भुकेल्यांचा अन्नदाता...

    दिनांक :12-Oct-2019
चौफेर  
सुनील कुहीकर  
 
 
या देशातील किमान 20 कोटी लोकांवर रोज रिकाम्या पोटी झोपण्याची वेळ येते अन्‌ जगाचे चित्र हे आहे की, तयार केलेल्या अन्नापैकी निदान 40 टक्के भाग या ना त्या स्वरूपात वाया जातो. जगाच्या पाठीवर एड्‌स, कर्करोग, टीबी, मलेरियापेक्षाही भुकेने मरणार्‍यांची संख्या अधिक आहे. कुपोषणामुळे होणार्‍या मृत्यूची सर्वाधिक संख्या भारतात आहे... अशा भयाण वास्तवाने अस्वस्थ झाला एक तरुण. वयाच्या अवघ्या चोविसाव्या वर्षी, निदान लाखभर रुपये खिशात घालणारी कार्पोरेट जगतातली नोकरी सोडून स्वत:ला सामाजिक कार्यात वाहून घेतो. लग्नसमारंभापासून तर छोट्या-मोठ्या हॉटेल्सपर्यंत सर्वदूर, गरज संपल्यानंतर उरलेल्या अन्नाचे संकलन करणे अन्‌ ते भुकेल्यांपर्यंत पोहोचवणे, अशा एका छानशा उपक्रमाची सुरुवात नेमकी केव्हा झाली, हे आठवत बसण्यापेक्षा, हाती घेतलेल्या कामाचा विस्तार करणे त्यांच्यालेखी अधिक महत्त्वाचे. तशीही जागतिक पातळीवर नोंद घेतली गेलीय्‌ या कामाची कधीच. युनोने पुढील दशकाच्या शेवटापर्यंत काही विषयांची हाताळणी वैश्विक पातळीवर करण्यासाठी म्हणून जगभरातील काही तज्ज्ञांना एका परिषदेसाठी निमंत्रित केले होते. त्यात भारतातून या तरुणाला पाचारण करण्यात आले. गरिबी, कुपोषण, भुकेचे प्रश्न असे विविध मुद्दे युनोच्या पातळीवर हाती घेतले जाताहेत. त्यात, लोकांच्या भुकेची चिंता वाहणारा अंकित, स्वत:चे अभ्यासपूर्ण, अनुभवसिद्ध मत मांडण्यासाठी उभा राहिला, तेव्हाच त्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. आपले विचार मांडून तो खाली बसला, तेव्हा सुरू झालेला टाळ्यांचा कडकडाट बराच वेळ कायम राहिला होता. कागदांवर उमटलेल्या रेघोट्यांच्या पलीकडे आत्मीयतेची जोड त्या विचारांना लाभल्यामुळेही असेल कदाचित, पण त्याच्या शब्दांना भावनिक ओलावा लाभला होता. म्हणूनच की काय, पण त्याची परिणामकारकताही अत्युच्च ठरली होती.
 
 
 
अंकित कवात्रा. दिल्लीचा एक तरुण. पाच वर्षांपूर्वीपर्यंत एका कार्पोरेट कंपनीत नोकरीला होता. दिल्लीत आलेला असताना एका भल्या मोठ्या लग्नसमारंभाला उपस्थित राहण्याचा योग आला. हजारावर लोक तिथे निमंत्रित करण्यात आले होते. सारेच व्हीआयपी. कुणीच कुणापेक्षा कमी नाही. त्यामुळे सर्वांचीच बडदास्त नजरेत भरावी अशी. आसनापासून तर भोजनापर्यंतची पंचतारांकित व्यवस्था तर डोळ्यांचे पारणे फेडणारी. उच्चारताही येऊ नयेत असल्या विविध नावांच्या रुचकर पदार्थांची नुसती रेलचेल. त्यांची संख्यातर बोटांवर मोजण्यापलीकडची. चवीपुरताच घेतला एकेक पदार्थ, तरी शेवटच्या स्टॉलपर्यंत पोहोचेस्तो पोट भरलेले असण्याची परिस्थिती. संबंधित कॅटररशी बोलणे झाले तर लक्षात असे आले की, एवढे अन्न तर अजून दुप्पट लोकांना पुरेल. पण, कार्यक्रम संपल्यावर ते फेकून द्यावे लागणार. अंकित अस्वस्थ झाला त्याचे बोलणे ऐकून. एवढे सारे अन्न फेकून देणार? कॅटररसाठी नवीन काहीच नव्हते त्यात. पण, कासावीस झालेल्या अंकितच्या मनात मात्र विचारांचे काहूर माजले. एकतृतीयांश जनता दारिद्र्यरेषेखालील जीवन जगते, अशा देशात अन्नाची असली नासधूस परवडणारी नाही. शोभणारी तर अजीबात नाही. पण, मग उपाय काय यावर?
 
