पवारांच्या सभेला चोरीची 'पॉवर'; वीज वितरणाची कारवाई

    दिनांक :10-Oct-2019

वर्धा,
हिंगणघाट येथील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार राजू तिमांडे याच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, या सभेत वापरण्यात आलेला विद्युत पुरवठा जवळच्या खांबावर आकडा टाकून चोरी करण्यात आला होता. नेते मंडळीच्या सभेला अशा प्रकारे अवैध मार्गाचा अवलंब करत विद्युत पुरवठा घेतल्याने हा विषय चांगलाच चर्चेला गेला.
 
 
वर्धा जिल्ह्यातील प्रचाराची सुरुवात आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सभेने झाली. हिंगणघाट येथील आघाडीचे उमेदवार राजू तिमांडे याच्या प्रचारार्थ ही जाहीर सभा घेण्यात आली होती. शहरातील गोकुलधाम मैदानावर गुरुवारी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. 

 
 
यावेळी राष्ट्रवादीचे माजी आमदार राजू तिमांडे यांच्या प्रचार सभेचे नारळ फोडण्यात आले. या सभेला वीजेच्या खांबावरून आकडा टाकून वीज पुरवठा घेण्यात आला. अशाप्रकारे चोरी करून विद्यूत पुरवठा घेत सभा पार पडली. मात्र, नेते मंडळीच्या सभेला अशा प्रकारे अवैध मार्गाचा अवलंब करत विद्युत पुरवठा घेतल्याने हा विषय चांगलाच चर्चेला गेला. यावेळी छोटे जनरेटरसुद्धा सभास्थळी ठेवण्यात आले होते. पण सभा ही चोरी करून घेण्यात आलेल्या विद्युत पुरवठ्यावर पार पडली. 

 
 
वीज वितरण कंपनीच्या अभियंत्याला याबद्दलची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी कुठल्याही परवानगीशिवाय हुक टाकून विद्युत पुरवठा घेण्यात आले असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे विद्युत अधिकाऱयानी सदर विद्युत पुरवठा खंडित करून वायर ताब्यात घेतला. तसेच वीज चोरी कायद्याअंतर्गत याची नोंद घेऊन त्यानुसार कारवाईची तरतूद केली जाईल अशी माहिती वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता एच.एम. पाटील यांनी दिली.