अबब! तोफ...!!

    दिनांक :01-Oct-2019
पल्लवी जठार-खताळ
 
जयपूर येथील जयगड या किल्ल्यावर आशिया खंडातील सर्वात मोठी तोफ आहे. या तोफेचा पल्ला इतका लांबवर आणि त्यामुळे होणारे नुकसान इतके भयकारी होते, की या तोफेच्या केवळ उल्लेखानेच शत्रूची भीतीने गाळण उडत असल्याचे म्हटले जाते. ही भली मोठी तोफ बनविण्याकरिता इ. स. 1720 साली या किल्ल्यावरच विशेष कारखाना तयार करण्यात आला. 

 
 
ही तोफ ओतून तयार झाल्यानंतर हिची चाचणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार तोफेमध्ये दारू ठासून जेव्हा त्याचा मारा करण्यात आला, तेव्हा त्या तोफेच्या गोळ्याने तब्बल पस्तीस किलोमीटरचा पल्ला गाठला. तो गोळा जिथे पडला तिथे जमिनीमध्ये एक भले मोठे विवर तयार झाले. कालांतराने त्या विवरामध्ये पाणी साठत गेले. त्या विवराच्या ठिकाणी आता एक मोठा जलाशय पाहायला मिळतो.
 
 
ही तोफ जयगड किल्ल्यावर बनविली गेली, त्यामुळे या किल्ल्याच्या नावानारूनच या तोफेचे नामकरण करण्यात आले. या तोफेला ‘जयबाण तोफ’ असे नाव देण्यात आले. आमेरच्या जवळ स्थित असलेल्या जयगड किल्ल्यावर ही तोफ आजही दिमाखात उभी आहे. ही तोफ समस्त आशिया खंडातील सर्वात मोठी तोफ म्हणूनही ओळखली जाते. दुसरे सवाई जयिंसह यांनी आपल्या राज्याच्या संरक्षणाकरिता या तोफेचे निर्माण करविले होते.
 
 
अरावली पर्वतराजीतील जयगड किल्ल्याच्या डुंगरी दरवाजावर उभ्या असलेल्या या तोफेची लांबी एकतीस फूट आहे. या तोफेच्या नळीचा व्यास अकरा इंच असून, या तोफेसमोर एक भला दांडगा माणूसदेखील लहानसा दिसतो, इतकी ही तोफ अजस्त्र आहे. या तोफेचे वजन पन्नास टनांपेक्षा अधिक असल्याचे सांगितले जाते. विशेष गोष्ट ही की, या तोफेचा उपयोग आजवर एकाही युद्धामध्ये केला गेला नाही. 35 किलोमीटरच्या पल्ल्यापर्यंत मारा करणार्‍या या तोफेमध्ये शंभर किलो गन पावडरची आवश्यकता पडत असे. या तोफेच्या महाकाय आकारामुळे या तोफेला किल्ल्यावरून उतरवून युद्धामध्ये नेता येणे शक्य झाले नाही.