चिखली: जांबुवंती नदीत बुडून चार जणांचा मृत्यू

    दिनांक :13-Oct-2019

 
 
चिखली,
येथील जुना गाव परिसरातील जांबुवंती नदीत पोहायला गेलेल्या १५ ते १८ वर्षवयोगटातील सै.रिझवान सै. फिरोज, शे.साजीद शे.शफीक, वसीम शाह इरफान शाह, शे.तौसीफ शे.रफिक या चार तरुण युवकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. याबाबत सविस्तर असे की, अक्सा कॉलनी, अंगुरचा मळा या परिसरात राहणार्‍या सै.रिझवान सै. फिरोज, शे.साजीद शे.शफीक, वसीम शाह इरफान शाह, शे.तौसीफ शे.रफिक यांच्यासह दोन युवक हे जुन्या गावातील सैलानी नगर परिसरात असलेल्या जांबुवती नदीच्या पात्रात पोहण्याकरिता गेले होते. दरम्यान पोहण्यासाठी नदीच्या वरच्या बांधावरील भिंतीवरून उड्या घेतल्यामुळे नदीच्या पात्रात असलेल्या गाळाचा अंदाज न आल्याने हे चारही युवक गाळात फसले . ही घटना पाहत असलेल्या त्यांच्या सोबत असलेले २ युवकांनी आरडाओरडा व धावपळ करून आपल्या मित्रांना वाचवण्यासाठी लोकांना बोलावले दरम्यान घटनेची वृत्त समजताच परिसरातील नागरिकांनी\नदीपात्रात उतरून मदतीसाठी धाव घेतली आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला .  चौघांना पाण्यातून बाहेर काढण्यात आले. त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी चौघांनाही मृत घोषित केले
 
घटनेचे वृत्त समजताच शहरातील विविध पक्षाचे राजकीय नेते मंडळी, ग्रामीण रूग्णालयात आली होती. ग्रामीण रूग्णालयात मृतकांच्या नातेवाईकांची तसेच नागरिकांची गर्दी यावेळी झाली होती. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे . घटनेचा पुढील तपास चिखली चे पोलिस निरीक्षक गुलाबराव वाघ यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक सचिन चौहान हे करीत आहे.