वर्धेत वाघाची दहशत; ग्रामस्थ चिंतेत

    दिनांक :14-Oct-2019
हिंगणघाट,
तालुक्यातील धोची, सावंगी, येरला परिसरात धुमाकुळ घालणाऱ्या बिबटयास वनविभागाने नुकतेच जेरबंद केला असल्याने परिसरातील जनता सुखावत नाही तोच धोची येथे पुन्हा दुसऱ्या वाघाचे अधिवास असल्याचा पुरावा दिला आहे. 

 
 
काल रविवार (१३ ऑक्टोबर) रोजी धोची येथील एका शेतकऱ्याच्या शेतामधील कुत्र्यास गंभीर जखमी केले. धोची येथील शेतकरी रामदास इंगोले याच्या शेतात भरदुपारी तीन वाजता हा प्रकार घडला असून कुत्रा जीवाच्या आकांताने ओरडल्यामुळे तेथील शेतमजूर घटनास्थळी धावले असता वाघाने कुत्र्यावर हल्ला केल्याचे निदर्शनास आले. उपस्थित विलास पढाल याने मोठ्या हिंमतीने वाघाला हाकलून लावल्याने त्या श्वानाचा जीव वाचला आणि वाघाने तेथून पलायन केले.
 
  
उपरोक्त घटनेची माहिती विलास पढाल यांनी शेतमालकास दिल्याने आता पुन्हा एका वाघाचे परिसरात वास्तव्य असल्याचे सिद्ध झाले. याप्रकरणी सत्यता पडताळण्यासाठी चौकशी केली असता धोची येथील वैद्यकीय व्यवसायी डॉ.टी वाय. ठाकरे व इतर युवाकांनी यांनी यास दुजोरा दिला आहे. परिसरात वाघाचे अस्तित्व असल्याच्या माहितीने परिसरातील ग्रामस्थांमध्ये पुन्हा एकदा दहशत निर्माण झाली आहे.