विनाकारण... ‘राज’कारण!

    दिनांक :13-Oct-2019
महाराष्ट्रात भाऊबंदकीचं राजकारण आहे तसंच ते जिवाभावाचंही आहे. म्हणजे भाऊबंदकीपेक्षाही खतरनाक असं हे राजकारण आहे. एकमेकांच्या जिवावर भाऊदेखील उठतात त्याला जिवाभावाचं राजकारण म्हणतात. म्हणून राजकारण हे लोकांच्या (अर्थात सामान्य) जिवावर येतं. नकोसं वाटतं. कुठल्याही मुद्याचं राजकारण केलं जातं, म्हणून मग विनाकारण राजकारण वाटू लागतं. आता जिवाभावाचं राजकारण करणार्‍या एका भावाची गोष्ट सार्‍या मराठी मुलुखाला माहीत आहे. काकांच्या पक्षाची सावली सोडून यांनी आपला पक्ष स्थापन केला तेव्हा ते म्हणाले होते की, यंदाची निवडणूक ही माझी नाही. माझी निवडणूक 2009 ची असेल... त्यावेळी यांच्याकडे महाराष्ट्राच्या विकासाची म्हणजे नवमहाराष्ट्राची ब्ल्यु िंप्रट होती. दुसर्‍या एका काकांनी आपल्या या समाजपुतण्याला सल्लाही दिला होता की राजकीय पक्ष चालवायचा असेल तर सकाळी उठावे लागते, रात्री कितीही उशिरा झोपले तरीही सकाळी लवकरच उठावे लागते अन्‌ राज्यभर फिरावे लागते... तेव्हा जाणवलं होतं की, शेती अन्‌ राजकारण सारखंच, शेतीतही सकाळीच जावे लागते अन्‌ राजकारणांतही सकाळीच जनता दरबारात उपस्थित राहावे लागते. शेतीही स्वत: केली तरच फायद्याची असते अन्‌ राजकारणही कार्यकर्त्यांच्या भरवशावर सोडून देता येत नाही. नेमक्या ठिकाणी स्वत:च असावे लागते. महाराष्ट्राच्या या नव्या साहेबांना हे कळले की नाही, कळायला मार्ग नाही.
 

 
 