पुढे काही दिवसांनी नोएडात अशाच एका कार्यक्रमात जाण्याचा योग आला. यावेळी आकाश नावाचा एक मित्र सोबतीला होता. दुपारची वेळ. समारंभ जवळपास शेवटच्या टप्प्यात होता. सभागारातली तुरळक माणसं पांगली की कर्मचार्‍यांची जेवणं. त्यानंतर उरलेल्या अन्नाची विल्हेवाट. विल्हेवाट कसली, उकिरड्यावर फेकून द्यायचं बस्स! बरं याला म्हणावं तरी कसं? पण, त्या दिवशी िंहमत बांधली अन्‌ दोघांनीही त्या कॅटररला, उरलेले अन्न देण्याची गळ घातली. खरंतर तो पहिले काही क्षण आश्चर्याने नुसता बघत राहिला. हे काय करणार एवढ्या अन्नाचे, असा काहीसा प्रश्न त्याच्या चेहर्‍यावर उमटला होता. पण, इथून उचलून उकिरड्यापर्यंत जाण्याची मेहनत वाचेल, एवढ्या विचारानेही तो आनंदला. खुश्शाल घेऊन जा म्हणाला. मग लगबगीनं तिथले पदार्थ वेगवेगळ्या भांड्यांमध्ये घेऊन, ती भांडी कारमध्ये ठेवून हे दोघे निघाले. या अन्नाचं करायचं काय, हे तर त्यांनाही ठाऊक नव्हतं. फक्त त्या कॅटररप्रमाणे ते अन्न आता उकिरड्यावर फेकले जाणार नव्हते, एवढे निश्चित! सारी भांडी घेऊन दोघे, त्यांना ठाऊक असलेल्या एका वृद्धाश्रमात पोहोचले. पण, तिथल्या निवासींची संख्या शंभराच्या मर्यादेतली. आग्रह केल्यावर त्यांनी त्यांना पुरेल एवढ्या अन्नाचा स्वीकार केला. मग बरेच फोन करून, माहिती मिळवून, शोध घेऊन उरलेले अन्न गरजूंच्या स्वाधीन करण्यात यश मिळाले. तोवर पोलिसांनी अडवण्यापासून तर स्वत:च स्वत:ला विचारलेल्या प्रश्नांपर्यंत... सारा किस्सा, गाठीशी बांधला गेलेला अनुभव अविस्मरणीय होता.
 
गरजूंची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणात असताना, ज्यांच्याकडे अधिक आहे त्यांना ते त्या गरजूंपर्यंत पोहोचवतादेखील येऊ नये, ही बाब म्हटली तर लाजिरवाणी होती. म्हटली तर सहज उपाय सापडण्याजोगाही होता. अंकितनं ठरवलं, आपणच त्या प्रश्नाचं उत्तर व्हायचं! मनाशी ठाम निर्धार झाला आणि मगच शांत झोप लागली त्या रात्री. दुसर्‍याच दिवशी अमेरिकेतल्या त्याच्या कंपनीला मेल गेला- त्याच्या राजीनाम्याचा! आई घरकामात रमणारी असली तरी वडील बडे व्यापारी असल्याने, भविष्यात आपलं कसं होईल, याची िंचता आज, या घडीला वाहात बसण्याची गरज नव्हती. आपला एक सहकारी असल्या कुठल्याशा जगावेगळ्या कारणासाठी नोकरी सोडतोय्‌ म्हटल्यावर अमेरिकास्थित कंपनी मालकाला आश्चर्यापेक्षा आनंद झाला अधिक. अर्थात, सध्यातरी ती राजीनाम्याची नोटीसच होती दोन महिन्यांची. दरम्यानच्या काळात वेगवेगळ्या सामाजिक संस्थांशी बोलणं सुरू झालं. समाजमाध्यमांचाही उपयोग या कामी होऊ लागला. लोक आपापली मतं व्यक्त करू लागले. काही चांगल्या सूचनाही आल्यात. काहींनी व्यक्तिश: सोबत येण्याची तयारी दर्शवली. काहींना वाटलं, गडी राजकारणात जाणार बहुधा. त्यांनी फार गांभीर्यानं घेतलं नाही. अंकितनंही त्यांचं वागणं, बोलणं फारसं मनावर घेतलं नाही. एव्हाना कामाला सुरुवातही झाली होती.
 
