आयफेल टॉवरचा देश...

    दिनांक :01-Oct-2019
 
फ्रान्स या देशाचे नाव घेतले की आठवतो, जगातील आठ आश्चर्यांपैकी एक असलेला असा भव्यदिव्य आयफेल टॉवर, जगातील अप्रतिम, एकापेक्षा एक सरस कलाकृतींनी सजलेले लूव्र म्युझियम आणि तत्सम इतर सुंदर प्रेक्षणीय स्थळे. याच सुंदर देशाविषयी आणखी काही माहिती आज आपण फिरारे इंटरनॅशनलमध्ये घेऊ या...
 
नीलेश जठार
9823218833
 
 
फ्रान्स हे जगभरातील पर्यटनस्थळांमधील अतिशय लोकप्रिय ठिकाण आहे. दरवर्षी सुमारे 38 मिलियन पर्यटक फ्रान्सला भेट देत असतात. फ्रेंच लोकांच्या खानपानाच्या आवडीनिवडी आणि त्यांचे त्यांच्या मातृभाषेवरील प्रेम हेतर जगजाहीर आहे. याशिवाय फ्रेंच नागरिक आणखी एका गोष्टीसाठी ओळखले जातात. ती गोष्ट म्हणजे झोप! हो, फ्रेंच नागरिक, जगातील इतर देशांच्या नागरिकांच्या मानाने जास्त काळ झोपतात. हे निदान ओईसीडी स्टॅटिस्टिक्सद्वारे करण्यात आले आहे आणि म्हणूनच फ्रान्ससारख्या देशामध्ये आयुष्य निवांत असते, असे म्हटले जाते. फ्रान्समध्ये कालेडियन पॅलेस हे असे ठिकाण आहे, जिथे तुम्ही पैसे देऊन अनेक दिवस झोपू शकता. या ठिकाणी तुम्ही तुमच्या खाण्यापिण्याची लिस्ट आधीच देणे अपेक्षित असते. त्यानुसार तेथील कर्मचारी ठरलेल्या वेळी तुमचे आवडीचे पदार्थ तुमच्या खोलीत तुम्हाला न उठवता आणून ठेवतात म्हणजे तुम्ही तुमच्या झोपेमध्ये छोटासा ब्रेक घेऊन खाऊन-पिऊन पुन्हा झोपण्याकरिता सज्ज होऊ शकता. हे ठिकाण, सर कालेडियन यांनी रशियातून येऊन बांधले होते, ज्यांना स्वतःलाच झोपणे फार आवडायचे. 

  
 
फ्रान्स देशातील नागरिकांना सार्वजनिक सुट्‌ट्या फारशा मिळत नाहीत. वर्षाकाठी केवळ अकरा सार्वजनिक सुट्‌ट्या फ्रान्समध्ये दिल्या जातात; पण नागरिकांना स्वेच्छेने सुट्‌टी घेण्याची मुभा आहे व इतर देशांच्या मानाने फ्रान्समध्ये वर्किंग अवर्स कमी आहेत. त्यामुळे फ्रेंच नागरिक सुट्‌ट्या घेतात आणि त्यांना कामही कमी वेळ करावे लागते; पण असे असूनही फ्रान्स हा जगातील सर्वात जास्त उत्पादक देशांपैकी एक समजला जातो. याचे कारण, फ्रेंच लोक कमी वेळाकरिता कामे करीत असले, तरी कमी वेळात अधिक काम करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते. 
 
  
कोणतीही गोष्ट चटकन पटवून न घेणे किंवा समोर असलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही उणिवा शोधणे, ही अस्सल फ्रेंच नागरिकांची खासियत आहे. त्यामुळे कुठल्या गोष्टीचे समाधान या लोकांना वाटतच नाही. त्यामुळे फ्रेंच लोक विमनस्क असल्याचे म्हटले जाते. या देशामध्ये सरकारी खात्यांमध्ये महिला कर्मचार्‍यांचे प्रमाण जास्त आहे. एकूण 48 टक्के महिला, सरकारी खात्यांमध्ये निरनिराळ्या हुद्यांवर काम करीत आहेत. तसेच इतर देशातील पुरुषांच्या मानाने फ्रेंच पुरुषांना घरामध्ये काम करणे आवडते. त्यामुळे अगदी घर झाडण्यापासून ते स्वयंपाक किंवा घरातील इतर लहानमोठी कामे येथील पुरुषमंडळी अगदी आनंदाने करतात. फ्रान्समधील बहुतांश ऑफिसेस हे सायंकाळी 5 पर्यंत बंद होतात, त्यामुळे सायंकाळी मॉल्स, सिनेमा हॉल आणि क्लब्स फुल्ल असतात. फ्रान्समधील नाईट क्लब्स फारच सुरेख आहेत. 
 
सुपरमार्केटस्‌मध्ये मिळणारे तयार अन्नपदार्थ विकले गेले नाहीत तर ते टाकून दिले जात असत. अन्नाची अशाप्रकारे नासाडी होण्यावर बंदी घालणारा फ्रान्स हा पहिला देश ठरला. आता सुपर मार्केटस्‌मध्ये विकले न गेलेले अन्नपदार्थ गरजू लोकांना देणे येथे बंधनकारक आहे. त्याकरिता इथे फूड बँक्स जागोजागी स्थापन करण्यात आल्या आहेत. येथून गरजू लोकांना मोफत अन्न मिळण्याची व्यवस्था होत असते. त्याचबरोबर या देशामध्ये वर्णभेदही नाही. प्रत्येकाला स्वातंत्र्य, समानता इथे हक्क म्हणून मिळाली आहे. हा कायदा करणारा राजनेता बॅरिस्ट ओकेन यांच्या नावाने भलेमोठे संग्रहालय फ्रान्समध्ये आहे. ते पाहण्याकरिता साधारण 3 तास लागतात.