राहुल गांधी करणार महात्मा गांधींचे स्वप्न पूर्ण!

    दिनांक :10-Oct-2019
दिल्ली वार्तापत्र
शामकांत जहागीरदार
 
महाराष्ट्र आणि हरयाणात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अकरा दिवस उरले असताना काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सर्व उमेदवारांना वार्‍यावर सोडून परदेश दौर्‍यावर निघून गेले. राहुल गांधी यांना परदेश दौर्‍यावर जाण्याचा अधिकार निश्चितच आहे. मात्र प्रत्येक वेळी ते चुकीच्या मुहूर्तावर परदेश दौर्‍यावर जातात, त्यामुळे त्यांचा प्रत्येक परदेश दौरा हा वादाच्या भोवर्‍यात सापडतो.
 
 
कधी ते संसदेचे अधिवेशन सुरू असताना, तर कधी विधानसभा निवडणुकीचे मतदान जवळ आले असताना परदेश दौर्‍यावर जातात. त्यामुळे विरोधी पक्षालाच नाही, तर त्यांच्या पक्षातील नेत्यांनाही राहुल गांधींवर टीका करण्याची संधी मिळते. नव्हे, राहुल गांधी अशी संधी सगळ्यांनाच उपलब्ध करून देतात.
 
 
आमचे नेतेच पक्षाला वार्‍यावर सोडून गेले, ही आमची सर्वात मोठी समस्या असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री सलमान खुर्शीद यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांच्या राजीनाम्याने काँग्रेससमोरील समस्या आणखी वाढल्या असल्याचेही खुर्शीद म्हणाले. खुर्शीद जे बोलले ते 100 टक्के खरे आहे. काँग्रेस पक्षात काहीही बोलले तर चालून जाते, तुम्ही वाट्‌टेल ते बोलून काँग्रेस पक्षाला अडचणीत आणा, तुमच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही; पण तुम्ही खरे बोलून काँग्रेसच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे काँग्रेस पक्षाचा फायदा होणार असला, तरी तुमच्यावर कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही. मात्र, शिस्तभंगाच्या कारवाईचा धोका पत्करूनही खुर्शीद खरे बोलले, त्यामुळे त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. 

 
 
लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या दारुण पराभवाची जबाबदारी घेऊन राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. नेता तोच असतो, जो पक्षाच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून कठीण परिस्थितीतही पक्षातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना हिंमत देतो. त्यांच्यातील आत्मविश्वास ढासळू देत नाही. आज काँग्रेस पक्षातील नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आपला आत्मविश्वास गमावला आहे. महाराष्ट्र आणि हरयाणातील विधानसभेच्या निवडणुका औपचारिकता म्हणून काँग्रेस पक्ष लढवत असला, तरी आपला पराभव त्याने निकालाच्या आधीच मान्य केला आहे. काँग्रेस पक्षाची एवढी वाईट स्थिती आजपर्यंत कधीच झाली नाही. काँग्रेस पक्षात आपल्याला भविष्य नसल्याची खात्री पटल्यामुळेच अनेक नेते काँग्रेसचा राजीनामा देत भाजपात प्रवेश करत आहेत.
 
 
1984 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव झाला होता, पक्षाला फक्त दोन जागा जिंकता आल्या होत्या. अटलबिहारी वाजपेयींसारख्या नेत्याचाही त्या वेळी पराभव झाला होता. मात्र त्याही परिस्थितीत अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणींसारख्या नेत्यांनी हिंमत हारली नव्हती, आत्मविश्वास गमावला नव्हता. भाजपाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाचा राजीनामा देत दुसर्‍या कोणत्याही पक्षात प्रवेश केला नव्हता, तर ‘फिर सुबह होगी’ म्हणून नव्या उत्साहाने सगळे जण कामाला लागले होते. त्यामुळेच भाजपाचा प्रवास दोनवरून स्वबळावर तीनशेतीनपर्यंतचा झाला, तर काँग्रेसचा प्रवास चारशेपाचवरून 44 वर आला! हा दोन पक्षांच्या नेतृत्वातील आणि संस्कृतीतील फरक आहे.
 
 
राहुल गांधी हे काँग्रेस पक्षासाठी असून अडचण नसून खोळंबा झाले आहेत. कोणत्याही कर्तृत्वाशिवाय मिळालेले काँग्रेसचे अध्यक्षपदही त्यांना सांभाळता आले नाही, पक्षाला पुढे नेता आले नाही. नेत्यांचे काम पक्षाला नवी दिशा देण्याचे आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचे असते. पण, स्वत:च आत्मविश्वास गमावून बसलेले राहुल गांधी पक्षाच्या नेत्यांत आणि कार्यकर्त्यांत कुठून आत्मविश्वास निर्माण करणार?
 
 
राहुल गांधींनी आपल्याच हाताने आपली जी पप्पूची प्रतिमा निर्माण केली, ती त्यांना शेवटपर्यत तोडता आली नाही, उलट या प्रतिमेत ते जास्त गुंतत गेले. असे करून त्यांनी स्वत:सोबत पक्षाचेही नुकसान करून घेतले. त्यामुळे आज काँग्रेस पक्षात राहुल गांधी यांची जेवढी खिल्ली उडवली जाते, तेवढी अन्य कोणत्याच अध्यक्षाची उडवली गेली नसावी.
 
