शरद पवारांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल, मुस्लिम समाजात रोष

    दिनांक :14-Oct-2019

अकोला,
सत्काराच्या हारामध्ये पातूर नगरपरिषदेच्या काँग्रेसच्या स्विकृत नगरसेवकाने टाकलेला चेहरा मागे ढकलत नाकावर ढोपर मारणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर सोशल मिडियावर जोरदार टिका होत आहे. सतत अल्पसंख्याकांचे कैवारी अशी भूमिका दाखविणारे पवार बाळापूर मतदार संघातील वाडेगाव येथे झालेल्या राष्ट्रवादी उमेदवाराच्या प्रचारात ढोपर मारुन अल्पसंख्याकांना धडा शिकवत असल्याचे चित्र निर्माण होत आहे. यामुळे अल्पसंख्याक समाजात तीव्र नाराजी असून हे ढोपर अकोला जिल्ह्यातील बाळापूरच्या उमेदवाराबरोबर आता राज्यातील इतर ही राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या नाकावर बसण्याची भिती राष्ट्रवादीच्या नेत्यांना मनात निर्माण झाली आहे. दरम्यान, काँग्रेसच्या स्विकृत नगरसेवकांच्या नाकावर बसलेले ढोपराबद्दल काँग्रेसचे नेते ब्र सुध्दा काढत नसल्याचे चित्र आहे. 

 
 
बाळापूर मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी झालेल्या जाहिर सभेत वाडेगाव येथे आपला पण शरद पवारांसोबत फोटो यावा यासाठी पातूर नगरपरिषदेचा सदस्य सय्यद अझहर सय्यद कमर याने जंगी स्वागतात मान टाकून फोटो काढण्याचे स्वप्न बघितले. फोटो क्लिक होण्यापुर्वीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या नाकावर ढोपर मारत त्याला दूर सारले.
 
 
 
सावकारांना कोपरा पासून ढोपरा पर्यंत सोलून काढण्याचा दम तत्कालिन राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर.आर.पाटील यांनी भरला होता. समाजातील लुटारुंना कोपर्‍यापासून ढोपरा पर्यंत सोलण्याची त्यांची तळमळ निश्चितच प्रामाणिक होती. पण, त्याच वेळी केवळ फोटोसाठी आपल्याच नेत्याचे ढोपर नाकावर ठेचल्याने पातूर नगरपालिकेचा सदस्य मात्र नाराज झाला आहे. त्याने केवळ फोटोसाठी मान टाकली आणि त्याच्या नाकावर ढोपर बसले. सोशल मिडियावर हे सर्व चित्रीकरण व्हायरल झाले असून अल्पसंख्याकाला अशा प्रकारे ढोपराने बाजूला सारण्याचा सर्व प्रकार सोशल मिडियावर चर्चेचा विषय असून अल्पसंख्याक समाजात या विषयी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
 
 
कोण आहे सैय्यद अझरुद्दीन?
पातूर नगरपरिषदेत काँग्रेसचे स्विकृत नगरसेवक म्हणून सैय्यद अझरुद्दीन सैय्यद कमरुद्दीन हे अल्पसंख्याक समाजात मोठे नावाजलेले नाव. त्यांचे वडील सैय्यद कमरुद्दीन सैय्यद ईस्माईल हे पातूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांच्याकडे आता प्रदेश काँग्रेसची पण, जबाबदारी असल्याची माहिती मिळाली. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली असल्याने यावर काँग्रेस मध्ये चुप्पी साधली गेली आहे. अल्पसंख्याकांचे कैवारी असे काँग्रेस नेत्यांकडे पाहिले जाते. पण, आपल्याच समाजबांधवाला ढोपराने अतिशय निर्दयतेने मागे ढकलत दूर करणार्‍या शरद पवारांबद्दल कुणीही ब्र उच्चारताना काँग्रेसचे निष्ठावंत अल्पसंख्याक बोलताना दिसत नाहीत.