भ्रष्टाचार मुक्त आणि विकसित महाराष्ट्रासाठी महायुतीला विजयी करा-अमित शाह

    दिनांक :11-Oct-2019
चिखली येथे विजय संकल्प सभा संपन्न 
 
चिखली, 
मतांच्या राजकारणापेक्षा आमच्यासाठी देशाचे ऐक्य व सुरक्षा सर्वोच्च असल्याने आम्ही काश्मिरातून कलम ३७० हटवले. त्या नंतरची ही पहिलीच निवडणूक असल्याने भाजपच्या प्रचारात हा मुद्दा येणे साहजिकच असल्याचे स्पष्टीकरण केंद्रीय गुह्मंत्री तथा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केले. आपल्या भाषणामध्ये अमित शाह यांनी बुलडाणा जिल्हा हा मॉ जिजाऊ यांचा जन्मस्थळ असणारा जिल्हा असून शिवाजी महाराजांना घडविण्याचे कार्य मॉ जिजाऊ यांनी केल्याचे त्यांनी सांगितले. अमित शाह यांची चिखलीत आज प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती.
  
सभेला संबोधित करतांना अमित शाह यांनी अनेक स्थानिक , प्रादेशिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मुद्द्यांना स्पर्श केला. केंद्रातील नरेंद्र मोदी आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने बुलडाणा जिल्ह्यासाठी केलेल्या विविध कामांचा उल्लेख गृहमंत्री शाह यांनी केला. घाटाखालील जिगाव सिंचन प्रकल्प, शेगाव विकास कृती आराखडा, मातृतीर्थ सिंदखेड राजा विकासासाठी ३७० करोड चा निधी , शेतकऱ्यांसाठी हजारो कृषिपंप जोडणी, बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेला केलेली १०० कोटींची मदत, अडीच लाख शेतकऱ्यांन दिलेली ६ हजार कोटींची पीककर्ज माफी, २ लाख १९ हजार शौचालये, पंतप्रधान आवास योजने अंतर्गत ११ हजार घरकुले अशी सर्व लोकहिताची कामे भाजपा सरकारने केल्याचे शाह म्हणाले. काँग्रेसच्या राजवटीमध्ये विदर्भासह महाराष्ट्रावर सतत अन्याय झाला. यामुळे बुलडाणा जिल्हा देखील मागास राहिला मात्र, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आमचे महायुतीचे सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही शाह यांनी दिली. येत्या २१ आक्टोंबरला होणाऱ्या मतदानातून जिल्ह्यातील भाजपा – शिवसेना महायुतीच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करून २ / ३ बहुमतासह देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री बनवण्याचे असे आवाहन अमित शाह यांनी सभेत उपस्थित जिल्ह्यातील हजारो मतदारांना केले.
 
 
 
बुलडाणा जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी चिखली येथे शुक्रवार, दि. ११ आक्टोंबर रोजी आयोजित विजय संकल्प सभेला मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. भ्रष्टाचार मुक्त आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी जिल्ह्यातील भाजपा – शिवसेना महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करून देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवा असे आवाहन शाह यांनी या सभेतून केले. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. प्रतापराव जाधव, भाजपचे जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे यांच्यासह जिल्ह्यातील भाजप व शिवसेनेचे सर्व उमेदवार व महायुतीतील पक्षांचे प्रमुख पदाधिकारी यावेळी मंचावर उपस्थित होते.
 
महाराष्ट्र विधानसभेच्या प्रचारासाठी आलेल्या अमित शाह यांची विदर्भातील पहिली सभा विदर्भातील भाजपाच्या एकमेव महिला उमेदवार श्वेताताई महाले यांच्या चिखली मतदारसंघात संपन्न झाली . या सभेला भाजपा – शिवसेना – रिपाई – रयत क्रांती संघटना – शिवसंग्राम व रासप महायुतीचे पदाधिकारी , लोकप्रतिनिधी , कार्यकर्ते व मतदार असा जिल्ह्यातून प्रचंड मोठा जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी सभामंचावर जिल्ह्यातील महायुतीचे उमेदवार भाजपचे डॉ .संजय कुटे ( जळगाव जामोद ), चैनसुख संचेती ( मलकापूर ), आकाश फुंडकर ( खामगाव ), श्वेताताई महाले ( चिखली ) व शिवसेनेचे डॉ. संजय रायमुलकर ( मेहकर ), डॉ. शशिकांत खेडेकर ( सिंदखेड राजा ) व संजय गायकवाड(बुलढाणा ) यांच्यासह भाजपाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. उपेंद्र कोठेकर, खा. प्रतापराव जाधव, भाजपचे जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे, शिवसेना सहसंपर्क प्रमुख भास्करराव मोरे, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजय कोठारी, सभेचे निमंत्रक सतीश गुप्त, सुरेशआप्पा खबुतरे, जिल्हा सरचिटणीस नंदू अग्रवाल, संतोष देशमुख, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, रिपाईचे जिल्हाध्यक्ष नरहरी गवई, शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष संदीप गायकवाड, रयत क्रांती संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत ढोरे पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह राजपूत, संजय चेके पाटील, भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे शेख अनीस, चिखलीच्या नगराध्यक्षा प्रियाताई बोंद्रे, उपनगराध्यक्षा वजीराबी शेख अनीस यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
अमित शाह यांचे मुख्य मार्गदर्शन सुरु होण्यापूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री व जळगाव जामोद मतदारसंघातील उमेदवार डॉ. संजय कुटे यांचे प्रास्ताविक झाले. तर सभेचे आभार प्रदर्शन करतांना चिखली मतदारसंघातील उमेदवार श्वेताताई महाले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील केंद्र व राज्य सरकारने बुलडाणा जिल्ह्यात विकासाचे नवे पर्व सुरु केल्याचे सांगितले. राज्यात पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार सत्तेत येणार असून आगामी काळात विकासाचा वेग आणखी वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.