विजयादशमीचे पाथेय...

    दिनांक :10-Oct-2019
विजयादशमीच्या, सरसंघचालकांच्या भाषणाकडे सार्‍या जगाचे लक्ष लागलेले असते, ही काही आजचीच बाब नाही. संघाशी संबंधित मंडळी सत्तेत आहेत म्हणून जग त्यांच्या भाषणाकडे डोळ्यांत जास्त तेल घालून बघतेे, असेही नाही. संघाच्या स्थापनेपासूनच ही परंपरा चालत आलेली आहे. अगदी डॉ. हेडगेवारांनी आपल्या 8-10 सवंगड्यांसह महालातील मोहिते वाड्याच्या मैदानावर संघाची स्थापना केली तेव्हापासूनच ही परिपाठी चालत आली आहे. सरसंघचालकांचे विजयादशमीचे भाषण हे पुढील वर्षभरासाठी स्वयंसेवकांना पाथेय असते. पुढच्या वर्षीची दिशा मिळाल्याने स्वयंसेवक त्या मार्गाने काम करण्यास गतिशील होत असतात. त्याचप्रमाणे या देशाचा धर्म, परंपरा, संस्कृती, भाषा, राष्ट्रीय प्रतीके यासह येथील महापुरुष, ऋषी, मुनी, धर्मगुरू, समाजसुधारक आदींशी एकरूप झालेली प्रत्येक व्यक्ती त्यांच्या पाथेयाने प्रेरित होत असते. या सार्‍या बाबी लक्षात घेता, यावेळच्या विजयादशमीच्या भाषणात सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी उपस्थित केलेले मुद्दे जसे स्वयंसेवकांना दिशादर्शन करणारे होते, तसेच ते राष्ट्राप्रती असलेल्या कर्तव्याची जाणीव करून देणारे, चुकांवर बोट ठेवणारे आणि परिस्थितीशी समझोता करणार्‍यांची कानउघाडणी करणारेही होते. सरसंघचालकांनी अनेक राष्ट्रीय मुद्यांना स्पर्श केला आणि आंतरराष्ट्रीय परिस्थितीशी त्याची सांगडही घातली.

 
हिंदू ही जीवन जगण्याची पद्धती असल्याचे संघाने अनेकवार सांगून झाले आहे. पण, अजूनही संघविचारांच्या प्रामाणिकतेवर विश्वास नसलेली मंडळी या मुद्यावरून संघावर, हिंदूंवर टीका करण्याची, आसूड ओढण्याची संधी सोडत नाहीत. छोट्या-मोठ्या घटनांचा संबंध हिंदुत्वाशी जोडण्याचा नाहक प्रयत्न केला जातो. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आल्यापाासून हिंदुत्वावरील हल्ले अधिक तीक्ष्ण आणि टोकदार झाले आहेत. झुंडबळींवरून संघाला आणि सरकारलाही ठोकण्याचा प्रकार त्यातलाच आहे. याचा उल्लेख करून सरसंघचालकांनी या बाबी संघ आणि हिंदुत्वाशी जोडण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन आपल्या भाषणात केले. त्या आवाहनाची पार्श्वभूमी आहे. कारण, संघ कुठल्याही प्रकारच्या हिंसक कृत्यांना मान्यता देत नाही, ना त्याने कधी अशी कृत्ये केली, ना संघ भविष्यात हिंसक कारवायांचे कधी समर्थन करेल.
 
लोकशाहीवर विश्वास असणारी जगातील सर्वात मोठी कुठली संघटना असेल तर ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे, हे मान्य करावे लागेल. देशात वेळोवेळी झालेल्या झुंडबळींच्या घटनांचा या संघटनेने अहमहमिकेने निषेध केला असून, असे करणार्‍या व्यक्तींना िंकवा समूहांना, मग ते कुठल्याही धर्माचे का असेना, कायद्यानुसार शिक्षा करण्याच्या मागणीचे समर्थनही केले आहे. झुंडबळींच्या अनेक घटना कपोलकल्पित, हेतुपुरस्सर घडवून आणलेल्या आणि काही आपसी वैमनस्यातून घडल्याचे पोलिस तपासात आढळून आले आहे आणि विशेष म्हणजे जसा आरोप केला जातो की या घटनांना फूस लावण्याचे कामसंघ करतो, तो आरोपही आजवर सिद्ध झालेला नाही. ज्या राज्यांमध्ये कॉंग्रेसची सरकारे आहेत, तेथेही झुंडबळीचे प्रकार झाले, पण त्यातील एकाही प्रकरणात संघाचा दूरान्वयानेही संबध नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या सार्‍या परिस्थितीचा विचार करता, झुंडबळी अथवा ‘मॉब लिंचिंग’ हा प्रकार विदेशातून आयात केलेेला असल्याचेही सिद्ध झाले आहे. मध्ययुगीन मानसिकता बाळगणार्‍या जगातील अनेक देशांमध्ये असे ‘लिंचिंग’ आजही बघावयास मिळते, ही बाब दुर्लक्षित केली जाऊ नये. म्हणूनच अशा घटनांमध्ये सामोपचाराने वागण्याचा त्यांनी दिलेला सल्ला दिशादर्शन करणारा ठरावा. आपली राज्यघटना अशा प्रकारांचे समर्थन करीत नाही. त्यामुळे अल्पसंख्यक समाजाचे लांगूलचालन करण्यासाठी झुंडबळींच्या घटनांमागून हिंदूंवर शरसंधान करणार्‍यांपासून सावध राहण्याची गरज आहे.
 
