हृतिक लवकरच दिसणार ‘क्रिश ४’ चित्रपटात

    दिनांक :14-Oct-2019
बॉलिवूड स्टार हृतिक रोशन आपल्या अभिनयासोबतच नृत्यानेदेखील प्रेक्षकांच्या मनावर जादू करत असतो. नुकताच हृतिकचा ‘वॉर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. या चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करत असताना हृतिकने त्याचा आगमी चित्रपट ‘क्रिश ४’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे.
 
 
 
एका मुलाखतीमध्ये हृतिकने हा खुलासा केला आहे. ‘क्रिश चित्रपट मालिका ही आमच्या हृदया जवळ आहे. माझ्या वडिलांना बरं नसल्यामुळे आम्ही क्रिश ४ हा चित्रपट लांबणीवर ढकलला होता. आता त्यांची प्रकृती पहिल्यापेक्षा चांगली आहे. त्यामुळे आम्ही लवकरच या चित्रपटाला सुरुवात करणार आहोत’ असा खुलासा हृतिकने केला आहे.
राकेश रोशन यांना ‘क्रिश ४’ हा चित्रपट एका वेगळ्याच स्तरावर नेण्याची इच्छा असल्याने ते चित्रपटासाठी फार मेहनत घेत आहेत. या चित्रपटाचे २५० कोटी रुपयांचे एकूण बजेट असल्याचे म्हटले जात असून या चित्रपटाचे चित्रीकरण शेड्यूल करण्यात आले असल्याचे म्हटले जात आहे. मात्र चित्रपट प्रदर्शित होण्यास थोडा कालावधी लागणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.
२००३ साली आलेल्या ‘कोई मिल गया’ या चित्रपटाचा ‘क्रिश ४’ चौथा भाग असणार आहे. हृतिक रोशनची प्रमुख भूमिका असलेला ‘कोई मिल गया’ हा चित्रपट खूपच गाजला. त्यानंतर हृतिक रोशन पुढच्या भागांत सुपरहिरोच्या भूमिकेत दिसला. ‘क्रिश’ आणि ‘क्रिश ३’ या चित्रपटांनाही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद लाभला. अनुक्रमे २००६ आणि २०१३ मध्ये हे चित्रपट प्रदर्शित झाले होते. विशेषत: बच्चे कंपनीमध्ये क्रिश सुपरहिरो सर्वाधिक प्रसिद्ध झाला होता त्यामुळे क्रिश ४ विषयी छोट्या चाहत्यांमध्येही बरंच कुतूहल आहे.