निवडणुकीच्या रणधुमाळीत अमरावतीत 23 हजार लीटरचा मद्यसाठा जप्त

    दिनांक :14-Oct-2019
अमरावती, 
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यापासून आजपर्यंत जिल्ह्यात 159 दारूजप्तीच्या कारवाया झाल्या असून सुमारे 23 हजार 26 लीटर मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. बाजारभावप्रमाणे जप्त दारुची किंमत 11 लाख 21 हजार 10 रुपये आहे. निवडणूक कालावधीत अपप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यात येत आहे. 
 
 
धामणगाव रेल्वे येथून 12,326 लीटर मद्यसाठा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत 3 लाख 59 हजार 829 रुपये आहे. बडनेरा येथून 415 लीटर मद्यसाठा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत 1 लाख 81 हजार 352 रुपये आहे. अमरावती येथून 1166 लीटर मद्यसाठा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत 53 हजार 518 रुपये आहे. तिवसा मतदारसंघातून 996 लीटर मद्यसाठा जप्त करण्यात आला असून त्याची 60 हजार 117 रुपये आहे. दर्यापूर मतदारसंघातून 152 लीटर मद्यसाठा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत 44 हजार 880 रुपये आहे. मेळघाट मधून 1517 लीटर मद्यसाठा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत 66 हजार 467 रूपये आहे. अचलपूर येथून 452 लीटर मद्यसाठा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत 43 हजार 374 रुपये आहे. मोर्शी येथून 6002 लीटर मद्यसाठा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत 3 लाख 11 हजार 473 रुपये आहे.
 
 
आचारसंहिता भंगचा एक गुन्हा दाखल झाला असून प्रशासनाकडून त्यावर कारवाई करण्यात आली आहे. विविध विभागांसह जिल्हा प्रशासनाकडून अपप्रकार रोखण्यासाठी नियमित कारवाई करण्यात येत आहे. जिल्ह्यात काटेकोर पद्धतीने निवडणूक प्रशासनाकडून आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने जिल्ह्यात पोलिस विभाग, उत्पादन शुल्क विभागाकडून कार्यवाही सुरू आहे. जिल्हा निवडणूक कार्यालयात आचारसंहिता कक्षाकडून सर्व यंत्रणेच्या समन्वयाची कार्यवाही होत आहे.