 
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नसता तर काँग्रेस पक्षाचे आज जेवढे नुकसान होत आहे, तेवढे झाले नसते. काँग्रेस पक्षातून धरण फुटल्याच्या वेगाने आऊटगोईंग सुरू झाले नसते. घराणेशाहीतून तुम्हाला पक्षाचे नेतृत्व करण्याची संधी मिळते, पण मिळालेल्या संधीचे सोने करण्याची क्षमता तुम्हाला सिद्ध करावी लागते. अशी क्षमता तुम्ही सिद्ध केली नाही, तर तुमचा राहुल गांधी होत असतो!
 
 
त्यामुळेच महाराष्ट्र आणि हरयाणात विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू झाल्यावर काँग्रेसचे बहुतांश उमेदवार, आम्ही आमचे पाहून घेऊ, कृपा करून राहुल गांधींना आमच्या मतदारसंघात पाठवू नका, अशी विनंती करत आहेत. कोणत्याही राजकीय नेत्याच्या जीवनात अशी वेळ येणे म्हणजे त्याने ‘चुल्लूभर पानी में डुब के’ मरण्यासारखी स्थिती असते. नवज्योेतसिंग सिद्धूचा तर राहुल गांधी झाला नाही, मात्र राहुल गांधींचा नवज्योेतसिंग सिद्धू झाला आहे. म्हणजे कृपा करून सिद्धूला आमच्या प्रचारासाठी पाठवू नका, असे काँग्रेसचे उमेदवार म्हणत आहेत.
 
 
काँग्रेसपक्षात आज बेदिली माजली आहे. नेतृत्वाचा धाक कुणाला उरला नाही. त्यामुळे अंतरिम अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी यांच्या रायबरेली मतदारसंघातील काँग्रेसच्या नेत्या अदितीसिंह यांनाही पक्षाचा आदेश मोडायची हिंमत झाली नसती. महात्मा गांधींच्या दीडशेव्या जयंतिनिमित्त आयोजित केलेल्या उत्तरप्रदेश विधानसभेच्या अधिवेशनावर बहिष्कार घालण्याचा काँग्रेसपक्षाचा आदेश मोडून अदितीसिंह त्या अधिवेशनात सहभागी झाल्या. हरयाणा काँग्रेसचे माजी अध्यक्ष अशोक तंवर आणि मुंबई प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपमसारख्या दुय्यम दर्जाच्या नेत्यांची काँग्रेसच्या नेतृत्वावर हल्ला करण्याची हिंमत झाली नसती.
 
 
काँग्रेसपक्षाच्या या सद्य:स्थितीसाठी राहुल गांधी जबाबदार आहेत. अध्यक्षपदाचा राजीनामा देत या जबाबदारीतून पळ काढण्याचा प्रयत्न राहुल गांधी यांनी केला असला, तरी यातून त्यांना स्वत:ची सुटका करून घेता येणार नाही. राहुल गांधी यांच्या अशा धरसोडपणाच्या स्वभावामुळे काँग्रेसला लोकसभा निवडणुकीतील आपल्या पराभवाचे आत्मचिंतनही करता आले नाही. कारण, सर्व लक्ष राहुल गांधी यांच्या राजीनाम्यावर केंद्रित झाले होते.
 
काँग्रेस पक्षाने असे आत्मचिंतन केले असते, तर पक्षाचे एवढे नुकसान झाले नसते, काँग्रेस पक्षाला सावरायची संधी मिळाली असती. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या सद्य:स्थितीसाठी राहुल गांधीच जबाबदार आहेत. आज सलमान खुर्शीद यांनी याची जाणीव करून दिली आहे, उद्या आणखी अनेक नेत्यांनी हाच राग आळवला, तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. कारण वस्तुस्थितीपासून फार काळ तुम्ही पळ काढू शकत नाही.
 
प्रकृती अस्वास्थ्यामुळे श्रीमती सोनिया गांधी यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडत, ती जबाबदारी राहुल गांधींकडे सोपवली. सोनिया गांधींच्या काळात तरी काँग्रेसचे अच्छे दिन सुरू होते, मात्र राहुल गांधींकडे नेतृत्व आल्यापासून काँग्रेसचे बुरे दिन सुरू झाले. हे बुरे दिन काँग्रेसला कुठे नेणार, हे सांगता येत नाही.
 
काँग्रेसला सत्तेवर आणण्याचे पक्षातील नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचेे स्वप्न राहुल गांधी पूर्ण करू शकतील काय, हे सांगता येणार नाही, मात्र महात्मा गांधी यांचे एक स्वप्न मात्र राहुल गांधी निश्चितच पूर्ण करतील, यात शंका नाही. काँग्रेस विसर्जित करण्याचे स्वप्न महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पाहिले होते, किमान तेवढे तरी स्वप्न राहुल गांधी आपल्या कर्तृत्वाने पूर्ण करतील, याबद्दल आता कुणाच्याच मनात शंका राहिली नाही! सलमान खुर्शीद यांच्या बोलण्याचा रोखही तोच आहे...
 
9881717817