती मिळवण्यासाठी मेसेज किंवा मिस कॉल देत असत . बँकेने आपल्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, एसबीआय क्विक – मिस्ड कॅल बँकिंग ही मोफत सेवा बॅलेन्स, मिनी स्टेटमेंट आणि इतर माहिती मिळविण्यासाठी असून आपल्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरुन एसएमएस किंवा मिस कॉल द्वारे ही माहिती मिळते.  स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील मोठी बँक आहे. लाखो ग्राहकांचे या बँकेत खाते असून अशाप्रकारचे रिपोर्ट समोर आल्यानंतर बँकेतील खात्याच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे .