बापूजींची स्त्रीसक्षमीकरणातील भूमिका...

    दिनांक :11-Oct-2019
डॉ. वर्षा गंगणे
 
महात्मा गांधींची अनेक कार्ये विविध उदाहरणांद्वारे वेळोवेळी स्पष्ट करण्यात येत असली, तरी त्यांचे स्त्रिया व त्यांच्या अधिकारांबाबत असलेली कार्ये तेवढी प्रकाशात आलेली नाहीत किंबहुना त्यावर उपहासात्मक व टीकात्मक चर्चा करण्यात आली. आज स्त्रीसबलीकरणाचा केला जाणारा विचार व कार्ये तसेच जे प्रयत्न केले जातात ते अनेक वर्षांपूर्वी गांधीजींनी केले. गांधीजींची स्त्रीसक्षमीकरणाबाबतची कार्ये, गांधी वाचताना लक्षात येतात. स्त्रीसक्षमीकरण या ज्वलंत व अत्यावश्यक मुद्द्यांची गरज आणि ओळख मोठ्या प्रमाणात आज चर्चेत आहे. स्त्रियांना आजही समानतेची पातळी लाभलेली नाही. त्यासाठी शासनाद्वारे अनेक उपक्रम व योजना राबविल्या जात आहेत. स्त्रियांना विकसित केल्यास कुटुंब व पर्यायाने देश विकसित होईल, हे समाजसुधारक व पुरोगामी विचारांच्या पुढार्‍यांना लक्षात आल्यामुळे, त्यांनी या मुद्द्याला उचलून धरले व दुजोराही दिला त्यापैकी म. गांधी हे एक होत. 

 
 
स्त्रीसक्षमीकरण म्हणजे काय?
माझ्या मते ‘‘स्त्रियांना मोकळा श्वास घेता येणे म्हणजे स्त्रीसक्षमीकरण होय.’’ स्त्रियांना एक मानवघटक म्हणून समानतेची वागणूक मिळणे म्हणजे स्त्रीसक्षमीकरण.. स्त्रियांना न्याय हक्क, अधिकार व स्थान याविषयी जाणीव निर्माण करून देणे व तशी वागणूक तिला मिळवून देणे म्हणजे स्त्रीसक्षमीकरण.
 
देशाची एक नागरिक म्हणून घटनेनुसार तिला बरोबरीचा दर्जा मिळणे म्हणजे स्त्रीसक्षमीकरण.
 
या व अशा काही व्याख्या लक्षात घेतल्यास महात्मा गांधींची स्त्रीसक्षमीकरणाबाबतची भूमिका अधिक स्पष्ट होते. गांधी हे पहिले व्यक्ती होते ज्यांनी स्त्रियांचे स्वातंत्र्य मान्य करीत, खांद्याला खांदा लावून स्वातंत्र्यचळवळीत सहभागी करून घेतले. राजकारणात स्त्रियांचा सहभाग वाढल्याशिवाय खर्‍या अर्थाने स्त्रीसक्षमीकरण साधता येणार नाही, हे विधान प्रयत्नपूर्वक त्या काळी गांधीजींनी प्रत्यक्षात आणले. संयम, ब्रह्मचर्य यांचे दाखले देत थक्क करणारी उदाहरणे याबाबत पुरेशी बोलकी आहेत. सत्याचे प्रयोग या त्यांच्या आत्मचरित्रात गांधी आणि त्यांच्या जीवनातील स्त्रीबाबतचा दृष्टिकोन याचा परिचय अत्यंत जवळून होतो आणि या थोर पुरुषाबाबत असणारा आदर अनेक पटींनी वाढतो.
 
महात्मा गांधींच्या जीवनातील अनेक घटना स्त्रीसक्षमीकरणास पोषक व समर्थनार्थ असल्याने दिसून येते. गांधीजींचे स्त्रीसक्षमीकरणाचे कार्यक्षेत्र व्यापक असले, तरी त्यावर प्रकाश टाकण्यात लेखकांनी हात आखडता घेतला आहे. काही ठळक घटनांवर प्रकाश टाकल्यास गांधीजींची स्त्रीसक्षमीकरणाबाबतची भूमिका स्पष्ट करता येईल.
 
वयाच्या 13 व्या वर्षी गांधीजींचा विवाह 14 वर्षीय कस्तुराबाईंशी झाला व पुढे त्या कस्तुरबा झाल्या. गांधीजींनी स्त्रीसक्षमीकरणाची सुरुवात आपल्याच कुटुंबापासून केली. गांधींच्या प्रत्येक आंदोलनात कस्तुरबा त्यांच्यासोबत होत्या. समानतेचे सर्व अधिकार त्यांना बहाल होते. राजकीय कार्यकर्त्या आणि नागरिकांच्या कल्याणासाठी हक्कांसाठी लढणार्‍या त्या एक स्वतंत्र्य सैनिक होत्या. गांधींनी सामाजिक चौकट मोडीत आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या कस्तुरासह संसार मांडला तसेच त्यांना बरोबरीचा मान देत त्यांच्या कायार्र्ंना प्रोत्साहन व प्रेरणा दिली. दृढता आणि एकनिष्ठतेची ती मूर्ती असून मोहनदासचा महात्मा बनविण्यात कस्तुरबाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे, हे त्यांनी मान्य केले होते.
 
