भुलाबाई

    दिनांक :11-Oct-2019
अवंतिका तामस्कर
 
भारतातील प्रत्येक राज्यात सण आणि उत्सव साजरा करण्याची पद्धती ही त्या राज्यातील भौगोलिक विविधतेनुसार बदलत जाते. संस्कृतीत झालेले हे बदल त्या प्रांताची एक वेगळी ओळख निर्माण करत असतात. नवरात्र सुरू झाली की, विविध राज्यात वेगवेगळ्या प्रकारे देवीची आराधना केली जाते. महाराष्ट्रात विविध प्रांतात लोकसंस्कृती, कृषीसंस्कृतीमध्ये, लोकजीवनामध्ये वैविध्य आढळून येते. नवरात्र उत्सवाच्या विविध पारंपरिक पद्धती विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण, पश्चिम महाराष्ट्र या प्रांतातही आढळून येतात. 

 
 
कृषिसमृद्ध असे हे प्रांत त्यांचे वेगळेपण हे नेहमीच जपून ठेवतात. साधारणत: खरीप पिकांची पेरणी झाल्यानंतर पिकवलेल्या धान्यांच्या आगमनाने आनंदी झालेला शेतकरी त्यांच्या धान्याचे पूजन करतो. असाच एक विदर्भातील पारंपरिक उत्सव म्हणजे भुलाबाईचा सण. भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून हा सण सुरू होतो. गौराईप्रमाणे भुलाबाई म्हणजे एक माहेरवाशीण असते. या एक महिन्याच्या माहेरपणाला आलेल्या भुलाबाईसोबत भुलोजी म्हणजे भोळे शंकर आणि गणेश म्हणजे शिव-पार्वती यांचे पुत्र गणपती देखील येतात.
 
 
पार्वतीचा उत्सव म्हणून ओळखला जाणारा हा भुलाबाईचा उत्सव लहान मुला-मुलींसाठी विशेष असतो. ही भुलाबाई मातीपासून िंकवा सध्याच्या काळात प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या खेळण्याच्या स्वरूपात असते. अशी ही खेळणी घरात आणून संध्याकाळी सगळ्या मुली एकत्र गोळा होतात. प्रत्येकाच्या घरी जाऊन भुलाबाईची पारंपरिक लोकगीतांचे गायन, त्यांना भुलाबाईची गाणी असेही म्हणतात. ही पारंपरिक स्वरूपातील गाणी, म्हणजे केवळ मनोरंजनपर गाणी नसून सासरी गेलेल्या प्रत्येक मुलीची कहाणी असते. तिच्या जबाबदारीची ती जाणीव असते. माहेरी आल्यावर तिच्या जपलेल्या प्रत्येक आठवणींचे ते प्रतीक असते. ही गाणी गात असताना, घरातून प्रत्येकजण आपल्या घरातून भुलाबाईसाठी नैवेद्य घेऊन येतो.
 
 
हा नैवेद्य भुलाबाईसमोर ठेवून भुलाबाईची गाणी म्हटली जातात. आणि नंतर हा नैवेद्य खिरापत स्वरूपात वाटला जातो. ही बंद डब्यातील खिरापत ओळखणे म्हणजे लहानग्यांमध्ये एक स्पर्धा असते. त्या डब्याच्या आवाजावरून आतला खाऊ ओळखायचा आणि पदार्थाचे नाव सांगायचे. खिरापत िंजकल्याचा तो आनंद त्या बालकांसाठी खूप महत्त्वाचा असतो. या भुलाबाईच्या उत्सवात माहेरपणासाठी आलेल्या पार्वतीचे म्हणजे भुलाबाईचे लाड पुरवून तिला हवे ते सुख दिले जाते. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी भुलाबाईचं विसर्जन केले जाते. या भुलाबाईची पूजा मांडून विविध पाच धान्यांची खोपडी बनवली जाते. या पूजेमागील उद्देश म्हणजे शेतातील पिकलेल्या धान्यांचे पूजन असते. भुलाबाईसोबत वेगवेगळ्या प्रांतामध्ये उपलब्ध होणार्‍या धान्याची पूजा केली जाते. या पूजेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे 31 िंकवा 32 खिरापतींचा नैवेद्य दाखवला जातो. ग्रामीण भागात आजही या महिनाभराच्या भुलाबाईच्या उत्सवाची परंपरा पाहायला मिळते, तर शहरातील काही भागांमध्ये शेवटच्या 5 दिवसांकरिता ही भुलाबाई स्थापन केली जाते.