अस्वलाच्या हल्ल्यात महिला ठार

    दिनांक :13-Oct-2019
कुरखेडा,
कुरखेडा तालुक्यातील खडकी येथील महिला सकाळी शेतशिवाराकडे जात असतांना तिच्यावर अस्वलाने प्राणघातक हल्ला केल्याने ती त्यात गंभीर जखमी झाली. अंगारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी गडचिरोली येथे जातांना वाटेतच तिचा मृत्यू झाला. प्राप्त माहितीनुसार आज सकाळी आठ वाजताच्या दरम्यान खडकी येथील  ममीता गावडे ही शेतावर जात असतांना तिच्यावर अस्वलाने हल्ला केला व त्यात ती गंभीर जखमी झाली.घटनेची माहिती गावामध्ये पसरताच खडकी येथील नागरिक व महिला घटनास्थळावर गेले असता मनिषा गावडे ही बेशुद्धावस्थेत पडली होती.यावेळी गावकऱ्यांनी नजीकच्या अंगारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले .अंगारा येथील वैद्यकीय अधिकारी यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे पाठविले .गडचिरोली येथे नेत असताना दरम्यान वाटेतच तिचा मृत्यू झाला.कुटुंबातील कर्त्या स्त्रीचा मृत्यू झाल्याने तिच्या कुटुंबापुढे संकटाचा डोंगर उभा राहिला आहे. वनविभागाने अशा हिंस्त्र प्राण्यांना बंदोबस्त घालावा व अस्वलांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व मृत पावलेल्या महीलेच्या कुटुंबाला आर्थिक मदत करावी अशी मागणी खडकी वाशीय व परिसरातील नागरिकांकडून होत आहे.