मला फ्रीडम हवंय

    दिनांक :10-Oct-2019
‘‘कोणाचा फोन होता रे राज?’’
‘‘अगं मित्राचा होता’’
‘‘काय म्हणाला? आणि तू कुठे निघाला?’’
‘‘काम आहे त्याचं थोडं आलोच मी जाऊन’’
हा संवाद आज राज आणि त्याच्या आईमध्ये झाला. आईने दुसर्‍या दिवशी सकाळी चहा घेताना राजच्या बाबांकडे हा विषय मांडला.‘‘अहो! आजकाल आपला राज फार बदललाय हो, हल्ली पहिलेसारखा नाही वागत. कोणाचा फोन होता, कोण काय म्हणालं काहीच नाही सांगत. आधी शाळेतून आला की त्याचं चालू व्हायचं, आई आज आम्ही हे केलं, आज आम्ही असं केलं, आज मित्रांनी मला हे सांगितलं, ते सांगितलं आणि बरेच काही आता का बरं हो बदलला असेल? कोणी त्याचे कान तर नसेल ना भरत, आपल्यापासून दुरावणार तर नाही ना हा?’’ 

 
 
‘‘अगं एवढा टोकाचा विचार का करतेस? या वयात मुलांना थोडी मोकळीक हवी असते. थोडी स्पेस हवी असते. हा केवळ वयाचा बदल आहे. एवढा विचार करू नकोस आणि ओव्हर प्रोटेक्टिव्ह पण होऊ नकोस. स्वातंत्र्य ही मनाची एक अवस्था आहे आणि त्यासोबतच निर्णयाची जबाबदारीही तो घ्यायला शिकेल. अजून किती काळ आपण त्याला पुरणार आहोत? तो स्वतंत्रपणे विचार करायला लागला की त्याला स्वतःची ओळख प्राप्त होईल, त्याचा आत्मविश्वास वाढेल आणि जगाला सामोरे जाण्याचे बळ येईल. आता त्याचा विचार सोड आणि त्याच्याबरोबर मैत्रिणीसारखी राहा. आपण त्याच्यावर केलेल्या संस्कारांवर विश्वास ठेव. कुठल्याही नात्यात प्रेमापेक्षा विश्वास जास्त महत्वाचा असतो. त्याचं कसं चुकलं, आपलं कसं बरोबर आहे, हे पटवण्यापेक्षा त्याचं कुठं चुकतंय हे आपण त्याला समजवायला हवं. मित्रांबरोबर जसं तो शेयर करतो, तसं त्यानं आपसूकच आपल्याबरोबरही शेयर करायला हवं. आपण मुलांना पंख आल्यावर झेप घेऊ देण्याऐवजी बांधून ठेवतो, कारण ते दूर उडून नको जायला. येथे मोह प्रेमापेक्षा वरचढ ठरतो आणि हा मोह आपल्या आणि मुलाच्या नात्यात एक अडथळा निर्माण करू शकतो. वाढ आणि विकास हिच जीवनाची प्रत्यय आहेत’’.
 
 
‘‘व्यक्ती स्वातंत्र्य आणि ते ही यौवनात! प्रत्येकाचे या बाबतीत वेगळे विचार आहेत. मग कोण चूक, कोण बरोबर? कोणास स्वातंत्र्य द्यावं आणि कोणाला आपल्या आश्रयाखाली वाढवावं हे चर्चेचे हॉट टॉपिक्स आहेत. सर्वप्रथम स्वातंत्र्य म्हणजे काय? व्यक्त होण्याची मुक्तता म्हणजे स्वातंत्र्य. कुठलिही संवेदना व्यक्तकरताना त्यावर बंधन नसणं म्हणजे स्वातंत्र्य. स्वातंत्र्य हे कुठल्याही प्रकारचं लायसन्स नसून काय बरोबर अन्‌ काय चूक, हे अचूक हेरण्याचे शहाणपण होय. त्यामुळे मी अठरा वर्षांचा झालो, तर मला आता फ्रीडम द्या, अशी मागणी करणे योग्य नाही. स्वातंत्र्य हे अमूल्य असतं. म्हणून ते अनुभविताना त्याची िंकमत उलगडत जाते आणि प्रत्येक पावलावर ती मोजावीच लागते’’.
 
 
‘सेल्फ अॅनालिसिस इज द बेस्ट अॅनालिसिस’. बुद्धी व नितीमूल्यांचा र्‍हास होऊ द्यायला नको, याची काळजी मात्र घ्यायला हवी. एका मुठीत पाण्याला जरी बंद केलं, तरी पाणी बरोबर आपला मार्ग शोधून बाहेर निघतं. आपण मुलांवर प्रेम करतो, त्यांना आपण आपल्या नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करतो. यामागचा हेतू एवढाच असतो, की आपल्या मुलाचं काही वाईट नको व्हायला. पण या प्रकियेमध्ये मुलं आपल्यापासून दुरावू शकतो. म्हणून मुलांमध्ये स्वतंत्र विचार करण्याची कुवत निर्माण करायला हवी. मात्र केवळ तू लहान आहेस, हे टॅग आपण मुलांना लावून त्यांना विषयांपासून दूर नेतो. त्यांना त्यांचे मतं व्यक्त करण्याची मुभा दिली तरं ते व्यक्तीस्वातंत्र्य समजतील आणि आपले विचार सर्वांसोबत शेअर करतील. आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याच्या पिंजरा’, हे गात आपल्या पाखराच्या गगनभरारीची तयारी करायला हवी!