कोजागिरी पौर्णिमा!

    दिनांक :11-Oct-2019
प्रॉक्सी थॉट
पल्लवी खताळ-जठार
 
आज शाळेत ऑफ पिरेड लागला आणि मला लहान मुलांच्या वर्गावर जावे लागले अर्थात त्या वर्गाला मी जरी शिकवत नसले तरी तेवढा एक तास त्यांना एंगेज करून ठेवणे हे माझे काम होते अर्थात परवा कोजागिरी आणि हल्लीच्या मुलांना कोजागिरी म्हणजे नेमकं हे ठाऊकच नाही. आमच्या लहानपणी कोजागिरी पौर्णिमेचं महात्म्य आजी-आजोबा सांगत असलेल्या गोष्टीतून ऐकायला मिळायचं. गंमत म्हणजे दरवर्षी येणार्‍या इतर सणांप्रमाणेच कोजागिरी पौर्णिमाही आली, की आजी-आजोबांना पुन्हा तीच गोष्ट सांगायला गळ घातली जायची आणि दरवर्षी तिच गोष्ट ऐकून कंटाळाही येत नसे. अश्विन पौर्णिमा, शारदीय पौर्णिमा, नवान्न पौर्णिमा अशा काही नावांनी कोजागिरी पौर्णिमा ओळखली जाते. कोजागिरी म्हटलं, की आठवण होते वाफाळलेल्या दुधात अगदी सढळ हस्ते घातलेल्या जायफळ-काजू-बदाम-पिस्ता-चारोळी-केशरयुक्त मसाले दूधाची! या दिवशी या मसाले दूधाचं महत्त्व इतकं की, त्याशिवाय जणू कोजागिरीचा खरा आनंद अपूर्णच वाटायचा. 
 
 
आजही कित्येक घराघरातून कोजागिरीला न चुकता मसाले दूध बनवलं जातं. प्रथम चंद्राचं प्रतििंबब त्यात पाहून, त्याला नैवेद्य दाखवून, मगच ते सगळ्यांना दिलं जातं. हे सगळे सोपस्कार आजही अगदी मनोभावे केले जातात, पण ते त्या-त्या कुटुंबापुरते. मग घरी हातात मसाले दुधाचा पेला घेऊन भुरके मारताना आजी-आजोबा, आई-बाबा रमतात, ते गच्चीवर संपूर्ण सोसायटीतली माणसं एकत्र येऊन साजर्‍या होणार्‍या कोजागिरीच्या आठवणींमध्ये! कारण कोजागिरी एकत्र साजरी करण्यासाठी आता प्रशस्त गच्ची, उत्साह, आवड आणि मुळात सवड कोणाकडे आहे? आजी-आजोबा आणि आई-बाबाच कशाला, आताच्या साधारण पंचविशी ओलांडलेल्या पिढीच्याही कोजागिरीच्या आठवणी अगदी ताज्या असतील. त्यांनीही लहानपणी कोजागिरीची धम्माल अनुभवली असेल की!
 
 
गावोगावी शेतीची कामं अर्ध्यावर झालेली, तयार झालेली पिकं वार्‍यावर डोलू लागली, पाऊसही परतीच्या वाटेवर निघालेला. काही भागात नवीन पिकं (नव धान्य) हाताशी आलेली (कापणीस तयार) असतात. ग्रामीण भागात ही पौर्णिमा नवान्न पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. हस्त नक्षत्राची अखेर आणि शरद ऋतूचं आगमन आणि त्यात येणारी ती शरद पौर्णिमा. वर्षा ऋतूनंतर आकाश निरभ्र झाल्यावर येणारी ही पहिली पौर्णिमा. ग्रामीण भागात दिवसभर शेतात कापणीची काम केल्यावर शरद पौर्णिमेच्या रात्री शेतात खळं (अंगणाप्रमाणे मोकळी जागा) तयार करून त्या जागेत कापणी केलेल्या धान्याच्या राशी एकावर एक रचल्या जातात. त्या राशीवर चंद्राला नैवेद्य दाखवण्यासाठी दुधाचं पातेलं ठेवलं जातं. त्यानंतर चंद्र दर्शन घेऊन, नैवेद्य दाखवलेलं दूध प्रत्येकाला वाटलं जातं. धान्याच्या राशींचीही पूजा केल्यावर मगच ते धान्य कोठारापर्यंत नेलं जातं. तसंच चंद्र आकाशात मध्यावर येईपर्यंत चंद्राकडे पाहिलं जात नाही, त्यानिमित्तानं आपोआपच जागरण घडतंच.
 
 
शरद पौर्णिमेला रामभक्त शबरीचा जन्म झाला. शबरी म्हणजे शबर राजाची कन्या होती. काही इतिहास संशोधक तिच्या वनवासी भिल्ल असण्यावर भर देतात. कोणाला मातंग ऋषींसमोर आध्यात्मिक आस पूर्ण करण्यासाठी गुरू उपदेश घेणारी शबरी भावते. तर कोणाला आपल्या दैवताला प्रसंगी उष्टी बोरं देऊन समर्पित होणारी शबरी आठवते. तर काहींना सीतेच्या शोधार्थ निघालेल्या दशरथ नंदन राम-लक्ष्मणांना मार्गदर्शन करणारी शबरी आठवते. एकाच शबरीची नानाविध विविध रूपं! या शारदीय पौर्णिमेच्या निमित्तानं तिचं स्मरण करणं क्रमप्राप्त होतं. न जाणो, शबरीबद्दलच्या या ओळी वाचल्यावर उत्सुकतेपोटी एखादं मराठी लिहू-वाचू शकणारं मुल घरातल्या मोठयांना विचारेल, आई कोजागिरी पौर्णिमा म्हणजे काय? शबरी कोण होती?
अलीकडे कोजागिरी म्हणजे मौजमजा, धम्माल करणं, दारू पिणं, मोठमोठ्या आवाजात गाणी लावून त्यावर धांगडिंधगा करत नाचणं असं काहीसं विकृत स्वरूप या कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्याला येऊ लागलं आहे.
 
 
मसाले दुधाची अवीट गोडी चाखण्याऐवजी मद्यपान करण्याचा आनंद लुटण्यात धन्यता मानली जाऊ लागली आहे. काही खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्या तर कोजागिरीचं औचित्त्य साधून ती रात्र मुंबईबाहेरील (विशेषत: मुंबईकरांसाठी) एखाद्या निसर्गम्य ठिकाणी घालवण्यासाठी सहलीचं आयोजित करतात. कोजागिरीचा आनंद लुटण्याच्या नावाखाली विशेष आकर्षण म्हणून एखाद्या प्रसिद्ध सेलिब्रिटीला सोबत नेऊन कोजागिरी साजरी करण्याची प्रथाही सुरू झाली आहे. परंतु कित्येक कलासक्त रसिक मात्र आजही कोजागिरीच्या चांदण्यातला आनंद मसाले दूध आणि चंद्र-चांदण्याविषयीची गीतं ऐकत, बालपणीच्या आठवणींना उजाळा देत, शक्य असल्यास कोजागिरी निमित्तानं होणार्‍या सांस्कृतिक कार्यक्रमांना जाऊन, वेळ काढून एकत्र जमून अनुभवायला उत्सुक असतात. हे चित्रही कोजागिरी कशी साजरी करावी, हे पुढच्या पिढीपर्यंत पोहचण्यासाठी आशादायी आहे, असं म्हणायला हरकत नाही.
संस्कृत शिक्षिका,
महाल, नागपूर