शेतकऱ्यांच्या जीवावर उद्योगपतींना संरक्षण देणारे सरकार; शरद पवारांचा घणाघात

    दिनांक :10-Oct-2019
हिंगणघाट,
विद्यमान केंद्र व राज्य सरकार हे शेतकरी व कामगार विरोधी असून उद्योगपतींची करोडो रुपयाची कर्ज माफ करून कष्टकरी शेतकऱ्यांना मात्र देशोधडीला लावीत आहे असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज हिंगणघाट येथील विशाल जाहीर सभेत बोलताना केला. 

 
 
येथील गोकुळधाम मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजू तिमांडे यांच्या निवडणूक प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत पवार बोलत होते. देशातील 70 टक्के लोक हे शेती करतात त्यांचा विचार न करता केवळ मुठभर उद्योगपतींच्या भल्यासाठी हे सरकार काम करीत आहे. आज मुंबईसारख्या महानगरातील गिरणी उद्योग बंद करून त्याठिकाणी ४० मजली इमारती उभ्या होत आहे, हेच षडयंत्र हिंगणघाट सारख्या शहरातही राबविण्यात येणार आहे. सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम सरकारचे आहे परंतु आज सरकार नावाची यंत्रणा ही उद्योगपतींची वेठबिगार झाली आहे. आम्हाला लोकांचे आर्थिक जीवनमान सुधारायचे आहे त्यासाठी कारखानदारी नव्याने सुरू करून शेतीला पुनर्जीवित करण्याची गरज आहे, तरच तरुण पिढीचे भविष्य उज्वल व सुरक्षित होईल असे पवार म्हणाले.
 
 
आज महाराष्ट्रातील सोळा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या परंतु त्याविषयी कोणती उपाययोजना करायला सरकारला वेळ नाही केवळ आपल्या विरोधकांना संपविण्यासाठी त्यांच्यावर खोट्या केसेस टाकून गुन्हे नोंदवण्याचे काम हे सरकार करीत आहे, असा आरोपही पवार यांनी केला.