चांदण्यांचं आकाश...

    दिनांक :11-Oct-2019
डॉ. वीणा देव
 
उन्हाळ्याच्या सुट्‌ट्या लागलेल्या. अंगणात भाडेकर्‍यांच्या आणि कावळे कुटुंबाच्या खाटा टाकलेल्या. खाटेवरच्या गाद्या रात्रीच्या वार्‍याने थोडाफार थंडावा घेऊन खाटेवर आरामात पहुडलेल्या आणि रात्रीच्या काळ्याशार रंगावर चांदण्यांचा लखलखाट. त्या चांदण्या पाहिल्या की, आठवायची ती ‘चंद्रकळा.’ शाळेच्या रस्त्यावर कासीम रंगार्‍याचं दुकान होतं. संक्रांतीचा सण आला की त्याच्या दुकानात गर्दी दिसायची. खडी काढलेली चंद्रकळा, समोरच्या दोरीवर तो टांगून ठेवायचा. तेव्हा दुकानासमोर पुतळे वगैरे नसायचेत. ती चंद्रकळा पाहिली की पांढरा शुभ्र हलवा आणि चिवड्याच्या सोबत बशीत आरामात बसलेला तिळगुळाचा लाडू आठवायचा. रात्री आकाशातल्या चांदण्या पाहिल्यात की, चंद्रकळेचा स्पर्श मनाला सतत व्हायचा. तेव्हा चांदणं फक्त आनंद देणारी गोष्ट वाटायची. आता मात्र त्या चांदण्या एक वेगळा अर्थ देऊन जातात. अत्यंत अवघड वाटेवर उगवणारी रानफुलं, त्यांचं निसर्गाच्या तालावर डोलणं, आनंद घेणं तसंच काहीसं चांदणं वाटतं. 
 
 
माझे चुलतभाऊ गिरीशदादा यांनी एक सुंदर चित्र काढलं होतं. करड्या रंगाचं खोड असलेली, वर हिरवीगार पानं असलेली झाडं आणि त्यातून टेकडीपर्यंत गेलेली पाऊलवाट. त्या पाऊलवाटेवर मिश्रित रंगाचा ब्रश मारून ती पाऊलवाट सूर्यास्ताकडे जाताना दाखवली होती. रात्री वाटायचं, आता त्या पाऊलवाटेवर धवल चांदण्यांचा पांढर्‍या रंगाचा ब्रश उधळावा. दुःखाचंही असंच असताना, काळ्याकुट्ट अंधारात चमचमणार्‍या तारका म्हणजे मनाच्या गर्भात सुखाची आस घेऊन डोलणारी रानफूलचं वाटतात.
स्कॉलरशिपच्या परीक्षेकरिता आई-बाबांनी देवघरे बाईंची शिकवणी लावून दिलेली. त्यांनी चांदण्याचा पर्यायी शब्द ‘शर्वरी’ सांगितला. तेव्हापासून या शब्दाविषयी जवळीक वाटू लागली. कविता/लेख यात तो शब्द सहजगत्या येऊ लागला.
चमचम चांदणं गगनात। लखलख प्रकाश दरीयेत।
टिपूर चांदणं पूनवेचं। आणि लाजर्‍या पोरींनी लाजायचं।।
या गाण्यावर शाळेच्या गॅदरिंगमध्ये नाच बसवायचं ठरलं. आई वर्धेच्या न्यू इंग्लिश शाळेत शिक्षिका होती. त्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमाची बरीचशी प्रॅक्टिस वाड्यातल्या माजघरात व्हायची. धोपटे कुटुंबातली बेबी मन लावून नाचायची. नाचात सर्वांनी चंद्रकळा नेसून स्टेजवर गाणं साकारलं होतं.
उन्हाळ्याच्या सुट्टीत रात्रीच्या वेळी त्या चांदणी प्रकाशात आई अंगणात जेवणाची तयारी करायची. दही घातलेली लसणाची चटणी, ठेमशाची सुकी भाजी, कैरीचं ताजं लोणचं, तोंडी लावायला पोह्यांचा िंकवा फणसाचा पापडा, फोडणीचं वरण, घडीच्या पोळ्या आणि शेवटी दही-दूध-भात आणि त्यात मिसळलेला चांदण्यांचा प्रकाश. अजूनही जिभेला त्या चवीची ओढ आहे.
बाजूलाच गुलबक्षाच्या ताटव्याजवळ संतरजी अंथरलेली. माझी चुलत बहीण संध्या, जोशांच्या ज्योतीला आणि सबानेंच्या आक्काला ‘मुंबईचा जावई’ या सिनेमाची गोष्ट सांगत बसलेली. व्हारांड्यात आई, बाबांशी मो. दा. देशमुखांच्या कुठल्यातरी नाटकाची चर्चा करत बसलेली. मी मात्र चांदण्या मोजण्यात गर्क! पाठ केलेले पाढे कमी पडत होते. उन्हाळ्यात चांदण्यांशी जडलेलं हे नातं पावसाळ्यात फक्त मनातच राहायचं.
नंतर यायची चांदण्यांची रात्र-कोजागरीची रात्र. अशा या प्रकाशात भुलाबाईच्या गाण्यांची रेलचेल असायची.
कोजागरी- कोजागर्ति? म्हणजे कोण जागतं आहे? जागृत आहे? वर्तमानात याचा काय अर्थ अभिप्रेत राहील?...
माणसाच्या मनातली माणुसकी जागृत आहे का? मृत्यू शब्दातलं चैतन्य अभिप्रेत आहे का? म्हणजे आत्मा-परमात्म्याचं अद्वैत समजण्याची विचारशक्ती जागृत आहे का? याही दृष्टीने कोजागरीचा अर्थ समजून घेणं आवश्यक नाही का?
पहाटेचा कोवळा तांबूस प्रकाश त्या चांदण्या रात्रीला सामावून घेतो. पुन्हा एक नवीन पहाट-आशांच्या रानफुलांना वास्तवतेत साकारण्यासाठी चांदण्यांच्या आकाशाकडे सरकत जाणारी...