काँग्रेसच्या उमेदवारावर अपहरणाचा गुन्हा दाखल

    दिनांक :11-Oct-2019
 
 
 
गडचिरोली,
काँग्रेसचे आरमोरी विधानसभा क्षेत्राचे उमेदवार आनंदराव गेडाम व त्यांच्या मुलासह १० जणांवर अपहरणाचा गुन्हा आरमोरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे. आरमोरी विधानसभा क्षेत्रातील अपक्ष उमेदवार बग्गुजी ताडाम आपल्या तीन साथीदारांसह बुधवारी रात्री सुकाळा येथून नाटकाच्या उद्घाटनानंतर घरी परत परत येत होते. दरम्यान मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आनंदराव गेडाम यांचा मुलगा लॉरेन्स व त्याच्या साथीदारांनी पाठलाग करून वैरागड-मनापुर फाट्यावर ताडाम यांची गाडी अडवून अपहरण केले. अपक्ष उमेदवार व त्याच्या साथीदारांना रात्री सलंगटोला येथे थांबवण्यात आले. त्याठिकाणी काँग्रेसचे उमेदवार आनंदराव गेडाम हे स्वतः उपस्थित होते. त्यांनी बग्गुजी ताडाम यांना शिवीगाळ व मारपीट केली. तसेच उमेदवारी कायम ठेवली परंतु प्रचारातून माघार घेण्याची धमकी दिली. यावेळी ताडाम यांनी गोंडी भाषेचा वापर केला आणि समयसुचकता दाखवत कुटुंबीयांना मोबाईलवर आपले अपहरण झाल्याची सूचना दिली. ताडाम यांच्या मुलाने गुरूवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास आरमोरी पंचायत समितीच्या समोर बग्गुजी ताडाम यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना घेऊन भरधाव वेगाने येणारी गाडी थांबविली. यानंतर त्यांची सुटका केली. ताडाम व सहकाऱ्यांनी गुरूवारी रात्री आरमोरी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी काँग्रेसचे उमेदवार माजी आमदार आनंद गेडाम व त्यांचा मुलगा लॉरेन्स आनंद गेडाम यांच्यासह पंकज प्रभाकर तुलावी, जीवन नाट आणि इतर अशा एकूण दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने राजकिय क्षेत्रात प्रचंड खळबळ माजली आहे. बग्गुजी ताडाम हे एकेकाळचे काँग्रेसचे स्थानिक नेते तत्कालीन आमदार आनंद गेडाम यांचे सहकारी होते. ते आरमोरी पंचायत समितीचे उपसभापती सुद्धा राहिले आहेत. मात्र काही कालावधीनंतर आनंदराव गेडाम आणि बग्गुजी ताडाम यांच्यात मतभेद झाल्याने त्यांनी आनंद गेडाम यांची साथ सोडली. विद्यमान विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. अपहरणाच्या प्रकरणात आरमोरी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनात रात्री उशिरा ही फिर्याद दाखल करून घेतली. या प्रकरणात आरमोरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.