वन्य प्राण्यांच्या हैदोषामुळे शेतकरी त्रस्त

    दिनांक :01-Oct-2019
जीव धोक्यात घालून करावी लागते जागल
 
मंगरूळनाथ,
मंगरूळनाथ तालुक्यातील अनेक गावांमधील शेतकर्‍यांना वन विभागाच्या अवकृपेमुळे दिवस-रात्र शेतामध्ये जागली करण्याची पाळी आल्याचे विदारक दृश्य पहावयास मिळत आहे. शेतात मळा घालून त्यावर रात्रभर जागरण करुन वन्यप्राण्यापासून शेतकरी पिकांचे रक्षण करतांना दिसतात.
 
 
 
 
जोगलदरी, कोळंबी ,सावरगाव कान्होबा ,कळंबा बोडखे, मसोला या व तालुक्यातील इतर अनेक गावांना लागून वनविभागाची शेकडो हेक्टर जमीन आहे. ही वने या विभागाच्या दुर्लक्षामुळे वन नतस्करांसाठी सोन्याची अंडी देणारी कुरणे मागील अनेक वर्षापासून बनलेली आहेत. स्थानिक वन प्रशासनाच्या डोळेझाक करण्याच्या रणनीतीमुळे वनांमधील झाडे केवळ रस्त्यांच्या आजूबाजूला दिसतात. आत मध्ये तोडून ठेवण्यात आलेल्या झाडांची केवळ अवशेष राहिलेले पहावयास मिळतात. मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल होत असल्याने जंगली प्राण्यांच्या नैसर्गिक निवार्‍याच्या मुळावर ही बाब आलेली आहे. जंगलाचा र्‍हास झाल्याने अन्नाच्या शोधार्थ जंगली रोही, हरिण आणि डुकरांचे मोठमोठाली कळपे मंगरुळनाथ तालुक्यातील बहुतांश शेतकर्‍यांच्या शेतात घुसून कापणीला व हातातोंडाशी आलेल्या पिकांची नासाडी करीत असल्याचे दृष्य सर्वत्र दिसत आहे. लाखमोलाची बी-बियाणे, खते ,औषधांची व्यवस्था करून वाढविलेली पिके जंगली जनावरामुळे धोक्यात आल्याने शेतकर्‍यांच्या उदरनिर्वाहाचा बिकट प्रश्‍न निर्माण होतो की काय अशी परिस्थिती जंगली पशु मुळे झालेली आहे.
वन्य प्राण्यांमध्यील डुकरे, रोही अनेकवेळा शेतकर्‍यावर हल्ले सुद्धा करतात यामुळे जिवीत व वित्तहानी सुद्धा मोठ्या प्रमाणावर होत असते. जंगली प्राण्यांपासून आपल्या पिकांचा बचाव करण्यासाठी शेतकर्‍यांनी आपल्या शेतामध्ये माचाणांची बांधणी केली असून, जीव धोक्यात घालून आपली पिके वाचविण्यासाठी ऊन -पाऊस- वारा झेलण्याची पाळी शेतकर्‍यावर आलेली आहे. शासनाने वन्यप्राण्यांच्या उपद्रवा पासुन शेती व पिकांना वाचविण्याची मागणी मंगरुळनाथ तालुक्यातील शेतकरी वर्गामध्ये जोर धरत आहे.