सरता संचिताचे शेष!

    दिनांक :13-Oct-2019
फेब्रुवारी महिना अर्धा सरत आला होता. मात्र यावर्षी थंडीचा ऋतू मागे सरायला तयार नव्हता. अधूनमधून माघ महिन्यातले सोसाट्याचे वारे सैरावैरा वाहत होते. दुपारची उन्ह मात्र अंगात ताप चढल्या सारखं तापत होतं. तर संध्याकाळी कधीतरी आभाळ हलकेच दाटून येत होतं.
 
 
 
चार दिवसांनी आईकडे जायलाच हवं होतं. ती माझ्या वाटेकडे डोळे लावून बसली असणार! दासनवमी जवळ आली होती. दासबोधाचं पारायण करायचं होतं. वर्षान्‌ वर्षांची प्रथा आणि जुनी सवय होती ती! लग्नाला पंधरा वर्षे झाली, तरी माझ्या नेमानी दासबोधाच्या पारायणाला जाण्यात आणि दासबोध वाचण्यात कधी खंड पडला नव्हता. समर्थ रामदास स्वामींची, आई नि:स्सीम भक्त होती.
 
अगदी लहानपणापासून, शुभंकरोती, रामरक्षेसोबत मनाचे श्लोकही तिने माझ्याकडून मुखोद्गत करून घेतले होते. मनाच्या श्लोकाच्या पाठांतर स्पर्धा, नेहमी लहानपणी मी िंजकत होते. जरा मोठी झाल्यावर, आई बाबांसोबत, आई मलाही सप्ताहभर दासबोधाच्या पारायणाला बसायला लावायची. स्वच्छ, स्पष्ट आवाजात आई दासबोध वाचायची. माणूस भर उंचीचा, समर्थांचा फोटो, आमच्या देवघरात होता.
 
सकाळच्या वेळी, मनाचे श्लोक म्हणत निघणार्‍या रामदासी पंथाच्या भक्तगणांच्या भिक्षाफेरीत, गळ्यात झोळी अडकवून, मी पण आईसोबत जात असे. बाबा गेल्यावर मात्र, दासबोध वाचून मी स्वत: पारायण करू लागले. सोबतीला आई आणि आमच्याचकडे राहणार्‍या मथुकाकू असायच्या. आईच्याच आग्रहावरून मी दासबोधाच्या तीन परिक्षाही दिल्या.
 
दोन दिवसांनी मी आईकडे निघाले, तसं कळवलं सुद्धा होतं. मी घरी पोहोचले. वाटलं, आई उभी असेल, तुकडा पाणी घेऊन नेहमी सारखी दारात, माझी वाट बघत! पण मी बाहेरून आवाज दिला तरी, काही चाहूल नाही! तशीच आत गेले, तर आई पलंगावर चादर पांघरून झोपलेली! मी कपाळावर हात ठेवला. रसरसलंच होतं अंग तापानी. मथुकाकू पूजा करत होत्या.
 
‘‘काय गं आई, काय झालं? बरं नाही वाटत? ताप चढलाय्‌ बराच. औषध घेतलंस काही? मी देते थांब. मथुकाकू , चहा ठेवता जरा?’’
मी आईच्या डोक्यावरून हात फिरवत बोलत होते.
‘‘अगं काही नाही राजा.... जरा कसर वाटतेय इतकंच. वाटेल बरं! तू आवरून घे, मग आपण गप्पा मारू आणि पारायणाची तयारी करू. उद्या पहाटे उठून सुरूवात करू..’’ आई म्हणाली. ती बोलल्यावर मलाही जरा बरं वाटलं.
 
‘‘बघ आई, झेपेल नं गं तुला? नाही तर नंतर पण करता येईल गं.’’
मी म्हणून पाहिले, पण आईनी नाहीच ऐकलं. तिला क्रोसीन दिल्यावर ताप उतरला आणि चार घास पोटात गेल्यावर थोडी तरतरी पण आली. मग जुन्या आठवणी ताज्या करत, इकड तिकडच्या गप्पा मारत, दुसर्‍या दिवशीपासून करायच्या पारायणाची तयारी करून झाली. रात्री आसट खिचडी आणि सार असं साधं जेऊन, आईला पुन्हा एक क्रोसीन दिली आणि मुद्दाम लवकर झोपलो, सकाळी घाईनी उठायचं होतं.
 
