जनता जनार्दनाचा विश्वासच आमच्यासाठी प्रेरणादायी - मोदी

    दिनांक :13-Oct-2019
साकोलीच्या जाहिर सभेत उसळला प्रचंड जनसमुदाय
 
भंडारा, 
देशापुढे अनेक आव्हाने आहेत. मात्र या आव्हानांना तोंड देण्यासाठी भारत आता सक्षम झाला आहे. हे केवळ आपल्या सर्वांच्या विश्वासाच्या जोरावर शक्य झाले आहे. आपला विश्वास देश चालवण्यासाठी निरंतर प्रेरणा देत आहे. आम्ही जनकल्याणाच्या विविध योजना राबवितो. त्यामागे जनकल्याण, राष्ट्रकल्याण साधण्याचा हेतू आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी समर्पित असे सरकार देण्यासाठी आपण महायुतीच्या उमेदवारांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साकोली येथे आयोजित विशाल जनसभेला संबोधित करताना केले.
 

 
 
 
भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील महायुतीच्या सातही विधानसभा उमेदवारांच्या प्रचारासाठी आज भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजपाचे खासदार सरोज पांडे, आमदार अनिल सोले, भाजपा विदर्भ संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर, वीरेंद्र अंजनकर, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा साकोली विधानसभेचे भाजपचे उमेदवार डॉ.परिणय फुके, भंडारा विधानसभेचे उमेदवार अरविंद भालाधरे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा तुमसर विधानसभेचे उमेदवार प्रदीप पडोळे, माजी खासदार शिशुपाल पटले, गीता कापगते, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, हेमंत पटले, राजकुमार बडोले उपस्थित होते. पंतप्रधानांचे व्यासपीठावर आगमन होताच धानाची पेंडी देऊन स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक खासदार सुनील मेंढे यांनी केले. हजारोच्या संख्येने उपस्थित असलेल्या विशाल जनसमुदायाला संबोधित करताना नरेंद्र मोदी यांनी मराठीत भाषणाची सुरूवात केली. नमामी वैनगंगे, नमामी चूलबंद असा उल्लेख त्यांनी जिल्ह्यातील दोन नद्यांचा केला. धान उत्पादक शेतकरी बंधू-भगिनींना विशेष धन्यवाद दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धानाला पाचशे रुपये बोनस दिला तुम्ही खुश आहात ना, असा सवाल मोदी यांनी जनसमुदायाला विचारतात टाळ्यांच्या कडकडाटात मोदींचे स्वागत करण्यात आले.
 
आम्ही भारताची नवीन ओळख निर्माण करण्याच्या दृष्टीने कामाला लागलो आहोत. समस्या अनेक आहेत, अडचणीही आहेत. परंतु आज आम्ही कोणत्याही परिस्थितीवर मात करण्यासाठी सक्षम आहोत. हे केवळ जनता जनार्दनाच्या विश्वासामुळेचे शक्य झाल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. आधीचे लोक लोकहिताचे निर्णय घेण्यास घाबरत होते. मात्र आज आम्ही प्रचंड आत्मविश्वासने पाऊले उचलीत आहोत. महाराष्ट्रात 2014 मध्ये सशक्त आणि स्थिर सरकार देण्याचे वचन दिले होते. वचन आम्ही पूर्ण केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे समर्थपणे नेतृत्व केले. ज्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे ते म्हणाले. जो काम करेल तोच पुढे जाईल, हे आता सिद्ध झाले आहे. ग्रामपातळीवर पासून शहरापर्यंत विकास कामांची गंगा प्रवाहित करण्याचे काम आम्ही केले. केवळ सोयीसुविधा उपलब्ध करून देणे ऐवढाच त्यामागचा हेतू नव्हता, या माध्यमातून होणाèया जनकल्यानातून राष्ट्र कल्याणनही साध्य करणार असल्याचे ते म्हणाले. योजनांच्या माध्यमातून गरीब, सामान्यांचे कल्याण हेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न होते. जाती, धर्म, भाषा यांच्या पलीकडे जाऊन आमचे काम सुरू आहे, असेही ते म्हणाले.
 
भंडारा जिल्ह्यातील पर्यटन विकासासंदर्भात बोलताना नरेंद्र मोदी यांनी जंगल व्याप्त भाग, नवेगाव-नागझिरा अभयारण्याचा उल्लेख केला. पर्यटन वाढल्यास रोजगार वाढीला चालना मिळेल आणि बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पशुधनाची काळजी हेही आमच्यासाठी तेवढेच महत्त्वाचे असल्याचे यावेळी स्पष्ट केले. केंद्रातील आणि महाराष्ट्रातील महायुतीचे सरकार मिळून महाराष्ट्र प्रगतीच्या शिखरावर पोहोचविण्यासाठी आपल्या सर्वांच्या योगदान गरज आहे. येत्या 21 रोजी सर्व महायुतीच्या उमेदवारांच्या पाठिशी आपण खंबीरपणे उभे राहून राष्ट्र निर्माणासाठी हातभार लावावा असे आवाहनही यावेळी पंतप्रधान मोदी यांनी केले. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात जय भीम, जय गजानन महाराज, जय संताजी, जय नामदेव, जय जुमदेव असा उल्लेख करीत सर्व महात्म्यांचे आशिर्वाद घेतले. सभेचे संचालन आमदार बाळा काशिवार यांनी केले. सभेला भंडारा, गोंदिया जिल्ह्यातून प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.
डॉ. बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली वाहण्याचा हा विचार...
मोदींनी आपल्या भाषणाच्या सुरूवातीलाच उपस्थित प्रचंड जनसमुदाय पाहून आपण बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली वाहणार असा निर्धार तर करून आला नाहीत ना, असा प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाचा रोख काही अंशी भंडारा विधानसभेकडे होता. कारण याच विधानसभेतून आंबेडकरांना पराभव पहावा लागला होता. भंडारा विधानसभा आजही राखीव आहे. या विधानसभेतून भाजप उमेदवारास निवडून देत बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली वाहा, असेच कदाचित त्यांना सुचवायचे असावे.