आता काकांना वारशानुसार येणार्‍या राजकीय प्रभाव क्षेत्रांच्या वाटणीत किमान पुण्यापासून पश्चिम महाराष्ट्र हा पुतण्या मागत होता. काकांच्या पक्षाचा प्रभावच तितका. इकडे विदर्भ आणि मराठवाड्यांत फार काही बाणावर खोचलेलं नाही अजूनही. त्यामुळे अर्थात काकांनी नाही म्हटलं अन्‌ मग हे नवा पक्ष काढता झाले. लोक 3 चे 13 करतात, यांनी 13 चे शून्य केले. लोकसभा निवडणुकीच्या वेळी यांनी मोदी आणि शाह हेच या देशाची खरी समस्या आहेत, असे सांगितले. लाव रे तो व्हिडिओ म्हणत माहोल केला. यांचे भाषण एकदम छान असते. ऐकायला मस्त वाटते. फुकटात ‘हवा येऊ द्या’चा शो असतो. हे कुणाकुणाच्या नकला करतात... मुळात यांनी अवघी हयात आपल्या काकाची नक्कल करण्यात घालवली. अगदी नवा पक्ष स्थापन केल्यावरही त्यांनी काकांसारखाच पोशाख केला. शर्ट, पॅन्ट...एकदमच सॉफिस्टिकेटेड मध्यमवर्गीय चाकरमान्यासारखा. काकांनी तो केला होता त्यांच्या राजकारणाच्या प्रारंभी, जेव्हा मुंबई मध्यमवर्गीय लोकांची होती. त्यात काकांचा हा इंटेलेक्चुअल वाटणारा पोशाख एकदम जवळचा वाटला मुंबईकरांना... आताची मुंबई फुल सूट मधली आहे. त्यामुळे काकांची ही नक्कल करण्याचे काही कारण नव्हते. काकांनी दक्षिणी लोकांच्या मुंबईवरच्या अतिक्रमणावर हल्ला केला. त्यावेळी शेट्टी लोकांचा प्रभाव होताच. त्रासही होता. या पुतणेश्वरांनी उत्तर प्रदेशी लोकांवर हल्ला केला. मराठीच्या अस्मितेची ठाकरेकी करणार्‍यांनी कधीकाळी त्यांच्या मराठी वृत्तपत्राची िंहदीतली ‘दोपहर’वाली आवृत्ती काढली होती. त्याच्या संपादकाला राज्यसभेत खासदार केला. त्या उत्तर प्रदेशी संपादकानेच मुंबईत छटपूजा सुरू केली... यांनी उत्तर प्रदेशी भगाव सुरू केले. ते काही यांच्या अंगी लागले नाही. आताची मुंबई मराठींची राहिलेली नाही. देशाची आर्थिक राजधानी असल्याने दादरला आता मराठीचं राजकारण करणार्‍या नेत्यांचेच काय ते बंगले राहिले आहेत. त्यामुळे यांना उत्तर प्रदेशींचे राजकारण सोडावे लागले.... नक्कल करताना हे काका वाटत होते, मात्र तरीही परिणाम साधत नव्हता. काकांच्या आठवणीत मुंबईकर यांची भाषणे ऐकायला जातात. मत मात्र देत नाहीत. त्यामुळे यांना प्रत्येकच गोष्ट अर्ध्यावरच सोडावी लागते. प्रत्येक झेंडा खाली आणावा लागतो. आता कधीकाळी हे, ‘‘हा महाराष्ट्र माझ्या हाती देऊन बघा... बघा, कसा सरळ करतो. खर्‍या अर्थाने मराठी माणसांचा करतो...’’ असे म्हणायचे. विधानसभेवर मराठी माणसाचा झेंडा फडकलाच पाहिजे, असे म्हणायचे हे अन्‌ आता मात्र एकदम डाऊनमार्केट मागणी हे मतदारांकडे करत आहेत. ‘‘किमान मला विरोधीनेता तरी करा...’’ याचा अर्थ, यांनी हे कबूल करून टाकले आहे की, सत्ता भाजपा- शिवसेना युतीचीच येणार. त्यामुळे विरोधी बाकांवर बसायला तरी जागा द्या, असे मागणे ते जनतेला मागत आहेत. महाराष्ट्रात म्हणा की देशात, सक्षम विरोधी पक्षच राहिलेला नाही, हे यांचे म्हणणे मात्र खरे आहे. तरीही एक मात्र आठवतं की, लोकसभा निवडणुकीच्या वेळी व्हिडिओग्रस्त प्रचार करताना मोदी- शाहंना हाकला म्हणत कुणाला आणा म्हणत होते? मग आता महाराष्ट्रात यांना सत्ता नको आहे, आपली ती औकात नाही, याचीही प्रांजळ कबुली यांनी देऊन टाकली आहे. अगदी जाहीर दिली आहे... असे असताना मग आता महाराष्ट्रात उरलेल्या पक्षांची विरोधी पक्षात बसण्याचीही औकात नाही, तितक्याही त्यांच्या जागा येणार नाहीत, हेही यांनी कबूल करून टाकले. म्हणजे आता पहिल्या दोन स्थानांसाठी विरोधी पक्षात लढतच नाही. ते तिसर्‍या आणि चौथ्या स्थानासाठी लढत आहेत. कधीकाळी ‘‘माझ्या हाती एकदा देऊन बघा महाराष्ट्र... नाशिक दिले, बघा मी काय करून दाखविले.’’असे हे म्हणायचे आणि आता म्हणतात की, किमान मला विरोधी पक्ष तरी करा...
खरेतर हे निवडणूकच लढणार नव्हते. लोकसभा निवडणुकीच्या धक्क्यातून हे सावरलेच नव्हते. ‘अनाकलनीय’ अशी यांची प्रतिक्रिया लोकसभा निकालावर होती. मग यांना आकलन झाले की हा सारा मतदान यंत्राचा चमत्कार आहे. त्यासाठी त्यांनी सोनिया ते ममता असा संपर्क दौरा करून पाहिला. त्यांनाच काही समजेना काय झालं आहे त्यात. त्या याच्यासारख्या फसलेल्या नटाच्या मागे कशाला लागतील? त्यामुळे ममतांनी यांना परत पाठविले अन्‌ तिकडे जाऊन मोदींची भेट घेतली. इव्हीएमचा मुद्दाही फसल्यावर यांनी निवडणुकीवर बहिष्कारच घालण्याची भाषा केली. समाजकाकांनी समजावले. कुठल्याच आघाडीत यांना स्थान नव्हते. कारण सगळेच फसलेले मुद्दे यांच्या आजूबाजूला. कॉंग्रेस अन्‌ राष्ट्रवादीला उत्तर प्रदेशीचा मुद्दा चालत नाही. कुणाला टोल लागतोच. इव्हीएमवरच दुगाण्या झाडणे हेही अनेकांना पटत नाही, त्यामुळे यांना आता एकटेच लढायचे आहे. पक्ष सोडून जाण्याची लागण जी आता जोर पकडताना दिसते आहे ती यांच्या पक्षात फार आधी सुरू झाली. जिकडे सत्तेचा सूर्य कधीच उगवणार नाही अन्‌ ज्यांच्या नावावर ग्राम पंचायतही िंजकता येत नाही त्यांच्यासोबत कोण कशाला राहणार? त्यामुळे नाक वर करून जे नाशिक नाशिक करणे सुरू होते, तिथलेच नगरसेवक यांना सोडून गेले. आमदार तर कधीचेच सुटले होते. जे राहिले ते गेल्यावेळीच पडले. आता जे सोबत आहेत ते नाईलाज म्हणून आहेत. त्यांना दुसरे कुणी आपल्या पक्षात घेत नाहीत म्हणून ते इकडे टिकून आहेत. म्हणजे यांच्याकडे मुद्दे नाहीत, केडर नाही, कार्यकर्ते नाही, महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये हे जाऊनही आलेले नाहीत, आता यांच्याकडे पैसाही नाही अन्‌ पैसा लावणारे असण्याचा प्रश्नच नाही... नेतृत्वाच्या नावाखाली हे एकटेच. विरोधी पक्षात तरी बसवा, हे कशाच्या भरवशावर म्हणतात हे? आता इतके सगळे सांगितल्यावर हा नेता कोण, हे तुम्हीच ओळखा... बापरे! ओळखलंही... इतका कठीण प्रश्न नि एका क्षणात उत्तरही दिलंत? जा बुवाऽऽ