भाजपा बंजारा समाजाला न्याय देण्याचे काम करेल : देवेंद्र फडणवीस

    दिनांक :14-Oct-2019
मानोरा, 
राज्यातील बंजारा समाजाचा सर्वांगिण विकास करुन न्याय देण्याचे काम भाजपा सरकार करेल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंजारा समाजाचे धर्मगुरु संत डॉ. रामराव बापू यांना दिले. तसेच बापूंच्या चरणी माथा टेकून आर्शिवाद घेत प्रकृतीविषयी आस्थेने विचारपूस केली. यावेळी मुख्यमंत्र्याचा मंदीर संस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला. 

 
 
मुख्यमंत्री फडणवीस हे दुपारी 3.30 वाजताच्या दरम्यान 14 ऑक्टोबर रोजी तिर्थक्षेत्र पोहरादेवी येथे ताफ्यासह पोहचले. यावेळी त्यांच्या समवेत उमेदवार राजेंद्र पाटणी, महंत बाबुसिंग महाराज, माजी आ. अनंतकुमार पाटील, अनिल राठोड, अरविंद पाटील, संजय महाराज, जितेंद्र महाराज, सुनिल राजे, अजय पाटील, डॉ. संजय रोठे, उमेश ठाकरे, ठाकुरसिंग चव्हाण, बाबुसिंग नाईक आदीसह भाजपाचे पदाधिकारी व समर्थकांची उपस्थिती होती.
  
यावेळी महाराजांनी देशातील बंजारा समाजाच्या न्याय हक्कासाठी पाच मागण्या मुख्यमंत्र्याकडे केल्या. यामध्ये धनगर, आदिवासी समाजाला ज्या सवलती लागू केल्या त्या बंजारा समाजाला सुद्धा लागू करवी, आता मंदीर नव्हे तर माझे स्मारक म्हणून मेडीकल कॉलेज तिर्थक्षेत्र विकास पोहरादेवी येथे ग्रामीण भागात उभे करावे. पंतप्रधान मोदी यांना रामनवमीला पोहरादेवी येथे आणावे यासह इतर मागण्या करुन गृहमंत्री यांचा दौरा व्यस्त असल्याने ते दर्शनासाठी आले नाही. त्याचा माफीनामा दिला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महाराजांच्या सर्व मागण्या मान्य करुन भाजपाला निवडणूकीत विजयी होणेसंदर्भात आर्शिवाद मागीतला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी देवी जगदंबा व संत सेवालाल महाराज समाधी स्थळाचे दर्शन घेवून ताफ्यासह पुसदकडे रवाना झत्तले. यावेळी तिर्थक्षेत्र पोहरादेवी परिसरात पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता.