परतवाडा हत्याकांड; पोलिस बंदोबस्तात तिघांवर अंत्यसंस्कार

    दिनांक :01-Oct-2019
जुळ्या शहरात तणावपूर्ण शांतता
संचारबंदी 24 तासाकरिता वाढवली
 
अचलपूर, 
सोमवारी परतवाडा शहरात श्यामा खोलापुरे या पहेलवानाच्या हत्येनंतर झालेल्या दंगलीत मृत्यूमुखी पडलेल्या सैफअली मो. कमाल व मो. अतिक मो. रफीक यांच्यावर कडेकोट पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. तसेच श्यामा पहेलवानावरही अंतिम संस्कार करण्यात आले. दरम्यान, जुळ्या शहरात संचारबंदी वाढविण्यात आली असून अफवांचा बाजार सुरूच आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन पोलिस महानिरीक्षक रानडे यांनी केले आहे.
सोमवारी घडलेल्या घटनेने जुळ्या शहरातील शांततेला गालबोट लागले. सणासुदीच्या दिवसात घडलेल्या प्रकाराने सण उत्सवाच्या आनंदाच्या वातावरणावर विरजण पडले आहे . सोमवारी दुपारी 3 वाजतापासून 24 तासाची संचारबंदी लागू करण्यात आली होती. हल्ल्यात मारल्या गेलेल्या सैफ अली मो.कमाल वय 24 या कपडा व्यापार्‍याची अंत्ययात्रा अचलपूर शहरातून निघाली. त्याच्यावर अंत्यसंस्कार सोमवार 30 सप्टेंबरलाच संध्याकाळी करण्यात आले. तर श्यामा खोलापुरे यांच्यावर मंगळवारी परतवाडा हिंदु स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तिसर्‍या मो. अतिक मो. रफीक यांच्यावर मंगळवारी दुपारी 2 वाजता तगडया पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले.
 
 
 
 
अमरावती येथे गंभीर जखमी असलेल्यांवर उपचार सुरु असून श्यामा खोलापुरे हत्याकांडातील 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर दूसर्‍या गुन्ह्यात 7 जणांना अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींचा कसोशीने तपास सुरू आहे. परतवाडा शहरातील मुघलाई, पेन्शनपुरा, गटरमलपुरा, महावीर चौक या भागात तणावाची स्थिती असून तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. तसेच जयस्तंभ चौकाकडून शहरात आत जाण्यास पोलिस मज्जाव करीत आहे. तसेच जुळ्या शहरातील सर्वच दुकाने, प्रतिष्ठान , शाळा महाविद्यालये बंद होती. घडलेल्या घटनेचा सर्वच समाजातून निषेध व्यक्त केला जात आहे. परिस्थितीचा आढावा घेऊन संचारबंदी आणखी 24 तासासाठी वाढविण्यात आली आहे.
 
पालकमंत्र्यांनी घेतला अचलपूरचा आढावा
अचलपूर-परतवाडा या जुळ्या शहरात निर्माण झालेल्या तणावपूर्ण स्थितीचा आढावा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी मंगळवारी तेथे जाऊन घेतला. शांतता ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले असून पोलिसांना आवश्यक त्या सर्व सुचना त्यांनी दिल्या आहे. दूसरीकडे कालच्या घटनेतील दोनही बाजुच्या तक्रारीवरून अटक करण्यात आलेल्या आरोपींना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. परतवाडा येथून 2 ऑक्टोबरपासून सुरू होणारी चिखलदरा देवीदर्शन पदयात्रा रद्द करण्यात आली आहे. जुळ्या शहरातली स्थिती तणावपूर्ण असून नियंत्रणात आहे.