सकाळी पहाटेच्या वेळेस जाग आली. जास्त न रेंगाळता, घाईने सर्व आवरून घरच्या देवांची पूजा केली. समर्थांच्या फोटोला हार घातला. तेवढ्यात वीज गेली. लहान गाव असल्याने, अजून इन्व्हर्टर, जनरेटर पोहोचले नव्हते. एक कंदील, एक मेणबत्ती आणि तेवणारी समईची ज्योत, एवढाच काय तो उजेड! आज सूर्य तर रुसला होताच, पण बाहेर अवकाळी पावसाला सुरुवात झाली होती. ‘घों घों!.’ करत वाराही पिसाटल्या सारखा उलटसुलट वाहत होता. आजच्या पहिल्या दिवशी, पहिले तीन दशक तरी वाचून व्हायला हवेत होते, तरच नेमक्या दिवसात पारायण पूर्ण होणार होतं.
 
ग्रंथाला हळदी कुंकू वाहून, हार घालून त्यावर डोकं टेकवलं आणि आईला नमस्कार केला. तिने डोक्यावर, पाठीवर हात फिरवत आशीर्वाद दिला. मथुकाकूंंना नमस्कार करून, आसनावर बैठक घेत मी शांतपणे स्पष्ट आवाजात सुरुवात केली....
जय जय रघुवीर समर्थ
श्रोते पुसती कोण ग्रंथ । काय बोलिले जी येथ।।
श्रवण केलियाने प्राप्त । काय आहे।।
सरावानी डोळे ओळींवरून फिरत होते. प्रत्येक शब्द स्पष्ट उच्चारत माझं वाचन पुढे सरकत होतं. आईला इतक्या वर्षांपासून वाचून, ऐकून दासबोध जवळपास पाठ झाला होता. ती माझ्या बरोबरीने सहजपणे ओव्या म्हणत होती.
 
मांडीसुद्धा न बदलता, दोन दशकं वाचून झाल्यावर आईकडे बघून मी जरा थांबले. तिचा चेहरा लालबुंद दिसत होता. नक्कीच पुन्हा ताप चढला होता. तिचा आवाज खोल गेला होता. जय जय रघुवीर समर्थ... म्हणत मी जरा उठलेच. आईला क्रोसीन देऊन, जबरदस्ती साबुदाण्याची खिचडी आणि ग्लासभर ताक घ्यायला लाऊन, चटईवर पडायला लावलं. तिने हातात जपमाळ घेतली. मी पुन्हा मांडी घालून ग्रंथ हाती घेतला. मथुकाकू आईजवळ येऊन बसल्या.
 
बाहेर पाऊस बेभान होऊन पिसाटल्या सारखा कोसळत होता. आडव्या तिडव्या वाहणार्‍या वार्‍याच्या आवाजाने जीव घाबरत होता. झाडांच्या फांद्या जमिनीला टेकून सरळ होत होत्या, काही मोडून पडत होत्या.ऐन दुपारी काळाकुट्ट अंधार पसरला होता. मेणबत्ती, कंदील आणि समईच्या अपुर्‍या पिवळ्या उजेडात, िंभतीवर सावल्या वेड्यावाकड्या नाचत होत्या.एक विचित्र उदासी घरादाराला घेरून आहेसं वाटत होतं.
मी तिसर्‍या दशकाला सुरुवात केली....
जन्म दु:खाचा अंकुर । जन्म शोकाचा सागर
जन्म भयाचा डोंगर चळेना ऐसा ।।
आईचे ओठ हालत होते. जप करत होती, की- दासबोधातील ओव्या म्हणत होती कळत नव्हते. मी सवयीने एकेक ओवी वाचत पुढच्या समासाकडे सरकत होते.
 
बाहेर पावसासोबत गारांचा वर्षाव सुरू झाला. टिनाच्या शेडवर तडतडाट ऐकू येत होता.अंधार जास्तच गडद झाला. समईत तेल घालून, मेणबत्तीची वात सारखी करत मी पुढे वाचू लागले. मनात मात्र, अशाच एका वादळी पावसात, आईसोबत चढलेल्या सज्जनगडाच्या दोन एकशे पायर्‍या आठवत होत्या. आईने शिवथर घळीत, सुरेल आवाजात वाचलेला दासबोध, कानात रुंजी घालत होता. थंडगार वार्‍याचा झोत आत आला. आईने शाल गळ्यापर्यंत ओढून घेतली. तिच्या बोटावरून जपमाळेचे मणी सरकत होते. डोळे मिटून आई ओठांनी जप करत होती. मला आईची जरा जास्तच काळजी वाटू लागली. पण मी वाचन थांबवून तिच्याकडे पाहिले की ती पुढे वाचण्यासाठी खूण करत होती. जरा घाईने मी ओव्या वाचत होते. लक्ष दासबोधा इतकंच आईकडे लागलं होतं. आईचे डोळे मिटलेले होते, ओठ हालत होते, बोटावरून जपमाळेचे मणी सरकत होते. मी तिसर्‍या दशकातील नवव्या समासाशी येऊन पोहोचले.
 