दक्षिण आफ्रिकेतील ट्रान्सवाल सरकारने कर आकारण्याच्या विरोधात जो लढा देण्यात आला त्यात अनेक स्त्रियांनी बरोबरीने सहभाग घेतला. सत्याग्रहाद्वारे हा कर रद्द करण्यासाठी गांधीजींच्या पे्ररणेने हजारो स्त्रिया रस्त्यावर उतरल्या त्यापैकी काही तुरुंंगातदेखील गेल्या. अन्यायाविरोधातील लढ्यात स्त्रियांचा समान सहभाग, हे स्त्रीसक्षमीकरणास अत्यावश्यक असणारे उदाहरण होय.
 
विवाहविषयक कायदा
कायदेशीर (रजिस्टर्ड) विवाहाखेरीज इतर विवाहांना मान्यता नाही, असा सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाने आफ्रिकेत निर्णय दिल्यानंतर अनेक स्त्रियांनी यास विरोध दर्शविला. या निर्णयामुळे बहुतांश विवाह रद्द ठरवीत अपत्यांना वारसाहक्क नाकारण्यात आला. लग्नाच्या पत्नीलाही दुसर्‍या पत्नीचा दर्जा देण्यात आला. याविरुद्ध महिलांनी सत्याग्रह पुकारला. तेव्हा त्यांना नेटालची राजधानी मेरिसबर्ग येथे ठेवण्यात आले. नंतर या स्त्रियांनी स्वातंत्र्यलढ्यातदेखील सहभाग घेतला. येथेच वालियम्मा यांचे निधन झाले.
 
बलात्कारपीडित महिलेचा प्रश्न
गांधीजींनी जौहर प्रथेस विरोध केला. बलात्काराच्या भयाने केलेला जौहर योग्य आहे का? बलात्कारपीडित बांग्लादेशी आई-बहिणी व बायकोस कुटुंबाने स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी आपल्याच वेणीने फाशी लावून आत्महत्या केली. बलात्कारापूर्वी जौहर आणि बलात्कारानंतर आत्महत्या या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
दुसर्‍या महायुद्धानंतर सैनिकांनी शत्रुदेशातील स्त्रियांवर बलात्कार केले तेव्हा एकीने गांधींना पत्र लिहून तीन प्रश्न विचारले-
1. वाटेत राक्षसरूपी माणूस चालत्या स्त्रीवर बलात्कार करेल तर शील भंग होईल का?
2. ती तिरस्कारास पात्र आहे का?
3. जनतेने काय करावे?
1 मार्च 1942 रोजी गुजराती ‘हरिजनबंधू’ या पत्रिकेत गांधींनी या पत्रास उत्तर दिले की, अत्याचारग्रस्त कोणत्याही तिरस्कार व बहिष्कारास पात्र नाही. ती तर दयेची पात्र आहे. घायाळ आहे. तिची सेवा आपले दायित्व आहे. वास्तविक शील तिचे भंग होते ज्यासाठी ती स्वत: सहमत असते. शीलभंग हा बदनामीसूचक शब्द आहे. यावरून त्यांचे स्त्रियांबाबतचे सकारात्मक व सुधारणावादी विचार स्पष्ट होतात.
 
हरिजन महिलांना आव्हान- 14 सप्टेंंबर 1942 रोजी ‘हरिजन’ पत्रिकेतून, हरिजन महिलांना निर्भयता, आत्मबळ आणि नैतिक बळ मिळविणे आवश्यक आहे. असे आव्हान त्यांनी लेखणीद्वारे केले. आत्महत्येस विरोध करण्यासाठी पूर्ण ताकतीचा वापर करावा.
 
गांधीजींचे वक्तव्य
15 सप्टेंबर 1921 च्या ‘यंग इंडिया’त गांधीजींचे खळबळजनक वक्तव्य प्रकाशित झाले. ‘‘मी जर स्त्री असतो तर पुरुषांसाठी कधीच शृंगार केला नसता.’’ पुरुषांसाठी स्त्रीने शृंगार करावा, याला गांधींनी प्रखर विरोध केला. माणूस जेवढ्या वाईट प्रवृत्तींसाठी जबाबदार आहे, त्यापैकी सर्वात हीन प्रवृत्ती म्हणजे नारी जातीचा दुरुपयोग आहे. स्त्रियांनीदेखील स्वत:ला पुरुषांची भोगवस्तू मानणे बंद करावे. पुरुषांनी स्त्रियांना कळसूत्री बाहुली बनविले आहे आणि स्त्रियांनादेखील याची सवय झाली आहे. कारण पतनाच्या गर्तेत पडणारा माणूस आपल्यासोबत दुसर्‍यालाही ओढतो, त्यामुळे क्रिया सहज सोपी होते. या शब्दात त्यांनी पुरुषांच्या वाईट वर्तनांची िंनदा केली.
 