वेगवेगळ्या कार्यक्रमात स्वयंपाकाचे कंत्राट मिळालेल्या व्यक्तीला, कार्यक्रम संपल्यावर उरलेले भोजन ‘आम्हाला द्या,’ हे सांगणं, त्यासाठी त्याचं मन वळवणं, त्याला तयार करणं म्हणजे जिकिरीचं काम होतं. हा माणूस हे अन्न का मागतोय्‌ इथपासून तर यात याचा काय फायदा, इथपर्यंतचे वेगळाले प्रश्न चेहर्‍यावर उमटलेले असायचे. त्याची समाधानकारक उत्तरं देतादेता नाकीनऊ यायचे. उरले म्हणून फेकून द्यायला तयार असलेले काही लोक, त्याच अन्नाचे याला मात्र पैसे मागायचे. काही बड्या हॉटेल्सला स्वत:च्या ब्रॅण्डची चिंता. उद्या कुणाला काही झालं तर? उगाच बदनामी नको म्हणून ते अन्न देण्यास टाळाटाळ करायचे. त्यांची समजूत काढता काढता पुरेवाट व्हायची. ‘‘बाबा रे, हे मी माझ्यासाठी मागत नाहीये, तुम्ही उकिरड्यावर फेकून देणार होतात, तेच अन्न कुण्या भुकेल्याच्या पोटात जाईल एवढीच व्यवस्था मी करतोय्‌.’’ हे सांगणं अन्‌ त्यांच्या गळी उतरवणं म्हणजे अक्षरश: तारेवरची कसरत होती. मात्र, दिवस मागे पडत गेले तसतसा लोकांचा विश्वास बसत गेला. आता स्वत:हून लोकांचे निरोप येऊ लागलेत. कामाचा व्यापही दिल्लीबाहेर पसरला. कार्यकर्त्यांची फळी उभी राहतेय्‌ शहराशहरात. हो! आजघडीला देशातील 28 शहरांमध्ये सुमारे दोन हजार कार्यकर्त्यांनी या कामी स्वत:ला झोकून दिले आहे. ते स्वत:ला मोठ्या अभिमानाने ‘हंगर हिरो’ म्हणवून घेतात. लग्नसमारंभ असो वा मग एखादा मोठा धार्मिक उत्सव. त्यांचा कार्यक्रम संपला की यांचे काम सुरू होते. शक्यतो, संबंधितांशी आधीच संपर्क साधला जातो. उरलेले अन्न स्वीकारणे, ते भुकेल्यांपर्यंत पोहोचवणे, असे कामाचे स्वरूप. गोरगरिबांना द्यायचे असले तरी अन्नाचा दर्जा अन्‌ स्थिती याबाबत काळजी घेतली जाते. सध्या गुडगावसारख्या ठिकाणी अन्नाच्या वाहतुकीसाठी किरायाने घेतलेल्या वाहनाचा वापर होतो खरा, पण भविष्यात सर्व सोयींनी युक्त अशा वातानुकूलित वाहनाचा उपयोग या कामासाठी करण्याचा मानस अंकित आवर्जून व्यक्त करतो. आज परिस्थितीने विवश झालेल्या भुकेल्यांसाठी ‘या’ व्यवस्थेची गरज असली, तरी भविष्यात ही विवशता अन्‌ त्यांची विवंचना, दोहोंचा नायनाट व्हावा, ही मनीषा बाळगून अंकितसह दोन हजार ध्येयवेड्या कार्यकर्त्यांचा ताफा झपाटल्यागत काम करतोय... ‘फीिंडग इंडिया’नावाची चळवळ हा त्याचाच परिपाक...
9881717833