रेल्वेगाडीतून तब्बल २८ किलो गांजा जप्त

    दिनांक :14-Oct-2019
गोंदिया,
येथील रेल्वेस्थानकावर अजमेर-पुरी एक्सप्रेस रेल्वेगाडीच्या बोगीतून बेवारस आढळलेल्या दोन बॅगमधून २ लाख ७८ हजार ३८० रुपये किमतीचा २७.८३ किलो गांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई रेल्वे सुरक्षा पोलिसांनी रविवारी (१३ ऑक्टोबर) रोजी रात्री २ च्या सुमारास केली. 

 
 
गोंदिया रेल्वे सुरक्षा दलाला अजमेर-पुरी एक्सप्रेस रेल्वेगाडीच्या बोगी क्र. ३ मध्ये दोन बॅग बेवारस स्थितीत असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे नागपूर रेल्वे सुरक्षा दलाचे मंडळ सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांच्या मार्गदर्शनात १३ ऑक्टोबर रोजी रात्री २ वाजता गोंदियाचे उपनिरीक्षक एम.पी. राऊत, विनेक मेश्राम, ए.के. बानबले, आर.एच. मिश्रा, एम.एन. लेदे, नासीर खान व बोरकर यांनी रात्री २ वाजता अजमेर-पुरी एक्सप्रेस फलाट क्र. ४ वर पोहचून बोगी क्र. ३ मध्ये तपासणी केली. दरम्यान लाल व हिरव्या रंगाच्या दोन बॅग बेवारस स्थितीत आढळल्या. या बॅगांची तपासणी केली असता त्यामध्ये गांजा आढळला. यात लाल रंगाच्या बॅगेत १ लाख २८ हजार ८० रुपये किमतीचे १२.९३ किलोच्या ६ गांज्याचे पॅकेट तर हिरव्या रंगाच्या बॅगेत १ लाख ४९ हजार ३०० रुपये किमतीचे १४.९३ किलोच्या ७ गांज्याचे पॅकेट, असा एकूण २ लाख ७८ हजार ३८० रुपये किमतीचा २७.८४ किलो गांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणी नायब तहसीलदार यांच्यासमोर घटनेचा पंचनामा करून जप्त गांजा गोंदिया रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.