‘वॉर’ने केली कोटींची कमाई

    दिनांक :14-Oct-2019
देशात सध्या मंदीसदृष्य वातावर आहे. त्यामुळे देशातील अनेक व्यवसाय डबघाईच्या दिशेने जाताना दिसत आहेत. परंतु या मंदीतही बॉलिवूड चित्रपटांची मात्र चांदी होताना दिसत आहे. याचे एक ढळढळीत उदाहरण म्हणजे, नुकताच प्रदर्शित झालेला वॉर हा चित्रपट. अभिनेता हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफच्या ‘वॉर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई सुरू ठेवली आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने ५३.३५ कोटी रुपयांची कमाई करुन ‘भारत’, ‘मिशन मंगल’, ‘साहो’ आणि ‘कलंक’ या चित्रपटांना मागे टाकले होते. आणि आता ११ दिवसानंतर तब्बल २७१.७५ कोटी रुपयांची विक्रमी कमाई या चित्रपटाने केली आहे.
सिद्धार्थ आनंद यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट दोन ऑक्टोंबरला पाच हजार ३५० स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला होता. तसेच विदेशातही एक हजार ३५० चित्रपटगृहांमध्ये ‘वॉर’ला प्रदर्शित होण्याची संधी मिळाली.

बॉलिवूडचा हॅण्डसम हंक हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांची उत्तम केमिस्ट्री असलेला ‘वॉर’ हा चित्रपट २ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच या दोघांनी मोठ्या पडद्यावर स्क्रीन शेअर केली. विशेष म्हणजे या चित्रपटातून या दोघांमध्ये झालेलं ‘वॉर’ प्रेक्षकांच्या पसंतीत उतरत आहे.साहसदृश्यांनी परिपूर्ण असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्सुकता होती. अखेर त्यांची चित्रपट पाहण्याची इच्छा पूर्ण झाली. इतकंच नाही तर हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीत उतरविण्यास दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यशस्वी ठरले आहेत.
चित्रपटाची कथा स्पेशल एजंट कबीर (हृतिक रोशन) याच्यावर आधारित असून खालिद (टायगर श्रॉफ) हा त्याचा ज्युनिअर सहकारी असतो. मात्र काही कारणास्तव खालिदला कबीरचा शोध घ्यावा लागतो आणि तेथून सुरु होतो या दोघांमधील वॉर म्हणजेच येथूनच चित्रपटाच्या कथेला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. या चित्रपटामध्ये नक्की काय होतं, कबीर आणि खालिद यांची भेट झाल्यानंतर त्यांच्यातील वॉर संपतो की नाही हे पाहण्यासाठी मात्र तुम्हाला चित्रपट पाहावा लागणार आहे. या चित्रपटामध्ये हृतिक आणि टायगरसोबतच अभिनेत्री वाणी कपूरदेखील झळकली असून तिने ग्लॅमरस अंदाजामुळे अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
दरम्यान, आदित्य चोप्रा यांची निर्मिती असलेल्या वॉरमध्ये मोठ्या प्रमाणावर अॅक्शन, थ्रिलर आणि रोमान्स या गोष्टींचा भरणा करण्यात आला असून हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीत उतरत आहे. सोबतच चित्रपटामध्ये गाण्यांचा योग्य ठिकाणी वापर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीत उतरत असल्यामुळे हा चित्रपट एखादा नवा रेकॉर्ड आपल्या नावे करु शकतो अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.