भरधाव ट्रकने शाळकरी विद्यार्थीनीस चिरडले

    दिनांक :01-Oct-2019
कारंजा लाड,
एका भरधाव ट्रकने शाळकरी विद्यार्थीनीस चिरडल्याची घटना कारंजा शहरातील बायपास परिसरातील झाशीराणी चैकात 1 ऑक्टोंबर रोजी सकाळी 9 वाजताच्या दरम्यान घडली.
प्राप्त माहितीनुसार एमपी 09 1757 क्रमांकाचा ट्रक मुर्तिजापूरहून दारव्ह्याकडे जात असतांना ट्रकसमोर असणार्‍या सायकलला ट्रकने मागून धडक दिली. या धडकेत सायकलवरील मुलगी ट्रकच्या चाकाखाली आल्याने तीचा जागीच मृत्यू झाला. आरती मनोज मोघाड असे मृत्यू झालेल्या शाळकरी विद्यार्थीनीचे नाव असून ती शिक्षक मनोज मोघाड यांची कन्या होती. अपघाताची माहिती मिळताच सर्वधर्म आपतकालीन संस्थेचे शाम सवाई यांनी रूग्णवाहिका व आपल्या चमूसहित घटनास्थळ गाठले व त्या शाळकरी विद्यार्थीनीस कारंजा उपजिल्हा रूग्णालयास आणले. परंतु त्यापुर्वीच तीची प्राणज्योत मालवली होती. आरती ही कारंजा येथील कंकुबाई कन्या शाळेत इयत्ता नववीत शिकत हेाती. 1 ऑक्टोंबर रोजी ती तालुका क्रिडा संकुल मार्गावरून आपल्या घरी बालाजी नगरीत जात असतांना ही दुर्दैवी घटना घडली.
 
 
 
दरम्यान कुटुंबियांनी व नातेवाईकांनी ट्रकचालकासह कर्तव्यावरील वाहतूक पोलिसांवर कारवाईसाठी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच घटनेची तीव्रता पाहून पुरोगामी शिक्षक संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी कारंजा शहर पोलिस टेशनमध्ये धाव घेवून सदर घटनेसंदर्भात कारवाई करण्यासाठी आग्रह धरला. त्यानंतर अपघातग्रस्त ट्रक ताब्यात घेऊन ट्रकचालकाला शोधण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे. शिवाय बायपास परिसरात गतीरोधक बसविण्यासाठी पोलिसांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम उपविभागास पत्र देण्यात आले आहे. शिवाय वाहतूक पोलिसांच्या संख्येत वाढ करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सर्व उपाय योजना करण्यात येईल. तसेच चैकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस उपअधिक्षक एस डी पाटील यांनी दिल्याने अखेर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.
2 ऑक्टोंबर रोजी दुपारपर्यंत मृतविद्यार्थींनीस न्याय न मिळाल्यास कारंजा शहरातील बायपास चैक बंद करण्याचा ईशारा कुटंबियांसह नातेवाईकांनी दिला आहे.