'पुतण्या'च निघाला 'काका'चा खूनी

    दिनांक :10-Oct-2019
सडक अर्जुनी,
डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या रेंगेपार (पांढरी) गावातील एक इसम शेतात डुकरांपासून धानाचे संरक्षण करण्यासाठी रात्री गेला असताना त्याचा खून करण्यात आला. याबाबत डुग्गीपार पोलिसांनी आपली तपासचक्रे फिरवून अवघ्या काही तासांतच शोध घेत आरोपीला अटक केली. या घटनेत पुतण्यानेच काकाचा खून केल्याचे उघड झाले आहे. 

 
 
सविस्तर बातमी अशी की, रेंगेपार (पांढरी) या गावातील मनोहर नंदलाल उईके हे आपल्या शेतात धानपिकांचे डुकरांपासून संरक्षण करण्यासाठी बुधवार (९ ऑक्टोबर) रोजी रात्रीच्या वेळी गेले होते. दरम्यान कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांच्या डोक्यावर, गळ्यावर व हातांवर धारदार शस्त्राने वार करून खून केला. ही माहिती गावचे पोलीस पाटील कृष्णकुमार गोपचे यांनी डुग्गीपार पोलीस ठाण्यात गुरूवार (१० ऑक्टोबर) रोजी सकाळच्या सुमारास दिली. ठाणेदार विजय पवार यांनी सदर माहिती तात्काळ आपल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिली. यावर पोलिस तात्काळ रेंगेपार येथील घटनास्थळी पोहोचले. 
 
 
घटनास्थळावर अज्ञात आरोपींच्या पायांचे ठसे आढळून आले. त्यांनी तात्काळ गोंदिया येथील पोलिस नियंत्रण कक्षास माहिती देऊन डॉग स्कॉड व फिंगरप्रिंट तज्ञ यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. तसेच मृतकाचे कोणाशी वाद किंवा भांडण होते का? याबाबत पोलिसांनी माहिती घेतली. यात मृतकाचा नात्याने पुतण्या असलेला तथा त्याच गावात राहणारा व मृतकाच्या शेताजवळ शेत असलेल्या कन्हैया ताराचंद उईके याचे नाव समोर आले. मृतकाने डुगगीपार पोलीस ठाण्यात शेताचे वाटणीवरून कन्हैया उईकेविरुद्ध फेब्रुवारी २०१९ मध्ये तक्रार दिलेली होती व त्यात त्यास पोलिसांनी अटकसुद्धा केलेली होती, अशी माहिती मिळाली. पोलिसांनी कन्हैयाचे घर गाठून त्याला ताब्यात घेतले.
 
 
डॉग स्कॉडने दाखविलेला रस्ता, घटनास्थळी मिळून आलेले फूटप्रिंट, मृतक आणि आरोपी यांच्यातील जुने भांडण या मुद्यांवर पोलिसांनी आरोपीची चौकशी केली. यात आरोपीने गुन्हा केल्याचे कबूल केले. त्यामुळे सदर गुन्हा तीन तासात उघडकीस आला. गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय पवार करीत आहेत.