मृत्युनिरुपणाचा समास सुरू झाला. माझ्या घशात आवंढे येऊ लागले. तुडुंबल्या डोळ्यांना अक्षरे नीट दिसेनात. आवाजही मोकळा फुटेना. मनात आलं- वर्षांन्‌वर्षापासून दासबोधाची पारायणे करतेय्‌, आजच हे असं का होतंय्‌? ’
 
पहिल्या दोन ओव्या मी मनातच वाचल्या. आईने माझ्याकडे डोळे उघडून बघितले. मी आवंढा गिळून, भरल्या आवाजात वाचू लागले...
सरता संचिताचे शेष । नाही क्षणाचा अवकाश।।
भरता न भरता निमिष्य। जाणे लागे।।
मेणबत्तीची ज्योत फरफरत वाकडी तिकडी होऊ लागली.
मृत्यु न म्हणे मुद्राधारी । मृत्यु न म्हणे हा व्यापारी।।
मृत्यु न म्हणे पर नारी । राजकन्या।।
 
मेणबत्ती थकून भागून, वार्‍याशी झुंजत विझून गेली. कंदील उदासून काजळला होता. समई शांत तेवत होती. मी आईकडे पाहिले. तिचा कपाळी बुक्का लावलेला गोरापान चेहरा, सोनेरी तेजाने झळकत होता. मिटलेल्या डोळ्यांच्या कडांमधून एका सरीने अश्रू ओघळत होते. मी डोळे जबरदस्ती कोरडे करत, आवाजात स्पष्टपणा आणण्याचा प्रयत्न केला.
 
देह परमार्थी लाविले । तरीच याचे सार्थक झाले ।।
नाही तरी हे वेर्थची गेले । नाना आघाते मृत्युपंथे ।।
जीव जीवात घालावा । आत्मा आत्म्यात मिसळावा।।
राह राहो शोध घ्यावा। परांतराचा।।
 
मथुकाकू आईच्या डोक्यावरून, अंगावरून हात फिरवत, तिच्या डोळ्यातील अश्रू निपटत होत्या. स्वत:चे अश्रू पदराने टिपत होत्या. माझा आवाज रडका, गदगदलेला यायला लागला. कोणत्याही क्षणी जोरदार हुंदका फुटेल असं वाटत होतं. समईची ज्योत थरथरत, आडवी तिडवी हालत तेवत होती.
 
कंदिलाची काजळी वरपर्यंत चढली. मला पुढे वाचवेना, तरी नेटाने मी वाचत राहिले. माझ्या तोंडून गदगदून हुंदका बाहेर पडला. समईची थरथरती ज्योत शांत झाली. कंदील संपूर्ण काजळला. आईच्या हातची जपमाळ अवचित खाली सांडली. बाहेर पाऊस बेदम कोसळत होता. वारा झपाटला होता. गारांचा सपाटा अविरत चालू होता. भर संध्याकाळी काळाकभिन्न काळोख पसरला होता. मथुकाकू अस्फुट, रडक्या आवाजात कसंबसं ओरडल्या...
‘‘ताई..........’’
सारा दासबोध, सज्जनगड, शिवथरघळ, श्री समर्थांचा फोटो, आईची जपमाळ, तिचा गोरापान सोनेरी चेहरा, सारे माझ्या भोवती फेर धरून गोल फिरू लागले.
सरता संचिताचे शेष...
जीव जीवात घालावा...
आत्मा आत्म्यात मिसळावा...
सरली शब्दांची खटपट...
आला ग्रंथाचा सेवट...
नाही क्षणाचा अवकाश...
जाणे लागे... जाणे लागे... जाणे लागे...
दासबोधातील ओव्या आलटून पालटून माझ्या मेंदूवर आदळू लागल्या. यावर्षी पहिल्या दिवशीच पारायणाची समाप्ती झाली होती. कोरड्या पडलेल्या घशाने मी, ‘जय जय रघुवीर समर्थ!’ म्हणायचा प्रयत्न केला आणि शुद्ध हरपून खाली कोसळले...
••
मीनाक्षी मोहरील
9923020334