सिपचा सुलभ पर्याय

    दिनांक :14-Oct-2019
यावेळच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला प्रचंड यश मिळाल्याने केंद्रात पुन्हा एकदा प्रचंड बहुमताचं सरकार स्थापन झालं आहे. पूर्ण बहुमतातं स्थिर सरकार शेअर बाजारासाठी अनेक अर्थांनी लाभदायी ठरतं. धोरणात्मक निर्णय घेताना कोणतीही आडकाठी होत नसल्याने शेअर बाजारही उसळी घेतो. अर्थात औद्योगिक क्षेत्रातल्या उत्पन्नातले चढउतार, उच्च मूल्यांकन आणि जागतिक पातळीवरच्या घडामोडींमुळे शेअर बाजारातल्या गुंतवणुकीला लघु ते दीर्घकालीन धोके उत्पन्न होऊ शकतात. शेअर बाजाराच्या क्षमतेचे पूर्ण लाभ मिळवून संभवित धोक्यांची तीव्रता कमी करण्यासाठी सर्वसामान्य गुंतवणूकदार म्युच्युअल फंडांच्या सिप योजनांमध्ये गुंतवणूक करू शकतात. दीर्घकालीन गुंतवणुकीचा हा खूप चांगला पर्याय ठरू शकतो. 

 
 
शेअर बाजारातल्या किंमती कमी असताना गुंतवणूक करणं योग्य ठरत असलं तरी सर्वसामान्य गुंतवणूकदारांना योग्य वेळ साधता येत नाही. गुंतवणुकीसंदर्भातली वेळ साधण्यासाठी तुम्हाला बर्‍याच गोष्टींचा अभ्यास करावा लागतो. शेअर बाजारातल्या हालचालींचा योग्य अंदाज न असल्यामुळे तुमची गुंतवणुकीची वेळ चुकू शकते. सिपच्या माध्यमातून तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता. इक्विटी फंडांमध्ये सिपच्या माध्यमातून गुंतवणूक केल्यानंतर ठराविक कालावधीनंतर नियमिपणे तुमच्या बँक खात्यातून विशिष्ट रक्कम कापली जाते. यामुळे शेअर बाजारातली तुमची गुंतवणूक नियमित सुरू रहाते. शेअर बाजारातल्या चढउतारांचा यावर परिणाम होत नाही.
 
 
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. विशिष्ट क्षेत्राशी संबंधित किंवा थीमवर आधारित फंडांमध्ये गुंतवणूक करणं टाळा. अशा फंडांना सेक्टोरल आणि थिमॅटिक फंड म्हटलं जातं. सेक्टोरल फंड 80 टक्के निधी ठराविक क्षेत्रातल्या कंपन्यांमध्ये गुंतवतात तर थिमॅटिक फंडांना विशिष्ट थीमवर आधारित फंडांमध्ये गुंतवणूक करावी लागते. यामुळे तुमच्या गुंतवणुकीवर परिणाम होऊ शकतो. म्युच्युअल फंडातल्या नियमित योजनांपेक्षा डायरेक्ट प्लॅन्समध्ये गुंतवणूक करा. या योजनांचा एक्सपेन्स रेश्यो तुलनेने बराच कमी असतो. तुमच्या फंडाच्या कामगिरीचा नियमित आढावा घेणंही गरजेचं आहे.