गांधींचे दृढ मत
2 मे 1936 च्या ‘हरिजन’च्या अंकात त्यांनी लिहिले- माझे दृढ मत आहे की, स्त्रियांनी आपल्या नवर्‍यांना नाही म्हणणे शिकले पाहिजे. त्यांना हे सांगितले जावे की, त्या पतीच्या हातातील कठपुतळ्या नसून त्यांचेही काही अधिकार व कर्तव्ये आहेत. यावरून गांधीजींचे स्त्रियांच्या सक्षमीकरणाबाबत विचार स्पष्ट होतात.
 
लोकशाही आणि महिला : गांधीजींच्या मते
लोकशाही आणि महिला यांचे अतूट नाते आहे. पुरुषांप्रमाणे सगळे हक्क, अधिकार व स्वातंत्र्य स्त्रियांनाही आहेत. त्यांनी हे अधिकार त्यांच्या संपर्कात असणार्‍या स्त्रियांना बहालदेखील केले होते. निर्णयक्षमतेत स्त्रियांना स्थान मिळावे, असे ते म्हणत.
 
आश्रमांची स्थापना
साधी राहणी उच्च विचारसरणीसह गांधीजींनी आश्रमांची स्थापना केली. त्यांची सचिव, डॉक्टर, फोटोग्राफर स्त्रियाच होत्या. यावरून पुरुषांप्रमाणे स्त्रियादेखील उत्तम पदे भूषवू शकतात, हे त्यांनी दाखवून दिले. निराधार व अत्याचारग्रस्तांना गांधीविचारांचे पालन करून आश्रमात आधार दिला जात असे.
 
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात गांधीजींसह लढणार्‍या, त्यांच्या तत्त्वांचे अनुसरण करणार्‍या काही स्त्रिया होत्या. त्यात प्रामुख्याने अॅनी बेझंट, सरोजिनी नायडू यांची नावे उल्लेखनीय आहेत. गांधींच्या विचारांनी प्रेरित होऊन अनेक विदेशी स्त्रियादेखील त्यांच्या अनुयायी बनल्या. त्यांच्याशी वागताना स्त्रीसक्षमीकरणाच्या प्रयत्नांचे अनेक दाखले गांधीजींनी जगापुढे ठेवले. गांधीजी एखादी सुधारणावादी गोष्ट स्वत: अंगीकारत आणि नंतर ती इतरांना सांगत, त्यामुळे त्यांच्या स्त्रियांबाबतच्या उदारमतवादीपणाला अनेकदा मान्यता मिळाली, तर अनेकदा त्याला विरोधदेखील झाला. त्यावर टीकेची झोडही उठली. वाईट चर्चाही झाली. चांगल्यापेक्षा वाईटाकडे बोट दाखविणार्‍यांना ‘गांधी समजलाच नाही,’ असे खरमरीत उत्तरही मिळाले. एखादी स्त्री आपल्यामुळे चर्चेत येत असेल तर आपण त्यापासून दूर होणे, तिच्यासाठी अधिक हिताचे असते, असा कठोर निर्णय ते सहजपणे घेत असत.
 
थोडक्यात, गांधी आणि स्त्रीसक्षमीकरण यांचा सखोल अभ्यास केल्यास त्यांच्या संपर्कातील प्रत्येक स्त्रीचा एक इतिहास असलेला दिसून येतो. त्यांना उजळ माथ्याने जगासमोर वावरता येण्यासाठी त्यांना आश्रमात राहण्याची परवानगी देण्यात आली. याची जाणीव त्यांच्या समग्र खंडांचा अभ्यास केल्यानंतर होते. स्त्रीसक्षमीकरणात आफ्रिका ते भारत या देशांत गांधीजींची भूमिका महत्त्वपूर्ण अशीच होती.
 
आज स्त्रीसक्षमीकरणासाठी अनेक योजना, धोरणे, आणि नियम शासन राबवीत आहे, तरीदेखील स्त्री सुरक्षित व उपेक्षित आहे. जगण्याचे संदर्भ बदलले असले, तरी तिला तिचे मूलभूत हक्क आणि अधिकार अजूनही मिळालेले नाहीत. मानवविकास निर्देशांकात भारताचा क्रमांक जगात 121 वा असला, तरी त्यात स्त्रियांची स्थिती व स्थान कसे आणि कुठे आहे? याचा विचार करणे गरजेचे आहे. स्त्रीसक्षमीकरणासाठी केवळ कायद्याची नव्हे, तर पे्ररणा व मानसिक आत्मबळाची गरज आहे, हे गांधीजींच्या तत्त्वज्ञानातून आत्मसात करण्याची नव्याने गरज आहे.
संदर्भसूची :
• गांधीदर्शन, डॉ. एम. के. मिश्रा, डॉ. कमल दाधिच, अर्जुन पब्लिशिंग हाऊस, नई दिल्ली
• गांधी से महात्मा गांधी तक, अनुवाद सत्याचे प्रयोग, प्रो. वीरेंद्रकुमार अग्रवाल, इंडियन बुक बँक
• महात्मा गांधी, मनोज कुमार, रवी रंजन, कल्पना प्रकाशन, नई दिल्ली.