सरसंघचालकांनी 370 कलम रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत करून, याबाबत सरकारने दाखविलेल्या धाडसाचे कौतुकही केले आहे. केंद्राची ही कृती खरोखरीच अभिनंदनीय म्हणावी लागेल. जे कलम या देशातील नागरिकांना दुहेरी दर्जा देणारे, एकमेकांबद्दल दुजाभाव प्रकट करणारे, देशहिताच्या आड येणारे, दोन राज्यघटनांवर विश्वास ठेवायला सांगणारे, दोन राष्ट्रध्वजांचे समर्थन करणारे, देशातील शंभराहून अधिक कायदे नाकारणारे, जम्मू-काश्मीरच्या लोकांमध्ये विघटनवादी विचारांची पेरणी करणारे, दहशतवादाला खतपाणी घालणारे आहे, ते कलम जायलाच हवे होते. वाचकांना याची जाणीव असेल की, अगदी पंडित नेहरूंपासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत आणि श्यामाप्रसाद मुखर्जींपासून अटलजी-अडवाणींपर्यंत सार्‍या राष्ट्रीय नेत्यांनी या कलमाला विरोध केलेला होता. पण, मोदी-शाह यांच्या जोडीने हे कलम हटविण्याचे जे धाडस दाखविले, ते एकमेवाद्वितीयच म्हणायला हवे. या राज्यातील जनतेला मुख्य प्रवाहात आणण्याचे मोठे काम या निर्णयामुळे होणार आहे. या कलमामुळे मागासवर्गीय, दलित, आदिवासींसह येथील महिलांच्या आणि विस्थापितांच्या मानवाधिकारांचे जे उल्लंघन होत होते, त्याचे निराकरण होणार आहे. जेव्हा काश्मिरी नागरिक खर्‍या अर्थाने उर्वरित भारतातील लोकांशी एकरूप होतील, देशाच्या राष्ट्रीय प्रवाहात सामील होतील, त्या दिवशी खर्‍या अर्थाने 370 कलम रद्द करण्याच्या उद्देशाची सफलता होईल, याकडेही सरसंघचालकांनी लक्ष वेधले आहे.
 
चांद्रयान मोहिमेचे समर्थन करताना सरसंघचालकांनी मोदी सरकारचे केलेले कौतुक, या संघटनेच्या राष्ट्रनीतीच्या अनुरूपच म्हणावे लागेल. ही मोहीम असफल ठरली असली, तरी पहिल्याच प्रयत्नात आणि जागतिक खर्चाच्या तुलनेत अर्ध्याने कमी पैसा खर्चून भारताने गाठलेली उंची निश्चितच गौरवास्पद म्हणावी लागेल. समाजात जाती-जातींमधून फूट पाडण्याच्या वाढलेल्या प्रवृत्तींविरुद्ध सरसंघचालकांनी मुद्दाम आसूड ओढले. भारतात जातिप्रथा व्यक्तीच्या व्यवसायावरून पडली असून, ती जुनी पद्धती आज एकविसाव्या शतकात कालबाह्य झालेली आहे. आज कुणाचे नाव नव्हे तर काम बोलते आणि नव्या जगाचा तोच मंत्र झाला असल्याचे पंतप्रधान मोदींनीही अधोरेखित केले आहे. त्यामुळे जातीवरून समाजात दुही निर्माण करण्याचे प्रयत्न हाणून पाडण्याची सरसंघचालकांनी घेतलेली भूमिका स्वागतार्हच म्हणावी लागेल.
 
 
संघात तर जातीला कुठलेच स्थान नाही. संघात जातीवरून कुणाला प्रवेश दिला जात नाही. उलट, संघात हिंदूंप्रमाणेच मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, पारशी लोकही आनंदाने सहभागी होत, या देशाच्या परमवैभवाची प्रार्थना करताना बघायला मिळतात. सरसंघचालकांनी स्वभाषा, स्वभूषा आणि स्वसंस्कृतीची केलेली घोषणा राष्ट्राच्या मजबुतीकरणासाठी गरजेची ठरावी. या देशातील शिक्षणाचे जे धिंडवडे निघाले आहेत, त्यात सुधारणा करण्याची गरज विजयादशमीच्या निमित्ताने व्यक्त करण्यात आली आहे. शिक्षणातील पाठ्यक्रमापासून, शिकवण्याच्या पद्धतीपर्यंत आमूलाग्र परिवर्तनाची गरज संरसंघचालकांनी व्यक्त केली आहे. याबाबत केवळ आराखडे बदलून काम भागणार नाही, तर त्यासाठी व्यवस्थेतच आमूलाग्र परिवर्तन केले जायला हवे. देशाची अर्थस्थिती, त्याबाबतची चिंता, हिंदू शब्दाबद्दल पसरवले जाणारे गैरसमज, छोट्या कुटुंबांमुळे निर्माण झालेल्या समस्या आदी अनेक विषयांवर सरसंघचालकांनी मांडलेले पाथेय म्हणूनच दिशादर्शक ठरावे...