डिसेंबरमध्ये मेट्रो ट्रेन ‘चायना टू नागपूर’
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :04-Jan-2019

  
 

नागपूर - डिसेंबरमध्ये ‘माझी मेट्रो’च्या ताफ्यात दोन मेट्रो ट्रेनचा समावेश होणार आहे. तीन डब्यांची एक मेट्रो ट्रेन असून एकूण सहा डबे चीनवरून शहरात येणार आहेत. एका मेट्रो ट्रेनची निर्मिती झाली असून, त्यात अत्यावश्‍यक उपकरणे बसविण्यात येत आहेत. दुसऱ्या मेट्रो ट्रेनची निर्मितीही वेगाने सुरू आहे.

शहरातील मेट्रो ट्रेन तयार करण्याचे कंत्राट चीनमधील सीआरआरसी कंपनीला दिले आहे. चीनमधील डालियान प्रकल्पात ‘माझी मेट्रो’चे कोच (डबे) तयार होत आहे. सीआरआरसी माझी मेट्रोसाठी एकूण ६९ मेट्रो कोचेस तयार करीत असून यापैकी ६ कोचेस (दोन मेट्रो ट्रेन) ते डिसेंबर महिन्यात पाठविणार आहे. मेट्रोचे डबे आकर्षक असून, त्यात आधुनिक सोयी-सुविधा आहेत. विशेषतः लहान मुलांसह महिला आणि वृद्धांना मेट्रो ट्रेनमधून सहज प्रवास उपलब्ध व्हावा, यावरही भर देण्यात येत आहे. कोचेसच्या निर्मितीसाठी विविध प्रकारच्या सुमारे तीन हजार सुट्या भागांची आवश्‍यकता असते. कोचेसमध्ये लागणारे उपकरण, आसने व इतर बाबीकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. संगणकाच्या साहाय्याने स्टेनलेस स्टीलचे शीट्‌स आवश्‍यक त्या आकारानुसार कापल्या जातात व रोबोटच्या मदतीने वेल्डिंगचे काम केले जात आहे. कोच तयार करण्यासाठी अंडरफ्रेम, साइड वॉल, एंड वॉल, रूफ आणि कॅब स्ट्रक्‍चर इत्यादी सर्व भाग जोडले जातात. कोचेसमध्ये लागणारे इन्व्हर्टर आणि इतर काही उपकरणे जपानमध्ये तयार केले असून हे उपकरणे सीआरआरसी कारखान्यात पाठविण्याची प्रक्रिया झाली आहे. कोचेस तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण होताच डालियन येथे विविध चाचण्या करण्यात येईल. यात प्रत्येक रिकाम्या कोचेसचे वजन, फिरत्या कोचेसच्या विविध मानकांचे परीक्षण, पाणी गळती परीक्षण, विविध तांत्रिक प्रणालींची तपासणी करण्यात येणार आहे. या सर्व चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर ६ कोचेस सीआरआरसी येथून नागपुरात आणले जाणार असून मिहान कार डेपो येथे उतरविले जातील.